पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


काही तार्तार गटागटाने मास्कोकडे येण्यास निघाले होते. परंतु रशियन सरकारला या निदर्शनाची चाहूल लागली आणि रस्त्यात वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनांवर गुप्त पोलिसांनी त्यांना उतरवून सैबेरियात परत पाठविले.) चीनमध्येदेखील सिंक्यांग या मुसलमान बहुसंख्यांक वस्तीच्या प्रदेशातील ऊहूर जमातींनी बंड केलेच आहे. खुद्द चीनमध्ये मुसलमानांची संख्या आठ टक्के आहे आणि तेथील मुसलमानांचा धर्मवाद चीनच्या आधुनिक राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेत अडथळा बनलेला आहे. (चीनमधील मुसलमान प्रश्नाच्या अधिक विवेचनासाठी पहा - 'माणूस')

 अनेक मुसलमानी राष्ट्रांत अल्पसंख्यांक जमाती फारशा नाहीतच. जेथे त्या बऱ्याच संख्येने आहेत तेथे सहजीवन पुरते साध्य झालेले नाही. सुदानमधील दक्षिण विभागातील ख्रिश्चनांविरुद्ध सुदानी सरकारने गेली कित्येक वर्षे लष्करी कारवाई चालविलेली आहे. लेबॅननमध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान जवळजवळ सारख्याच प्रमाणात आहेत आणि १९५६ साली त्यांच्यात यादवी युद्ध झाले होते. इराकमधील कुरदी बंडखोरांचे बंड कठोरपणे दडपण्याचे प्रयत्न इराकने चालविले आहेत आणि नायजेरियातून फुटून निघालेल्या बायाफ्राला नुकतेच चिरडून टाकण्यात आले आहे. थोडक्यात, मुसलमान जिथे अल्पसंख्यांक आहेत तिथे ते बहुसंख्यांकांशी जुळते घेत नाहीत आणि जिथे बहुसंख्यांक आहेत तिथे इतरांना सामावून घेऊ शकत नाहीत, असे हे दृश्य आहे. इस्लामचे वेगळेपणाचे स्वरूप नष्ट झाल्याखेरीज या परिस्थितीत बदल होणार नाही.

 हा वेगळेपणा धर्मशास्त्राच्या भूमिकेतून आला आहे आणि धर्मशास्त्र टीकेपासून, चिकित्सेपासून अद्याप सुरक्षित राहिले आहे. प्रेषित, त्यांचे आयुष्य आणि इस्लामचा इतिहास यांच्याबद्दल निरपेक्ष भावनेने बोलणारा मुसलमान विचारवंत मी अजून पाहिलेला नाही; चिकित्सा तर दूरच राहिली. मुसलमानांची मने इतिहासाने अद्याप विलक्षण भारलेली आहेत. ती इतिहासात एवढी डुंबलेली असतात की ती प्रदेशाची आणि भूगोलाची क्वचितच जाणीव बाळगतात. यामुळेच भारतातील मुसलमानांनी बहुसंख्यांक मुसलमान प्रदेशात होणाऱ्या 'पाकिस्तान' या राष्ट्राच्या निर्मितीच्या आंदोलनात भाग घेतला. वेगळ्या प्रदेशात राष्ट्रनिर्मितीचे कार्य, जे त्या राष्ट्राचे नागरिक भूगोलाच्या मर्यादेने करू शकत नाहीत अशांनी करण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असेल. (इस्रायलची निर्मितीदेखील बाहेरील ज्यूंनी केली आहे. परंतु या दोन भूमिकांत बराच फरक आहे. पॅलेस्टाइन ही मायभूमी ते मानत होते आणि तेथे स्थायिक होण्याचे उद्दिष्ट त्यांनी बाळगले होते. भारतीय मुसलमान भारतात राहणार हे त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रवादाला आपला राष्ट्रवाद मानताना गृहीत धरले होते.)

 इस्लामी धर्मशास्त्राचे स्वरूप नीट पाहिल्याखेरीज मुसलमानांच्या मनाची ही अवस्था समजू शकणार नाही. इस्लाम हा अखेरचा आणि खरा धर्म आहे असे मुसलमान मानतात. प्रेषित महंमद ‘हिरजा' पैगंबर आहे अशीही मुसलमानांची धार्मिक श्रद्धा आहे. सर्वच धर्म आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत अशी त्या त्या धर्मीयांची श्रद्धा असते. त्यामुळे ऐहिकदृष्ट्या समानतेने वागताना अडथळा येण्याचे कारण नाही. परंतु कुराण एवढेच म्हणून थांबत नाही. इतर धर्म अपूर्ण आहेत, अशुद्ध स्वरूपात आले आहेत, अशी कुराणात वचने आली आहेत.

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /३९