पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजाची अवस्था अधिकच असहाय बनली होती आणि मुसलमान जनमनावर धर्मनेत्यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे हिंदू-मुसलमानांतील शैक्षणिक दरी अधिक वाढली असल्यास नवल नव्हते. अलीगढ विद्यापीठाच्या स्थापनेनंतर हळूहळू एक शिक्षित मुसलमान वर्ग निर्माण होऊ लागला. सर सय्यद अहमदखान यांच्या उदयानंतर व त्यांनी घेतलेल्या ब्रिटिशधार्जिण्या भूमिकेमुळे ब्रिटिशांची मुसलमान समाजाबाबतची भूमिकाही बदलू लागली. १८८५ साली। काँग्रेस स्थापन झाली. काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार हिंदूंचाच होता. हिंदू समाजात निर्माण .. झालेल्या या राजकीय जागृतीने ब्रिटिश सत्ताधारी अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. ब्रिटिशांचे धोरण आता हिंदूविरोधी आणि मुसलमानांना चुचकारणारे बनले.
 १८५७ ते १९१८ या काळात मुसलमान समाज राजकीय आंदोलनापासून अलिप्तचं राहिला. १९०५ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीगच्या स्थापनेकडे मुसलमान समाज आकर्षिला गेला नाही. १९१८ साली खिलाफत चळवळीच्या निमित्ताने मुसलमान समाजाने राजकीय आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाग घेतला.
 खिलाफत चळवळीचे नेतृत्व धार्मिक नेतेच करीत होते. मात्र मौलाना महंमद अली आणि मौलाना शौकत अली हे नेते ही अलीगढची निर्मिती होती. देवबंदच्या परंपरागत धर्मनेत्यांत त्यांचा समावेश होत नव्हता. आधुनिक शिक्षण घेतलेले हे दोघेही बंधू मनाने उलेमांप्रमाणेच कर्मठ आणि परंपरागत विचारांचे होते.

 खिलाफत चळवळीच्या संदर्भात गांधीजींना बराच दोष देण्यात येतो. पहिली गोष्ट अशी की गांधीजींनी खिलाफत चळवळ सुरू केली नाही. चळवळ अलीबंधूंनी सुरू केली. त्यांनी चळवळीला काँग्रेसचा पाठिंबा मागितला आणि गांधीजींनी तो विनाशर्त दिला. (पहा - India Wins Freedom' - Maulana Azad. भारताचे माजी चीफ ऑफ प्रोटोकॉल, श्री. एम. आर. बेग यांनी असा युक्तिवाद केला आहे. Humanist Reviews च्या जुलै-सप्टेंबर १९६९ च्या अंकात त्यांनी केलेल्या Islam in India's Transition to Modernity या पुस्तकाच्या परीक्षणात मलबारमधील हिंदू जमीनदारांनी ब्रिटिशांशी सहकार्य केल्यामुळे त्यांच्याविरोधी दंगे झाले, असे म्हटले आहे. हे मुसलमान प्रवक्त्यांच्या मुसलमान समाजाला दोष न देण्याच्या परंपरेला धरूनच आहे.) गांधीजींनी पाठिंबा दिला नसता तरी खिलाफत चळवळ होणारच होती आणि मुसलमानांचा तिला प्रचंड प्रतिसाद मिळणारच होता. मुसलमान कडव्या धर्मनिष्ठेची आणि हिंदूविरोधाची धार गांधीजींनी पाठिंबा दिला नसता तर कशी काय बोथट झाली असती हे कळणे कठीण आहे. हिंदूंनी खिलाफतप्रकरणी मुसलमान समाजाच्या भावनांशी सहयोगी होऊनदेखील खिलाफतीच्या आंदोलनात मलबार आणि सरहद्द प्रांतातील कोहार येथे हिंदविरोधी दंगे झालेच. मग गांधीजींनी आणि हिंदंनी विरोध केला असता तर दंगे व्हायचे कसे काय टळले असते? कोठल्याही अशा प्रकारच्या अन्याय्य कृत्याबद्दल मुसलमान प्रवक्त्यांची नेहमीची प्रवृत्ती पाहता हिंदूच्या आणि गांधीजींच्या खिलाफतविरोधामुळे हिंदूविरोधी दंगली झाल्या असे दंगलींचे समर्थन मुसलमान नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी केले नसते तर आश्चर्य. गांधीजींनी खिलाफतला दिलेल्या पाठिंब्यामुळे इतिहासाच्या प्रवाहाने वेडेवाकडे वळण घेतले असे नाही. त्यांनी पाठिंबा दिला नसता तरीही

३०/मुसलमानांच्या धार्मिक चळवळी