पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेफक्त ख्रिश्चन माणसाला मुक्ती मिळते अशी त्यांची श्रद्धा आहे. किंबहुना प्रत्येक धर्मीय आपला धर्म श्रेष्ठ आहे.असेच म्हणतात. तथापि ख्रिश्चनधर्मीयांनी धर्माला राजकीय विचारसरणी बनविलेले नाही. राज्य आणि धर्म यांच्यात ते फरक करतात. आपले नागरिकत्व आणि आपला धर्म या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असे ते मानतात. आज ते सक्तीच्या धर्मांतराचे समर्थन करीत नाहीत आणि धर्मयुद्धाने धर्म फैलावण्याची आकांक्षा त्यांनी बाळगलेली नाही. ख्रिश्चनांच्या दृष्टीने धर्मयुद्धाचे युग संपलेले आहे. मुसलमानांच्या दृष्टीने ते अजून संपलेले नाही.
 या दोन धर्मीय परंपरांचा अधिक सविस्तर विचार करणे येथे योग्य ठरेल. ख्रिश्चन धर्माला युरोपच्या आधुनिकतेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. ही आधुनिकतादेखील ख्रिश्चनांनी सहजासहजी कमावलेली नाही. अरबांच्या आणि तुर्काच्या हातून अनेक धर्मयुद्धांत झालेल्या पराभवांचे तीव्र पडसाद युरोपातील ख्रिश्चन समाजावर उमटले. इ.स. १४५३ साली कॉन्स्टॅन्टिनोपल तुर्कानी जिंकल्याचा धक्का ख्रिश्चन समाजाला जबरदस्त जाणवला. पोपची सत्ता झुगारून देऊन पर्यायाने धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांची फारकत झाली. रेनेसाँने प्रॉटेस्टन्ट पंथाला जन्म दिला आणि ख्रिश्चन धर्माचे स्वरूप पालटून टाकले.
 या ऐतिहासिक प्रक्रिया जागतिक इस्लाममध्ये होऊ शकल्या नाहीत. इस्लामी सत्तेला विजयाची जशी परंपरा आहे अशी पराभवाची नाही. इस्लामची मध्यवर्ती सत्ता कधी उखडली गेली नाही आणि जेव्हा कधी उखडली गेली तेव्हा दुसऱ्या ठिकाणी दुसरी (इस्लामी सत्ता) उभी राहिलीच. प्रतिकूल काळात मुसलमानांच्या धर्मश्रद्धा अतिशय चिवट ठरल्या. सक्तीच्या धर्मांतरानंतरदेखील ते प्रचंड संख्येने इस्लामच्या श्रद्धा गुप्तपणे बाळगत राहिले. (स्पेनमधील पराभवानंतर तेथे राहिलेल्या मुसलमानांवर ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन राज्यसत्तेने लादला. तथापि सुमारे ४० ते ५० वर्षे हा समाज गुप्तपणे इस्लाम मानीत होता. अखेरीला त्यांना मोरोक्कोत हद्दपार करण्यात आले.) मुसलमानांची मक्का-मदिना ही पवित्र धर्मक्षेत्रे इस्लामच्या स्थापनेपासून कधी परधर्मीयांच्या ताब्यात गेली नाहीत किंवा त्यांच्यावर हल्लाही झाला नाही. समाज अंतर्बाह्य ढवळून निघावा असे काही घडलेच नाही. पराभवाच्या धक्क्यापासून हा समाज अलिप्तच राहिला.

 एक प्रकारे हा समाज पराभूत झालाच आहे. इस्लामचा राज्यविस्तार हळूहळू खंडित ' झाला. धर्मविस्तार खुंटला. म्हणजे एक प्रकारे एक ज्योत पेटली आणि आपोआपच विझून गेली असे मुसलमानांना वाटते. (स्पेनमधील पराभव हा इस्लामच्या मध्यवर्ती सत्तेचा पराभव नव्हता. ती अपवादाने घडलेली घटना आहे असे मुसलमान मानतात.) इस्लामला पायबंद बसण्याची ही प्रक्रिया अशाप्रकारे घडली आहे की आपल्या धर्मश्रद्धाच हे आव्हान स्वीकारण्यास अपुऱ्या पडल्या, अडथळा ठरल्या हे मुसलमानांनी कधी जाणलेच नाही. (नेपोलियनने - . तुर्कस्तानच्या सुलतानाकडे रशियाविरोधी सहकार्य मागताना तुर्कस्तानचे सैन्य आधुनिक कवायती सैन्य बनविण्यासाठी मदत देऊ केली होती. तुर्की सुलतानाने उत्तर पाठविताना म्हटले आहे : "आपल्या मदतीबद्दल मी दरबारातील उलेमांचा सल्ला घेतला. मुसलमान काफीरांच्या (फ्रेंचांच्या) आज्ञा पाळू शकत नाही, म्हणून फ्रेंच कवायत शिकविणारे फ्रेंच शिक्षक बोलावू नयेत असा त्यांनी मला सल्ला दिला आहे.") उलट इस्लामच्या विस्ताराची

३४/मुसलमानांच्या धार्मिक चळवळी