पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/34

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेअल्लामा मश्रीकी हे जर्मनीत शिकून आलेले होते. पहिल्या युद्धानंतर युरोपात आणि विशेषतः जर्मनीत लष्करी धर्तीच्या स्वयंसेवक संघटना स्थापन होत होत्या. अल्लामा मश्रीकी यांची खाकसार चळवळ (डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील) युरोपमधील या घटनांचा भारतातील पडसाद होता युरोपातील राष्ट्रवाद हा अशा चळवळींना प्रेरणा देणारा ठरला. भारतात राष्ट्रवादाच्याऐवजी धर्मवाद ही अशा प्रकारच्या फॅसिस्ट चळवळींची प्रेरणा ठरली.
 या चारही धार्मिक संघटनांची धार्मिक आणि राजकीय विचारसरणी समजून घेणे . आवश्यक ठरेल. जमायत-ए-उलेमा, अहरार आणि जमात-ए-इस्लाम या तिन्ही संघटनांना शरियतवर राज्य हवे होते. भारतासारख्या देशात जेथे मुसलमान अल्पसंख्यांक आहेत तेथे शरियतवर आधारलेली राज्यव्यवस्था स्थापन होणे शक्य नाही याची त्यांना जाणीव होती. यांतील कोणताच गट राष्ट्रवाद मानीत नव्हता आणि सर्वधर्मीय समानता त्यांना मान्य नव्हती. किंबहुना राष्ट्रवाद ही संकुचित भावना आहे ही भूमिका या गटांची होती. भारतातील इतर समाज त्यांच्या दृष्टीने मुसलमानांना जवळचे होते. परंपरागत धर्मनिष्ठ मुसलमान जगाचे 'इस्लामी जग' आणि 'बिगर-इस्लामी जग' असे काल्पनिक विभाग मानतात, तेच हे गट मानीत होते. भारत ही मुसलमानांनी जिंकलेली भूमी आहे आणि आता ती पुन्हा ब्रिटिशांकडून जिंकून घेणे आवश्यक आहे ही सर्वांची, सिरहिंदी आणि वलिऊल्लाच्या ऐतिहासिक परंपरेतून आलेली, सैद्धांतिक भूमिका होती. ती जिंकण्याचे कार्य करण्याच्या मार्गांबाबत मात्र त्यांच्यात मतभेद होते. भारत इस्लाममय करणे हे या सर्व गटांचे अंतिम उद्दिष्ट होते, अजूनही आहे.
 हे उद्दिष्ट सिद्ध करण्याच्या मार्गाबाबत मात्र त्यांचे मतभेद होते. एक तर ब्रिटिश राजवट हटविली जाणे आवश्यक होते. ती हटविली गेल्यानंतर सत्ता आपोआप मुसलमानांच्या हातात येणे शक्यच नव्हते. ब्रिटिशांकडून भारतीयांना क्रमाक्रमाने देण्यात येत असलेल्या अधिकारांमुळे बहसंख्यांक या नात्याने सत्तेवर हिंदूंचा प्रभाव राहणे अपरिहार्य होते. येथे एक चमत्कारिक पेचप्रसंग, शृंगापत्ती या मंडळींपुढे उभी होती. प्रत्येक गटाने त्यातून वेगवेगळा मार्ग शोधला.
 जमायत-ए-उलेमाने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचे ठरविले. या उलेमांचे मत असे होते की काफिरांचे नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची लढाई लढावयास काहीच हरकत नाही. ब्रिटिश आणि हिंदू या दोघांशी एकाच वेळी मुसलमान लढू शकत नाहीत. मुसलमानांची तेवढी ताकद नाही. संख्याही नाही. याकरिता प्रथम हिंदूंशी सहकार्य करून, नव्हे हिंदंच्याच नेतृत्वाखाली, ब्रिटिश सत्ता आधी उखडून काढली पाहिजे. दरम्यान हिंदंबरोबर होणाऱ्या कोणत्याही राजकीय समझोत्यात अधिक सत्ता मिळविली पाहिजे. मुसलमानांच्या परंपरागत धार्मिक जीवनात कसलाच हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन घेतले पाहिजे आणि धर्मप्रसाराने मुसलमानांची संख्या वाढविली पाहिजे, असे जमायत-ए-उलेमांचे थोडक्यात धोरण सांगता येईल.

 धर्मप्रसाराने भारत इस्लाममय करण्याची कल्पना वरवर निरुपद्रवी वाटते हा ख्रिश्चनधर्मीय बाळगत असलेल्या आदर्शासारखाच आदर्श होता असे वाटण्याचा संभव आहे. धर्मप्रसाराच्या हक्काची ही कल्पना इतकी निरुपद्रवी नव्हती. ख्रिश्चनधर्मीय आपल्याला श्रेष्ठ समजतात आणि

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /३३