पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेप्रक्रिया मुसलमान समाज इस्लामच्या आदर्शापासून ढळल्यामुळे थंडावली असे धर्मनिष्ठ मुसलमानांनी मानले. सामाजिक अध:पतनाचा हा परंपरागत मुसलमान लावीत असलेला अर्थ मात्र सर्वसामान्य अर्थाहून अगदीच वेगळा आहे. आधुनिक काळाच्या आव्हानानुसार बदलण्याचे सामर्थ्य न दाखविल्यामुळे समाज अध:पतित होतात. मुसलमानांच्या मते आधुनिक काळात जुन्या श्रद्धांना चिकटून राहण्याची कुवत न दाखवल्यामुळे समाज अध:पतित होतो. आदर्श अवस्था पुन्हा यावी असे वाटत असल्यास जुने आदर्श पुन्हा बाणवण्याची कोशिश केली पाहिजे, म्हणजेच इतिहासात मागे गेले पाहिजे. थोडक्यात प्रबोधनाऐवजी पुनरुत्थानाची कास धरली पाहिजे. म्हणून इस्लाममध्ये पुनरुत्थानवादी चळवळींचा इतर धर्मांच्या तुलनेने अधिक प्रभाव आहे.
 इतिहासाची ही वेगळी प्रक्रिया हेच मुसलमान समाजातील पुनरुत्थानवादी शक्ती प्रबळ असण्याचे एकमेव कारण नव्हे. इस्लामच्या स्थापनेच्या इतिहासाचा आणि धर्मशास्त्राच्या स्वरूपाचादेखील त्याच्याशी संबंध आहे. प्रेषित महंमद हे धर्माबरोबर राज्याचीदेखील स्थापना करणारे पहिले प्रेषित आहेत. आपल्या मृत्यूनंतर इस्लामचे हे राज्य कसे चालावे, धर्म आणि राज्य यांचे संबंध कसे असावेत यासंबंधी कोणतेच मार्गदर्शन त्यांनी केलेले नाही. त्यांच्या हयातीत राज्याचे नियम बदलत गेलेले आहेत. ते मदिनेला आल्यानंतर मदिनेमधील ख्रिश्चन आणि ज्यू यांजबरोबर त्यांनी 'महिदा' या नावाने करार केला आणि त्यांना धर्म पाळण्याचे अभय दिले. (हा करार 'महिदा' या नावाने ओळखला जातो. या वेळी ज्यूंनी आपल्या पद्धतीप्रमाणे जेरूसलेमकडे तोंड करून नमाज पढावी आणि आम्ही मुसलमान मक्केकडे तोंड करू असे प्रेषितांनी म्हटले. परंतु ज्यूंनी ते मानले नाही. मुसलमानांनीदेखील आमच्याप्रमाणेच प्रार्थना करताना जेरूसलेमकडे तोंड केले पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला आणि प्रेषितांनी तो मान्य केला. आपण जेरूसलेमकडे तोंड करणार असाल तर आम्हीही तिकडेच तोंड करू असे त्यांनी म्हटले. मुसलमान या राज्यात अल्पसंख्यांक होते आणि स्वत: प्रेषित तेथे परके होते. प्रेषितांच्या या दूरदर्शीपणाची भारतीय मुसलमानांच्या वर्तनाशी तुलना करणे मनोरंजक ठरेल. भारतीय मुसलमान बहुसंख्यांकांशी जुळते घेत नाहीत. उलट बहुसंख्यांकांनी त्यांच्या इच्छाआकांक्षांशी जुळते घेतले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि म्हणून आपली भाषा, आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज आणि आपली राष्ट्रीय इच्छा-आकांक्षा यांच्याशी बहुसंख्यांक हिंदूंनी समरस व्हावे असे त्यांचे म्हणणे आहे.) "तुमचा धर्म तुम्हाला प्यारा आणि माझा धर्म मला प्यारा' हे कुराणातील वचन मदिना येथे 'अवतरले' आहे. परंतु इस्लामला संख्याबळ प्राप्त झाल्यानंतर आणि ते मक्केत गेल्यानंतर बिगरमुसलमानांना अवमानित करण्यासाठी जिझिया कर लादला. (पहा - पवित्र कुराण, सुरा ९, आयत २९.) बिगर मुसलमानांविरुद्ध जेहाद (धर्मयुद्ध) करण्याचा आदेश, प्रेषित मक्का येथे असताना, पवित्र कुराणात आलेला आहे. (पहा - पवित्र कुराण.)

 मदिना येथे झालेल्या करारात ज्यू आणि ख्रिश्चनधर्मीयांना धर्मस्वातंत्र्य दिलेले होते. याचा अर्थ ते इस्लामच्या या पहिल्या राज्याचे सन्माननीय समान नागरिक नव्हते. जिझिया त्यांना द्यावा लागत होता आणि जीवित व मालमत्तेची हा कर देऊन हमी मिळाली होती.

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /३५