पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुस्लिम राष्ट्रांनी केलेला विरोध आणि मुस्लिम समाज जिथे अल्पसंख्यांक आहे तिथे, विशेषत: फिलिपाईन्स आणि इथिओपिया येथील, फुटीरपणाच्या चळवळीला आणि बंडाळीला अनेक मुस्लिम राष्ट्रे धार्मिक भूमिकेतून देत असलेला पाठिंबा ही या मानसिक प्रवृत्तीची काही ठळक उदाहरणे आहेत. जागतिक मुसलमान राष्ट्रांचे राजकीय संघटन करण्याचे इस्लामी परिषदेचे अगदी अलीकडे चालू असलेले प्रयत्न याच भावनेतून होत आहेत. खिलाफतीच्या काळात हजारो भारतीय मुसलमानांनी देशत्याग करून अफगाणिस्तानात प्रवेश केला तो याच भावनेने. अफगाण सरकारने त्यांना घेतले नाही ही गोष्ट वेगळी.) ज्या देशात मुसलमान अल्पसंख्यांक आहेत तेथे त्या राष्ट्रांच्या राष्ट्रजीवनात ते समरस होऊ शकलेले नाहीत. अशा जवळजवळ सर्वच राष्ट्रांपुढे मुसलमानांच्या एकात्मतेचा प्रश्न डोकेदुखीचा होऊन बसला आहे. जेथे मुसलमान अल्पसंख्यांक आहेत परंतु त्या देशाच्या विशिष्ट प्रदेशात दाटलेले आहेत, तेथे त्यांनी बंडाचे निशाण उभारले आहे आणि आपली वेगळ्या राष्ट्राची चळवळ चालविली आहे. फिलिपाईन्स आणि इथिओपिया ही याची उदाहरणे आहेत. फिलिपाईन्समध्ये मुसलमान लोकसंख्येचे प्रमाण चार टक्के आहे, परंतु ते एका बेटात बहुसंख्यांक असल्यामुळे तेथे फुटून निघण्यासाठी सशस्त्र उठाव करण्यात आला आहे आणि काही मुसलमान राष्ट्र फुटीरवादी मुसलमान तरुणांना घातपाताचे शिक्षण देत आहेत व शस्त्रपुरवठा करीत आहेत, असा जाहीर आरोप काही महिन्यांपूर्वीच फिलिपाईन्सच्या सरकारने केला आहे. इथिओपियाच्या सोमालियाला लागून असलेल्या एरिटेरियाच्या प्रदेशात मुसलमान बहुसंख्यांक आहेत. एरिटेरियाचे स्वतंत्र राष्ट्र करण्यासाठी तेथील मुसलमानांनी सशस्त्र उठाव केलेला आहे. (इथिओपियातील मुस्लिम प्रश्न भारताप्रमाणे फाळणी करून सोडवावा अशा सूचना मुस्लिम नियतकालिके करीत आहेत, हे सूचक आहे.) काही महिन्यांपूर्वी या घातपात्यांनी पाकिस्तानच्या कराची विमानतळावर इथिओपियन एअरवेजच्या विमानाची मोडतोड केली. सोव्हिएत रशिया आणि चीन या देशांत कम्युनिस्ट राज्यव्यवस्था अस्तित्वात आहे आणि तेथे धार्मिक उठाव करणे एका पक्षाच्या शासनावरील अनियंत्रित सत्तेमुळे कोणत्याही गटाला अवघड आहे. परंतु साम्यवादाच्या प्रयोगाला पन्नास वर्षे उलटून गेली तरी सोव्हिएत रशियातील मुसलमान समाजाची एकात्मता आपण अजून घडवून आणू शकलेलो नाही याची जाणीव रशियन राज्यकर्त्यांना आता झालेली दिसते. रशियन कार्यकर्ते ख्रिश्चन आणि अन्य धर्मीयांच्या मनावरील धर्माचा प्रभाव काहीसा कमी करू शकले, परंतु मुसलमान समाजाबाबत त्यांना तेवढे यश आलेले नाही. दुसऱ्या महायुद्धात आक्रमक जर्मन सैन्याला कॉकेशस आणि क्रिमियामधील तार्तार आणि इंगोची या मुसलमान जमाती उघडपणे सामील झाल्या. इंगोची जमातीचे तर एक डिव्हिजन सैन्य उभे केले आणि ते जर्मनांच्या बाजूने रशियनांशी लढले. (जर्मन सैन्याला मागे रेटल्यानंतर स्टॅलिनने या जमातीवर कठोर सूड घेतला. इंगोची जमात संपूर्णपणे निर्वंश करण्यात आली आणि क्रिमियामधील तात्र जमातीचे बायकामुलांसह सैबेरियात स्थलांतर करण्यात आले. क्रुश्चेव्हने यातील काही जमातींना पुन्हा त्यांच्या प्रदेशात वसवले. मात्र तारिना अद्यापही क्रिमियातील त्यांच्या मायदेशात जाऊ दिलेले नाही. लेनिनच्या जन्मशताब्दिनिमित्ताने आपल्याला क्रिमियात वसविण्याची मागणी निदर्शनाने करण्यासाठी

३८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान