पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


त्याला इष्ट ते वळण लागणे शक्य नव्हते. गांधीजींनी पाठिंबा दिला नसता तर कदाचित तेव्हा हिंदू-मुसलमान समाजात मोठी दरी निर्माण झाली असती. सर्व मुसलमान समाज तेव्हाच मुस्लिम लीगच्या मागे कदाचित गेला असता. कदाचित तेव्हाच सुशिक्षित मुसलमान आणि धर्मनिष्ठ मुसलमान यांची एक अभेद्य फळी हिंदूंच्या विरुद्ध आणि काँग्रेसच्या विरुद्ध उभी राहिली असती. अखेरीला पाकिस्तानची मागणी पुढे येताच ती होण्याचे टळले नाही ही गोष्ट वेगळी. किंबहुना, अशी फळी निर्माणच झाली नाही. तिची आवश्यकताच उरली नाही. पाकिस्तानच्या मागणीने भारावलेला मुसलमान समाज धर्मनिष्ठांचे नेतृत्व झुगारून सुशिक्षित मुसलमानांकडे वळला. तो आधीच वळला असता तर पाकिस्तानचा आकार आजच्याहून कदाचित मोठा दिसला असता. गांधीजींना निदान एवढे श्रेय तरी दिले गेले पाहिजे. त्यांच्या टीकाकारांनी याकरिता तरी गांधीजींविषयी कृतज्ञता दाखविली पाहिजे.
 मात्र (अर्थात येथे) खिलाफतीचे समर्थन करता येणार नाही. ती उघडउघड धर्मनिष्ठ चळवळ होती. अरबांच्या न्याय्य राष्ट्रीय आकांक्षांचेविरुद्ध तुर्की साम्राज्यवादाला पाठिंबा देण्याची चुकीची भूमिका या चळवळीमागे होती. गांधीजींना हे अवगत झाले नव्हते असे नव्हे. या निमित्ताने मुसलमान समाजाला राष्ट्रीय आंदोलनात सहभागी करून घेता येईल अशी त्यांची अटकळ होती. गांधीजींनी मुसलमानांतील धार्मिक नेतृत्व बळकट केले आणि पर्यायाने आधुनिक सुशिक्षित मुसलमानी नेतृत्व कमकुवत केले हा आरोपही अडाणीपणाचा द्योतक आहे. खऱ्या अर्थाने आधुनिक धर्मनिरपेक्ष नेतृत्व मुसलमान समाजात तेव्हा अस्तित्वातच नव्हते. (आजदेखील नाही.) जे तथाकथित सुशिक्षित नेतृत्व करीत होते, त्यांच्यामागे मुसलमान समाज नव्हता. तसेच हे सुशिक्षित काँग्रेसमागे नव्हते हे कुणी समजूनच घेत नाही.
 मुसलमान समाजाला राष्ट्रीय आंदोलनात आणण्याचा गांधीजींचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. खलिफाचे उच्चाटन झाले. आणि खिलाफत चळवळ थंडावली. मुसलमान समाजाला हा जबरदस्त धक्का होता. पुन्हा राजकीय चळवळीपासून तो अलिप्त राहू लागला आणि खिलाफतीच्या काळात झालेल्या दंगलीने हिंदू-मुसलमान संबंध सुधारण्याऐवजी अधिक ताणले गेले.

 गांधीजींची अटकळ चुकीची ठरण्याला काही विशिष्ट ऐतिहासिक कारणे होती. उत्तर . भारतातील सुन्नी उलेमांची मुसलमानी इतिहासातून निर्माण झालेली धर्मनिष्ठ मने गांधीजींना तोपर्यंत ज्ञात नव्हती. याआधीचे त्यांचे आयुष्य दक्षिण आफ्रिकेंत भारतीयांचे नेतृत्व करण्यात गेले होते. तेथील मुसलमान प्रामुख्याने गुजरातेतील खोजा, मेमन आणि बोहरा या व्यापारी वर्गातील होते. उत्तर भारतातील मुसलमानांप्रमाणे या वर्गाला दारेसलामचे स्वप्न भेडसावीत नव्हते. शिवाय दक्षिण आफ्रिकेचे सरकार सर्वच भारतीयांना सापत्नभावाने वागवीत होते. आपल्या सत्तेचा तराजू ब्रिटिशांप्रमाणे मुसलमानांच्या बाजूने झुकता ठेवीत नव्हते. यामुळे गांधींजींच्याबरोबर सहकार्य केल्याने तेथील मुसलमानांना काही गमवावे लागत नव्हते. भारतातील या वेगळ्या ऐतिहासिक परिस्थितीची जाणीव गांधीजींना खिलाफत चळवळीतील हिंदुविरोधी दंगलींनी प्रथम झाली. कोहार येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने गांधी व मौलाना शौकत अली यांची एक चौकशीसमिती नेमली. गांधीजींना न

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /३१