पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुनरुत्थानवादी चळवळींचा जन्म झालेला आहे. या कारणपरंपरेनुसार भारतीय मुसलमान इस्लामचे शुद्ध स्वरूपात आचरण करीत नसल्यामुळे त्यांची अवनती झाली. इस्लामची आदर्श समाजव्यवस्था प्रेषित महंमद आणि त्यानंतरचे चार खलिफा यांच्या काळातच होती. भारतीय मुसलमानांची इस्लामवरील निष्ठा अधिक बळकट केल्याने आणि पैगंबरकालीन समाजव्यवस्थेचे आदर्श त्यांनी पुन्हा अंगी बाणवल्यानेच या दास्यमुक्तीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य त्यांना लाभू शकेल. हा आदर्श न सोडण्याचा इशारा सिरहिंदीने राज्यसत्ता असताना दिलाच होता. राज्यसत्ता गेल्यानंतर वलिऊल्लाने त्याला मूलभूतवादी सिद्धांताचे अधिष्ठान मिळवून दिले. अरबस्तानात याच कारणासाठी अब्दुल वहाबने आपली मूलभूतवादी चळवळ सुरू केली. हिला पुढे वहाबी चळवळ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. अरबस्तानातील चळवळीचा रोख दर्गे आणि पीरांची पूजा करणे यांच्याविरुद्ध अधिक होता. भारतातील धार्मिक नेत्यांनाही दर्ग्यांची पूजा नापसंत होती. परंतु त्याहूनदेखील येथील विशिष्ट राजकीय आणि ऐतिहासिक परिस्थितीमुळे येथील मूलभूतवादी चळवळींचा हिंदूविरोधी वृत्ती जोपासण्यावर त्यांचा भर होता. अरबस्तानात बिगरमुसलमानच नसल्यामुळे त्या चळवळीचे स्वरूप समाजांतर्गत राहिले. येथे ते समाजांतर्गत होतेच, परंतु येथील राज्यसत्ता आणि बहुसंख्यांक हिंदू समाज ह्यांच्याविरोधी पवित्रा ह्या चळवळीने घेतला होता.
 भारतीय इस्लामला अशा रीतीने एक ऐतिहासिक पार्श्वभूमी प्राप्त झाली. येथील बहुसंख्यांक हिंदूंपासून मुसलमान समाजाचे स्वरूप वेगळे ठेवण्याचा अट्टाहास या धार्मिक भूमिकेत होताच. परंतु हे वेगळेपण टिकणे हातात सत्ता आल्यानंतरच शक्य आहे हीही भारतीय इस्लामच्या प्रवक्त्यांची अधिकृत भूमिका बनली.
 हे धार्मिक मन कमालीचे ब्रिटिशविरोधी होते. हिंदूविरोधी तर होतेच होते. परंतु ब्रिटिशांनी मुसलमानांच्या हातून सत्ता हिसकावून घेतली हे ही मंडळी विसरू शकत नव्हती. तूर्त ब्रिटिशांचे जू मानेवर बसले होते. ते झुगारून कसे लावायचे हा एक यक्षप्रश्नच त्यांच्यापुढे उभा होता. १८५७ पर्यंत ब्रिटिशांशी लढा देण्याचा प्रश्नच नव्हता. १८५७ मध्ये झालेल्या उठावात हिंदूंनी स्वतःहून भाग घेतला. भारतीय उलेमांच्या राजकीय विचारसरणीत या घटनेमुळे मूलगामी परिवर्तन झालेले आहे. आपला पहिला आणि महत्त्वाचा शत्रू ब्रिटिश आहे. हे धर्मनेत्यांनी ठामपणे आता ठरविले आणि ब्रिटिशांच्या सर्वच धोरणांना आणि सुधारणांनादेखील त्यांनी प्रखर विरोध सुरू केला. पुढे पाश्चात्त्य शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या सर सय्यद अहमदखानांना आणि अलीगढ विद्यापीठाला, देवबंदच्या परंपरागत उलेमांनी याच भूमिकेतून विरोध केला. अखेर अलीकडच्या मुसलमानांतील आधुनिकतेच्या प्रवाहातूनच पाकिस्तानच्या मुसलमानी राष्ट्रवादाचा उदय झाला असल्यामुळे त्या राष्ट्रवादाला शेवटपर्यंत विरोध करण्याची भूमिका या धर्मनेत्यांनी घेणे त्यांच्या सैद्धांतिक भूमिकेशी सुसंगतच होते.

 आधुनिक शिक्षणाला विरोध करण्याच्या उलेमांच्या या भूमिकेमुळे मुसलमानी समाज सर्व क्षेत्रांत मागासलेला राहणे अपरिहार्यच होते. एक तर हिंदू समाजात सुधारणेच्या चळवळीला सत्तर वर्षे आधीच आरंभ झाला होता. झपाट्याने हिंदू आधुनिक शिक्षण घेत होते. सत्तावन्नच्या बंडात प्रचंड प्रमाणात भाग घेतल्याबद्दल ब्रिटिशांनी कठोर दडपशाही केल्यामुळे मुसलमानी

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /२९