पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/53

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.आदेश परस्परविरोधी असतील तर नंतरचा आदेश आधीचा आदेश रद्द करतो,' हा कुराणाचा अर्थ लावावयाचा नियम पाळलेला दिसतो. सर सय्यद अहमदखान किंवा जीना यांना मात्र ते या पद्धतीने का अजमावीत नाहीत?)
 सर सय्यद अहमदखान हिंदूंविरुद्ध यादवीच्या पवित्र्यात उभे राहिले तेव्हा गांधीजी आणि नेहरू यांचे राजकारणातले युग नव्हते. काँग्रेस नुकतीच स्थापन झाली होती आणि सर सय्यद अहमदखानांनी यादवी युद्धाची भाषा करावी असे काहीच हिंदू नेत्यांच्या हातून घडले नव्हते. सर सय्यद अहमदखानांसारख्या मुसलमानांच्या आणि विशेषतः सुशिक्षितांच्या मनाची ठेवण कशी होती याची ही भाषा निदर्शक आहे. काँग्रेसचे एक अध्यक्ष श्री. बद्रद्दिन तय्यबजी आणि सर सय्यद अहमदखान यांच्यातील पत्रव्यवहार पहा. ((i) Sir Syed Ahmad Khan : A Political Biography - Shah Muhammad op.cit. pp. - 147 - 49. (ii) Badruddin Tyabji, A. G. Noorani, Publications Division, 1969, pp. 82 - 88, 177 - 179) त्यावरून राष्ट्रीय जागृतीच्या या आरंभीच्या काळात सुशिक्षित मुसलमानांच्या मनातील दोन प्रवाहांची कल्पना येते. बद्रुद्दिन तय्यबजी समान नागरिकत्वावर आधारलेल्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करतात, हिंदूंशी सहकार्य करण्याचे प्रतिपादन करतात आणि सर सय्यद अहमदखानांना या राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊन मुसलमानांचे नेतृत्व करण्याचे आवाहन करतात, परंतु सुशिक्षित मुसलमान काँग्रेसकडे आकर्षित होत नाहीत, ते सर सय्यद अहमदखान यांनीसुचविलेल्या विभक्तवादाच्या मार्गाने वाटचाल करू लागतात.
 १९०५ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. स्थापनेनंतर तीनच महिन्यांनी नवाब वाकीरूल मुल्क यांनी अलीगढला विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणात 'ब्रिटिश सत्ता भारतात राहणे मुसलमानांच्या हिताचे आहे' असे उघड प्रतिपादन केले. काँग्रेस म्हणून हिणवण्याचा उद्योग सर सय्यद अहमदखान यांनी सुरू केला. स्पर्धा परीक्षांना सर सय्यद अहमदखान यांनी विरोध केला. मुस्लिम लीग केवळ मुसलमानांना संख्यावार प्रतिनिधित्व मागून थांबलेली नाही. सिमला येथे व्हाईसरॉयला १९०६ साली सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसलमानांचे राजकीय स्थान ओळखून त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. शंभर वर्षांपूर्वी त्यांचे जे स्थान होते त्याची या मागणीचा विचार करताना आठवण ठेवावी असेही त्यात म्हटले आहे. थोडक्यात, मुसलमान एकेकाळी या देशाचे राज्यकर्ते होते आणि म्हणून त्यांना त्यांच्या संख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व पाहिजे असा दावा करण्यात आला. हिंदूंच्यात फूट पाडण्याचा उद्योग प्रथमपासून करण्यात येत होता. जनगणनेत आदिवासी आणि हरिजनांना हिंदू म्हणून संबोधले गेले आहे. अशीही तक्रार या निवेदनात करण्यात आली. ते वगळले तर मुसलमानांची संख्या हिंदूंहून फारशी कमी राहणार नाही असा दावा त्यात करण्यात आला. सत्तेच्या समान भागीदारीची कल्पना सुशिक्षित मुस्लिम मनात कशी रुजून बसली होती, याचे हे निदर्शक आहे.

 लोकशाहीच्या चौकटीत एका माणसाला एक मत या प्रौढ मतदानाच्या पद्धतीनुसार मुसलमानांना पुरेसे प्रतिनिधित्व लाभले नसते यासाठी या मागण्या होत नव्हत्या. लोकशाही राज्ययंत्रणेत मुसलमान अल्पसंख्यांक ठरत होते आणि त्यांना सत्ता गाजविता येत नव्हती ही

५२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान