पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भारतीय राष्ट्रवादाशी का जुळते घेतले नाही हा प्रश्न या देशाच्या राजकीय इतिहासकारांना अजून भेडसावितो आहे. या देशाच्या राष्ट्रवादात अखेर मुसलमान आलेच नाहीत ही खंत हिंदू सतत बाळगीत राहिलेले आहेत. आणि अंतर्मुख बनण्याच्या हिंदू परंपरेनुसार आपलेच कुठे तरी चुकले असले पाहिजे या भूमिकेतून हिंदू विचारवंतांनी हिंदू-मुस्लिम संबंधांचे विवेचन सतत केले आहे. गांधीजी आणि नेहरू यांच्याबद्दल दुहेरी आरोप करण्यात येतो. त्यांनी मुसलमानांचा अनुनय केला म्हणून फाळणी झाली असे हिंदूतील एक वर्ग मानतो; तर मुस्लिम लीगशी आणि विशेषत: जीनांशी समझोता करण्यात गांधीजी आणि नेहरू असफल बनले म्हणून फाळणी झाली असे म्हणून फाळणीचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याचा उद्योग इतर विवेचक करीत असतात. मुसलमान सुशिक्षितांच्या राजकीय प्रेरणांबाबत या विवेचनांचे अमाप अज्ञानच त्यातून प्रकट होते.
 याचा अर्थ हिंदूंचा दोष होता असे नव्हे. या देशाच्या सर्वधर्मीय राष्ट्रवादाची प्रतीके सतत हिंदू धर्मावर आधारित राहिली. भारताची अखंडत्वाची कल्पना हिंदूंच्या पवित्र भूमीच्या कल्पनेवर आधारलेली आहे. एक प्रकारे हे अपरिहार्यही होते. भारत म्हणजे अमेरिकेसारखा मागचा इतिहास नसलेला आणि हिंदूंनी नुकताच व्यापलेला ओसाड प्रदेश नव्हता. ऐतिहासिकण आणि धार्मिक परंपरांचे सातत्य हिंदू समाज मानीत आला यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. जगातला कुठलाही समाज ते मानतोच. खरा प्रश्न हिंदूंचा राष्ट्रवाद सर्वसमावेशक होता की नाही हा आहे. या राष्ट्रवादाची हिंदू प्रतीके हळूहळू गळून पडत होती आणि एक आधुनिक राष्ट्रवाद आकार घेत होता. नेहरू हे या धार्मिक प्रतीकांपासून अलग असलेल्या हिंदूंच्या आधुनिकतेच्या प्रवाहाचीच निर्मिती होती. मुसलमान सुशिक्षितांचा त्यांच्या आधुनिक राष्ट्रवादी कल्पनांना प्रतिसाद का मिळाला नाही?
 हिंदू जर आपल्या परंपरांचे सातत्य मानतात तर मुसलमानांनी ते मानणे हे अस्वाभाविक नव्हते. गेल्या सात-आठशे वर्षांच्या इतिहासात त्यांची मने रेंगाळत होती. या भूतकाळापासून संपूर्ण अलग होणे त्यांनाही शक्य नव्हते. परंतु नेहरूंच्या रूपाने आपल्या धर्मकल्पनांपासून ऐतिहासिक पुनरूत्थापनाच्या जाणिवेतून अलग झालेला जसा हिंदू धर्म अस्तित्वात आला तसा मुसलमानांत का निर्माण होऊ शकला नाही?
 याबाबत गांधीजींना दोष देण्याची एक फॅशनच हिंदू-मुस्लिम प्रश्नाकडे हळव्या प्रेमभावनेने पाहणाऱ्या टीकाकारांत पडली आहे. गांधीजींनी हिंदू धार्मिक प्रतीके वापरली. आधुनिक मुसलमान सुशिक्षित त्यामुळे दुरावले असा टीकाकारांचा एक आक्षेप असतो. परंतु धार्मिक प्रतीके वापरणाऱ्या गांधींकडे मुसलमानांच्या धार्मिक प्रतीकांचा आधार घेणारे मौ. आझाद आकृष्ट झाले. धार्मिक प्रतीके फेकून दिलेले नेहरू आणि धर्मवादी नसलेले ज्यू एकत्र का येऊ शकले नाहीत? हिंदमुस्लिम प्रश्नांचे स्वरूप नीट समजण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल आणि मुसलमान सुशिक्षितांच्या ऐतिहासिक मनोवृत्तीत शोधूनच ते सापडेल.

 मुसलमान समाजाच्या आधुनिकतेचा आरंभ अलीगढ चळवळीने झाला. मुसलमानांचा मागासलेपणा हे अलीगढच्या आंदोलनाचे कारण होते. ते मुसलमानी आधुनिकतेचा आरंभ करणारेही होते. त्याचबरोबर या आंदोलनाला असलेल्या ऐतिहासिक अहंगंडाने ते पाकिस्तानच्या

५०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान