पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेधर्मशास्त्राची हिंदूविरोधी दिशा बनविली, हिंदूंना कनिष्ठ लेखण्याचे, त्यांचा द्वेष करण्याचे मुसलमानांना शिकविले हा खरा वलिऊल्लाविरुद्ध आरोप आहे. त्याकरिता अब्दालीला लिहिलेल्या पत्राचा पुरावा देण्यात येतो. हा पुरावा सबळ नसला तरी वलिऊल्ला हिंदूंना समान लेखण्याचे मुसलमानांना शिकवीत होता असे काही सिद्ध होत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की वलिऊल्ला हिंदूविरोधी होता हे मान्य करण्याचे टाळण्यासाठी ह्या मंडळींनी हा चमत्कारिक कायदेबाज युक्तिवाद केला आहे.
 जिझियाचे जवळजवळ सर्वच मुसलमान विचारवंत आणि इतिहासकार समर्थन करीत असतात. या समर्थनाकरिता ते करीत असलेला युक्तिवाद मोठा अजब असतो. जिझिया हा महसूल कर होता असा शोध निझामींनी आपल्या वरील पुस्तकात नमूद केला आहे: त्याचबरोबर फिरोजशहा तुघलखच्या फतव्यात हिंदू कलिमा पढले (म्हणजे मुसलमान झाले) तर त्यांच्याकडून जिझिया वसूल करू नये असे म्हटल्याचेही नमूद करतात. हिंदू-मुस्लिम सामाजिक संबंधाचा विचार करताना त्यांनी मुसलमानांनी हिंदू स्त्रियांशी लग्ने केल्याचा दाखला दिला आहे. मुस्लिम स्त्रियांनी हिंदूंशी लग्ने केल्याचा पुरावा ते देत नाहीत. विजेता समजणारा समाज गुलाम प्रजेच्या बायकांशी लग्ने लावतोच. त्यात सामाजिक समता कुठे येते हे कळणे कठीण आहे. भुत्तो यांनी आपल्या Myth of Independence या पुस्तकातदेखील हाच युक्तिवाद केला आहे. प्रा. मुजिद यांच्यासारखा अतिशय उदारमतवादी विचारवंत औरंगजेबाच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्याची केविलवाणी धडपड करतो तेव्हा इतिहासातून बाहेर पडणे, आपल्या इतिहासाकडे निरपेक्ष तटस्थ दृष्टीने पाहणे मुसलमानांना अजून कसे शक्य नाही याची विदारक जाणीव होते. (पहा - 'Indian Muslims' लेखक प्रा. ए. ए. मुजिद. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया लादला तरी इतर कर कमी केले असे हास्यास्पद विधान त्यांनी केले आहे, तर इतर काही मुसलमान लेखक जिझिया कर देऊन सैन्याच्या नोकरीतून वगळले जाण्याचे स्वातंत्र्य हिंदूंना होते असे म्हणतात. वस्तुतः याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. हिंदूंना समान नागरिकत्वाचे अधिकार नसल्याचे हे द्योतक आहे. गुलामांना सैन्यात न घेण्याची नेहमीच खबरदारी घेतली जाते. मुजिद यांचे विधान तर अधिक हास्यास्पद आहे. हा प्रश्न धार्मिक पायावर केल्या गेलेल्या अन्यायाचा आहे, आर्थिक नव्हे भारतीय मुसलमानांना इतर सगळे कर माफ केले आणि ते केवळ मुसलमान असल्याबद्दल. त्यांच्यावर एक वेगळा कर लादला तर मुजिद यांची प्रतिक्रिया काय होईल, हे समजून घेणे मनोरंजक ठरेल.)

 मुसलमान लेखकांच्या युक्तिवादाचे प्रकार ठरून गेले आहेत. आधी ऐतिहासिक सत्य नाकारावयाचे, अधिकृत पुराव्याबद्दल शंका घ्यावयाची, आपण तो पुरावा सादर केला तर त्याच्या अस्सलपणाबद्दल शंका घ्यायची आणि हे शक्य झाले नाही तर तो पुरावा अपवादात्मक आहे, विशिष्ट काळाच्या वस्तुस्थितीचा निदर्शक नाही, अशी भूमिका घ्यावयाची आणि तीही घेता आली नाही तर तसे घडण्याची काही कारणे होती असे म्हणून आपली एक काल्पनिक कारणपरंपरा सांगणारी बचावात्मक भूमिका घ्यायची; मात्र मुसलमान इतिहासावरील टीकाकारांचा एकही आक्षेप मान्य करावयाचा नाही. (यालाच प्रा. महेश्वर करंदीकर आपल्या 'Islam in India's Transirion to Modernity' या पुस्तकात 'कलाम' म्हणतात.)

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /३१