पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रथम आवृत्तीची
प्रस्तावना

 कोणतीही विचारधारा असो, त्यात सुरुवातीला जो प्रवाहीपणा असतो तो नंतर राहात नाही. त्यात साचलेपण येऊन साचेबंदपणा वाढत जातो; सुरुवातीचा ताजेपणा नष्ट होऊन त्याला एक तं-हेचे घनरूप प्राप्त होते, व त्याचे तेज लुप्त होऊ लागते. कम्युनिझमबद्दल ही गोष्ट आपल्या सहज ध्यानी येऊ शकते. मार्क्सच्या विचाराचा ताजेपणा, आवेश व जोश जसा १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या कम्युनिस्ट मॅनेफॅस्टोमध्ये प्रत्ययास येतो तसा तो लेनिनच्याही लिखाणात पुरेसा येत नाही. स्टॅलिनची राजवट ही तर मार्क्सवादाचे एक साचलेले डबके बनली व तिची दुर्गंधी जगभर पसरली! विसाव्या काँग्रेसमध्ये क्रुश्चेवने आणि नंतर गोब्राचेव्हने स्टॅलिनची सर्व दुष्कृत्ये मांडून मार्क्सवादाला कसे विकृत वळण लागले त्याचे स्पष्टीकरण सर्व जगापुढे सादर केले. जी गोष्ट कम्युनिझमबद्दल तीच 'व्यक्तिवाद' या विचारधारेबद्दल म्हणता येईल. एकछत्री अंमल असलेला राजा, दैवी अधिकार प्राप्त झाला असा दावा करून, अनियंत्रितं सत्ता उपभोगू लागला व त्याने प्रजेचे जीवन साधनरूप बनविले. त्याप्रमाणेच पोपची अनियंत्रित अशी सत्ता सबंध युरोप व त्यामार्फत जगावर वर्चस्व गाजवू लागली. याप्रमाणे राजा व धर्माधिकारी सर्वंकष सत्ता उपभोगीत असताना त्यांच्या सत्तेला व्यक्तिवादाने जबरदस्त टक्कर दिली. 'निरंकुश सत्तेपुढे उभी ठाकलेली समर्थ व्यक्ती' असा त्याचा उल्लेख केला गेला. परंतु हाच सुरुवातीचा प्रमाथी व्यक्तिवाद भांडवलशाहीचा आधार बनला आणि त्या व्यक्तिवादाचे रूपांतर स्पर्धायुक्त समाजातील निखळ व्यक्तिकेंद्री व स्वार्थी माणसाच्या समाजात झाले आणि व्यक्तिवादी विचारसरणी घातक बनली.

  जी गोष्ट विचारधारेची तीच विविध धर्मांची. आर्य प्रथम भारतात आले असताना वेदकाळात दिसणारे त्यांचे विजिगीषु व प्रवाही रूप स्मृतीच्या कालखंडात पार भ्रष्ट बनले आणि हिंदुसमाज चातुर्वर्ण्य पद्धतीचा गुलाम बनला. ब्राह्मणवर्णाने ज्ञानाची मक्तेदारी प्राप्त करून 'वेदोऽखिलं जगत् सर्वम्' असा नारा देऊन हिंदू समाज साचलेल्या डबक्याप्रमाणे बनवला आणि स्त्रीशूद्रातिशूद्र यांच्या बहुजन समाजाला गुलाम बनविले. येशूच्या काळातील ख्रिश्चन धर्माचे तजेलदार तेजस्वी व अखिल मानवतेला व्यापणारे रूप राजेशाहीसारख्या बनलेल्या पोपशाहीमध्ये उरले नाही. म्हणूनच शॉने म्हटले की, "Nearer the Church,

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान/५