पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतिहासाचा गौरवशाली भाग मान्य करण्याइतके निरपेक्ष मन बाळगून असतात. अकबर आणि औरंगजेब यांच्यात ते फरक करू शकतात. पानिपतच्या लढाईत अब्दालीचे सेनाकुशलत्व मराठी लेखक मोकळ्या मनाने मान्य करू शकतो. औरंगजेबाच्या टाचेखाली पंचवीस वर्षे भरडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील एक इतिहासकार प्रा. न. र. फाटक औरंगजेबाची धार्मिक असहिष्णुता आणि त्याचे कर्तृत्व यांच्यात फरक करायला मराठी समाजाला सांगू शकतो. अफजलखानाने शिवाजीला ठार मारण्याचा कट केला आणि शिवाजी बेसावध होता हा समज चुकीचा आहे. शिवाजीने ठरवून अफजलखानाला ठार मारले असे महाराष्ट्रातील एक लेखक प्रा. नरहर कुरुंदकर सांगू शकतात. (पहा - 'स्वामी' या रणजित देसाई यांनी लिहिलेल्या कादंबरीची प्रस्तावना.) शिवाजीविषयींचा त्यांचा आदर इतिहासाचा विपर्यास करण्याकडे कल घेत नाही.
 'Continent of Circe' या निराद चौधरी यांच्या पुस्तकातील एका विवेचनाचा येथे उल्लेख करणे अप्रस्तुत ठरणार नाही. 'भारतीय उपखंड शापित आहे' ही निराद चौधरी यांची आपल्या सिद्धांतामागील मध्यवर्ती कल्पना आहे. या उपखंडात आर्य आले आणि असेच शापित, अध:पतित आणि भ्रष्ट बनले. आसाममधील बंगाल्यांविरोधी झालेल्या दंगलीबद्दल लिहिताना ते म्हणतात, 'एक दिवस आसाम उठले आणि बंगाल्यांवर तुटून पडले. त्यांनी 'बंगाल खेडा' (बंगाल्यांनो, चालते व्हा) अशी ललकारी दिली.' वस्तुत: 'बंगाल खेडा' ही बंगालीची आसामीमधील भ्रष्ट शब्दयोजना होती. बंगाली भाषेतूनच आसामी भाषा निर्माण झाली. आसाम्यांनी माणसे ठार केली, स्त्रियांवर अत्याचार केले, घरेदारे जाळली. ते हिंदू होण्यापूर्वी असे वागत नव्हते. 'जगा आणि जगू द्या' असे अहोम राजांच्या काळी त्यांचे वागणे होते. 'बंगाली हिंदूंनीच आसाम्यांना जरी संस्कृतीत आणले नसले तरी हिंदू संस्कृतीत खचित आणले.' या शेवटच्या वाक्यातील खोच महत्त्वाची आहे. निराद चौधरी 'संस्कृती' आणि 'हिंदू संस्कृती' यांत फरक करतात. कारण हिंदू संस्कृती अध:पतित, भ्रष्ट आहे, ती काही संस्कृती नव्हे असे ते प्रतिपादन करतात. हे प्रतिपादन बरोबर की चूक हा मुद्दा नव्हे. हिंदू मन कसे अंतर्मुख बनू शकते याचे हे निदर्शक आहे. ते आपल्या दोषांकडे पाहत असते. दोष घालविण्याचा अट्टाहास ते करीत असते. केवळ चिकित्सक आणि निबंधमुक्त समाजातच हे शक्य आहे.

 हिंदू समाजाला हे स्वरूप सहजासहजी लाभलेले नाही. हिंदू धर्मश्रद्धा आणि चातुर्वर्ण्याची समाजव्यवस्था यांच्याविरुद्ध गेले एक शतक हिंदू विचारवंत आणि बुद्धिवादी यांनी घनघोर युद्ध चालविले आहे. या युद्धातूनच हिंदू उदारमतवादाची निर्मिती झालेली आहे. या उदारमतवादाला मानव्याचे स्वरूप लाभले आहे आणि म्हणून अमेरिकन 'टाइम, साप्ताहिकाने म्हटल्याप्रमाणे इतिहासाच्या पूर्वग्रहांपासून संपूर्ण अलिप्त असलेले नेहरू त्या समाजात निर्माण होऊ शकले आणि अतिरिक्त, अनेकदा आपल्या समाजाच्या हिताला तिलांजली देणाऱ्या, मानवतावादी भूमिकेचा आविष्कार गांधीजींच्या रूपाने होऊ शकला. “पाकिस्तानात काय होते आहे हे मला सांगू नका. भारतात एकाही मुसलमानाला मान खाली घालून चालण्याची पाळी येता कामा नये. त्यांची बळकावलेली प्रार्थनास्थळे त्यांना परत मिळाली पाहिजेत.

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /४७