पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/64

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नव्हते. लीगला सत्तेत भागीदार करून घेण्याची काँग्रेसची इच्छा नाही हा मुस्लिम टीकाकारांनी काँग्रेसवर केलेला आरोप मुळातच खोटा होता, हे दोन जागा लीगला देण्याचे काँग्रेसने मान्य केल्यामुळे सिद्ध झालेले आहे. एखाद्या पक्षाच्या सामर्थ्यावरूनच त्याला किती जागा द्यायच्या हे ठरविण्यात येते. (१९७१ च्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसने महाराष्ट्र प्र. स. पक्षाला किंवा रिपब्लिकन पक्षाला (खोब्रागडे गट) कमी जागा देऊ केल्या, म्हणून त्यांच्यात समझोता होऊ शकला नाही. याचा अर्थ काँग्रेस समाजवादाच्या विरोधी किंवा हरिजनांच्या विरोधी आहे असा लावायचा काय ? रिपब्लिकन पक्षाने या वाटाघाटी मोडल्यानंतर देखील हा आरोप केलेला नाही, हे येथे लक्षात येते.) आणि समजा, मुस्लिम लीगला काँग्रेसचा विरोध होता असे मानले तर त्याचा अर्थ काँग्रेस मुसलमानविरोधी भमिका घेत होती असा कसा काय होतो? काँग्रेस मुसलमानांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात घेतच होती. वस्तुस्थिती ही आहे की सत्तेच्या भागीदारीच्या मुस्लिम लीगच्या कल्पनेशी जुळते घेणे काँग्रेसला शक्यच नव्हते. उत्तर प्रदेशातील १९३७ सालचा हा बेबनाव म्हणजे लीगची आणि पर्यायाने जीनांची Group equality ची कल्पना आणि काँग्रेसची व्यक्तींच्या समानतेची कल्पना यांच्यातील झगडा होता. लीग आपले अधिक प्रतिनिधी घेण्याची मागणी करून सत्तेतील समान भागीदारी मागत होती. आपल्या चौदा मागण्यांच्या मसुद्यात जीनांनी प्रत्येक राज्यातील मंत्रिमंडळात एकतृतीयांश मुस्लिम प्रतिनिधी घेतले जावेत अशी मागणी केली होती. तेच तत्त्व काँग्रेसने आपल्याला अधिक जागा देऊन अंमलात आणावे अशी त्यांची इच्छा होती. हे तत्त्व काँग्रेसने मान्य केले नव्हते आणि त्यामुळे ते पाळण्याचा प्रश्न उपस्थित होत नव्हता.

 मौलाना आझाद आणि त्यांच्यासारखे इतर टीकाकार यांची भूमिका वेगळी आहे. लीगची मागणी न्याय्य होती असे ते मानीत नाहीत, त्याचबरोबर काँग्रेस मुस्लिमविरोधी होती हेही त्यांना मान्य नाही. काँग्रेसने लीगला काही सवलती न देण्याच्या तांत्रिक चुका करायला नको होत्या असे त्यांचे म्हणणे आहे. यापैकी मौ. आझाद यांच्या टीकेवर फारसे विसंबून राहता येत नाही. कारण त्यांनी अनेक असत्य विधाने केली आहेत. (उत्तर प्रदेशात मुस्लिम लीगने काँग्रेसचा कार्यक्रम मान्य करण्याची तयारी दर्शविली होती असे मौ. आझाद आपल्या India Wins. Freedom' (१९६९ पृ. १६०) मध्ये सांगतात. परंतु उत्तर प्रदेश मुस्लिम लीगचे तेव्हाचे नेते 'चौधरी खलिकुझ्झमान' यांनी '(आम्ही) काँग्रेसचा कार्यक्रम मान्य केला नव्हता' हे नेहरूंनी आझादांच्या पुस्तकावर भारतीय संसदेत केलेले विधान बरोबर आहे असे जाहीर केले. (पहा - Islam in India's Transition to Modernity, करंदीकर, पृ. २४८) लीगतर्फे वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांचे विधान अधिक विश्वसनीय मानणे भाग आहे. मौ. आझादांना 'आपण समझोता घडवून आणला असता, नेहरूंमुळे तो घडन आला नाही.' असे सुचवायचे असावे असे दिसते. इतिहासाचे प्रवाह आपण बदलू शकलो असतो असे सांगण्याचा खोटा अहंकार त्यामागे आहे. नाही तर आपल्या भूमिकेच्या समर्थनाकरिता असत्य विधाने करण्याची त्यांना गरज का वाटली असती? (नगरकर : 'Genesis of Pakistan, Allied, 1975, pp. 263-266, खलिकुझ्झमान : 'Pathway to Pakistan, 1961, Longmans, Pakistan, pp. 160 - 163) त्यांच्यासारखे इतर टीकाकार असे समजतात की लीगला सत्तेत

पाकिस्तानची चळवळ/६३