पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाले. दलवाई यांच्या निवेदनाशी विसंगत असा एखादा शब्दही येता कामा नये अशी खबरदारी घेण्याचा प्रयत्न करून हा दोन पानांचा मजकूर कंसात टाकला आहे. तो हमीद दलवाईंनी लिहिलेला नाही, परंतु वाचकांना उपयुक्त व्हावा म्हणून तटस्थ भूमिकेतून केवळ काही घटनांचा उल्लेख केला आहे. इतके स्पष्टीकरण दिल्यावर त्यावर आक्षेप येणार नाही अशी आम्ही आशा करतो. हमीद दलवाई हे त्यांचे लेखन प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याच्या पहिल्या मसुद्यात आवश्यक त्या सुधारणा करीत. या पुस्तकाचे लेखन झाल्यावर हमीद दलवाई हे फार आजारी पडले. त्यामुळे या पुस्तकातील लेखनावर त्यांचा अखेरचा हात फिरलेला नाही. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या आहेत, हे वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती. विशेषत: ‘समारोप' हे अखेरचे प्रकरण घाईने संपविल्यासारखे वाटते. हमीद दलवाई यांच्या निधनामुळे ही अपूर्णता राहिली आहे. असे असले तरी हमीद दलवाई यांचे विचार आहेत तसे देणे हेच प्रकाशकाचे नैतिक कर्तव्य आहे असे मी मानतो. म्हणून हमीद दलवाई यांचे अप्रकाशित लेखन उपलब्ध झाले. ते जसे आहे तसे 'साधना प्रकाशन' प्रसिद्ध करीत आहे. मेहरुन्निस्सा दलवाई यांच्या विनंतीवरून या पुस्तकाला भाई वैद्य यांनी प्रस्तावना लिहिली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. तसेच या पुस्तकाच्या निर्मितीस ज्या सर्व मित्रांचे साहाय्य झाले त्यांचे आणि मुखपृष्ठकार शेखर गोडबोले व अमीर शेख यांचेही मनःपूर्वक आभार.

ग. प्र. प्रधान

१ मे २००२

४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान