पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेसत्ता आणि धर्म यांच्या संयुक्त स्थापनेचे सखोल परिणाम मुसलमान मनावरून आजदेखील पुसले गेलेले नाहीत. मुसलमान समाज सतत सत्ताभिमुख असण्याचे हे प्रमुख कारण आहे. मुसलमान मनाची ही ठेवण बदलताना धर्मशास्त्र फारसे उपयोगी पडत नाही आणि तसा फरक दाखविणारे वचनदेखील अस्तित्वात नाही. ('जे सीझरचे आहे ते सीझरला द्या आणि जे ईश्वराचे आहे ते ईश्वराला द्या.' हे ख्रिस्ताचे वचन धार्मिक मूल्यात बदल घडवून आणण्यासाठी ख्रिश्चनांना उपयोगी पडले. प्रेषितांचे असे एक वचन अस्तित्वात आहे. परंतु ते हादीसमधील आहे आणि त्याच्या विश्वसनीयतेबद्दल परंपरागत उलेमांनी शंकाच बाळगली आहे. अर्थात अशा प्रकारच्या वचनांपेक्षा इतिहासातील आदर्श आणि कुराणातील जिझिया लादण्याची वचने अधिक बलवत्तर ठरली आहेत.) पुढे उमर खलिफाच्या काळात, तेव्हा अस्तित्वात असलेल्या इस्लामी राज्याच्या प्रदेशातून, ज्यू आणि ख्रिश्चनांची हकालपट्टी झालेली आहे. (पाकिस्तानच्या निर्मितीनंतर तेथील हिंदू अल्पसंख्यांकांविरुद्ध झालेले क्रौर्य आणि त्यांची एकजात भारतात करण्यात आलेली हकालपट्टी यांच्यामागे उपखंडातील मुसलमान मनापुढे असलेला उमर खलिफाचा हा आदर्श आहे.) मागाहून खलिफांची सद्दी संपली आणि वेगवेगळी मुसलमानी राज्ये अस्तित्वात आली. सर्व अरब जगदेखील एका राष्ट्रात गुंफून राहिलेले नाही. तथापि आजच्या आधुनिक राष्ट्रवादाच्या काळातदेखील प्रत्येक इस्लामी (जगातील) देशातील राष्ट्रवादाला इस्लामचे अधिष्ठान लाभलेले आहे आणि मुसलमान समाज धार्मिक राष्ट्रवादच मानीत आलेला आहे. इंडोनेशिया आणि तुर्कस्तान वगळता कोणत्याच देशात धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था अस्तित्वात नाही आणि इतरधर्मीय नागरिकांना संपूर्ण समान नागरिकत्व बहाल केलेले नाही. तुर्कस्तानातदेखील राष्ट्रीयत्वाला तुर्की वंशाचा आधार दिलेला आहे आणि तेथील धर्माऐवजी वंशावर दिलेला भर चलाख आहे, कारण तुर्की वंशाचेच नागरिक तेवढे मुसलमान आहेत.

 तुर्कस्तानमधील धर्मनिरपेक्षतेच्या प्रयोगाचे बरेच कौतुक केले जाते आणि तुर्की मुसलमान समाजाला जुनाट धर्मश्रद्धेतून बाहेर काढण्याच्या आणि आधुनिक बनविण्याच्या संदर्भात ते बरोबरही आहे. परंतु परस्परसमान मानवी संबंधाच्या आणि आधुनिक मानवी मूल्यांच्या कसोटीला तुर्की धर्मनिरपेक्षतेचा हा प्रयोग लावला असता निराशाच पदरी येते. तुर्कस्तानातील हा बदल केवळ आधुनिक सामर्थ्यवान समाज बनविण्यासाठीच झालेला आहे. त्याला उदार मानवतावादी स्वरूप कधीच नव्हते. केमाल पाशाने ग्रीक ख्रिश्चनांची कत्तल केली. अनातोलियामधील ख्रिश्चन वस्ती साफ नष्ट करण्यात आली. उरलेल्यांची ग्रीसबरोबरील लोकसंख्येच्या अदलाबदलीत रवानगी करण्यात आली. जे काही थोडे आता राहिले आहेत त्यांना सामावून घेतलेले नाही. अदनान मेंदेरिस पंतप्रधान असताना या ग्रीकांविरुद्ध प्रचंड दंगली झाल्या. या दंगली मेंदेरीस यांनी घडवून आणल्या असे मागाहन लष्करी राजवटीने त्यांच्यावर भरलेले खटल्याच्या चौकशीत सिद्ध झाले. (जीनांचा आदर्श केमाल पाशा होता हे या संदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांनाही धर्मशास्त्रावर आधारलेले राज्य नकोच होते. पाकिस्तानातील जीनांपासून आजवरच्या मुसलमान राज्यकर्त्यांच्या वर्तनाची या दृष्टीने चिकित्सा होणे आवश्यक आहे. ती पाकिस्तानवरील प्रकरणात मागाहून पाहू.)

३६/मुसलमानांच्या धार्मिक चळवळी