पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटा दिला असता तर लीगचे महत्त्व वाढले नसते. जीनाही पुढे अतिरेकी बनले नसते. हे समज मुस्लिम राजकारणाच्या अज्ञानातून बनलेले आहेत. इतक्या सहजासहजी मुस्लिम राजकारणाला वळण लागले असते असे मानणे हे हास्यास्पद आहे. लीगला सत्तेत भागीदारी दिल्यामुळे ती मजबूत झालीच असती. दुसरे असे की काँग्रेसच्या नेत्यांबरोबर सौदेबाजी करण्यासाठी अतिरेकी मागण्या करून मुस्लिम जनमत आपल्याकडे वळविण्याचा आणि लीगला प्रबळ पक्ष बनविण्याचा प्रयत्न जीनांनी केला असता. मुस्लिम जनमताशी संपर्क साधण्याच्या नेहरूंच्या घोषणेवर जीना बिथरण्याची कारणे याकरिताच समजून घेतली पाहिजेत. लीग मंत्रिमंडळात असती तरी काँग्रेसच्या मुस्लिम जनमत आपल्याकडे वळविण्याच्या प्रयत्नांस तिने विरोधच केला असता. नेहरूंनी काँग्रेसचा निवडणूक कार्यक्रम मान्य करण्याची अट लीगला घालायला नको होती असेही काही टीकाकारांना वाटते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशातील जमीनदारी नष्ट करण्याचे आश्वासन दिलेले होते. लीगला हा कार्यक्रम मान्य करावयास न लावता मंत्रिमंडळात घेतल्यानंतर काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती कशी करावयाची हाही एक प्रश्न होता. कारभार चालवावयास काही एक साधर्म्य दोन्ही पक्षांत असायला हवे होते. काँग्रेस आणि लीगमध्ये असे कोणतेच साधर्म्य नव्हते. काँग्रेसने लीगला मंत्रिमंडळात घेतले असते तर पुढील घटना काही काळ पुढे ढकलल्या गेल्या असत्या-टळू शकल्या नसत्या.

 जीनांनी या घटनेपासून काँग्रेसविरुद्ध गलिच्छ जातीय प्रचाराला सुरुवात केली. आठ राज्यांतील काँग्रेस मंत्रिमंडळात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचा त्यांनी आरोप केला. आपल्या भावी मागण्यांच्या डावपेचांचा भाग म्हणून त्यांनी असत्य भडक प्रचार हे आपले हत्यार बनविले. हिंदू आणि मुसलमानांत काहीच समान नाही असे सांगू लागले. आमची भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, वीर पुरुष वेगळे आहेत, इतिहास वेगळा आहे. आम्ही सर्व दृष्टिंनी वेगळे आहोत असे ते सांगू लागले. १९३९ साली काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तेव्हा त्यांनी मुसलमानांना 'मुक्तिदिन' पाळण्याचे आवाहन केले. त्यांना विरोध करणाऱ्या मुसलमानांना ते 'इस्लामचे शत्रू' म्हणून संबोधू लागले. नेहरूंच्या शब्दांत सांगायचे तर असत्य प्रचारात त्यांनी गोबेल्सलाही मागे टाकले. तेव्हाच्या मध्यप्रदेशात वर्धा येथे विद्यामंदिर या नावाने एक सरकारी शाळा निघाली. या शाळेच्या नावाला लीगवाल्यांनी आक्षेप घेतला आणि मुसलमानांना सक्तीने हिंदुधर्माची दीक्षा दिली जात आहे असा खोटा प्रचार सरू केला. काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर जीनांनी वीरपूरच्या नबाबाच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस मंत्रिमंडळाच्या काळात झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीने अतिशय खोटा, भडक आणि काल्पनिक अत्याचारांनी भरलेला असा एक अहवाल प्रसिद्ध केला. अत्याचारांच्या चौकशीसाठी एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक करावी ही काँग्रेसचे अध्यक्ष बाबू राजेंद्रप्रसाद यांनी केलेली सूचनाही जीनांनी फेटाळून लावली. कारण अत्याचाराचे बरेचसे आरोप खोटे होते हे जीनांना माहीत होते.

६४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान