पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


इ.स. १०८५ मध्ये अल्फान्सो सहावा (लिओं) याच्या नेतृत्वाखाली त्यांनी तोलेदो जिंकले.परंतु इ.स. १०९० मध्ये सत्ता बळकावलेल्या युसूफ अल्मुराविदने आपले आसन पुन्हा बळकट केले आणि तोलेदो वगळता बाकीचा सर्व स्पेन पुन्हा आपल्या टाचेखाली आणला. परंतु अल्मुराविद राजघराण्याला उखडून काढण्यासाठी उत्तर आफ्रिकेतून अल्मुशदीस राजांनी पुन्हापुन्हा स्पेनवर हल्ले केले. त्यांनी अल्मुराविद घराण्याला पदच्युत केलेच, परंतु आपला राज्यविस्तार करावयास प्रारंभ केला. पोप इनोसन्स (तिसरा) याने या राजवटीविरुद्ध धर्मयुद्ध पुकारले. इ.स. १२१२ मध्ये संयुक्त ख्रिश्चन सैन्याने अरब सैन्याचा पराभव करून बार्सिलोना ते लिस्बनपर्यंतचा आयबेरियन भूशिराचा उत्तर भाग मुक्त केला. इ.स. १२३८ ते १२६० या बावीस वर्षांच्या काळात ख्रिश्चनांनी ग्रानदाचा प्रांत सोडून बाकी सर्व प्रदेश पुन्हा घेतला आणि इ.स. १४९२ साली फर्डिनन्ड आणि इसाबेला यांच्या लग्नानंतर एकत्र आलेल्या अॅरेग्नॉन आणि कॅस्टाईलच्या सैन्याने ग्रानदा जिंकले. ग्रानदाच्या या पराभवाने इस्लामच्या इतिहासातील दुसरे पर्व संपले. स्पेनमधील उरलेल्या मुसलमानांना ख्रिश्चनांनी बळाने ख्रिश्चन केले. वरकरणी ख्रिश्चन धर्म पाळून इस्लामच्या निष्ठा गुप्तपणे कायम ठेवण्याचा प्रयत्न काही काळ मुसलमानांनी केला खरा, पण अखेर इ.स. १६१० मध्ये त्यांना स्पेनमधून बाहेर हुसकावण्यात आले.
 (भारतात मुसलमान प्रथम आठव्या शतकाच्या प्रारंभी आले. त्यांच्यापूर्वी आलेले शक, हूण आदी परकीय लोक येथे कालांतराने स्थायिक होऊन त्यांनी हिंदु धर्माचा स्वीकार केला, परंतु मुसलमान लोकांनी मात्र येथे स्थायिक होताना त्यांचा धर्म कायम ठेवला, इतकेच नव्हे तर राज्यविस्तार करताना इस्लामचा सतत प्रसार करण्याचाही प्रयत्न केला. इ.स. ७११ साली महमद कासीमने सिंध प्रांतावर स्वारी करून दाहर राजाचा पराभव केला. महंमद कासीम हा अरब होता. त्याच्यानंतर मात्र अरब हिंदुस्थानात आले नाहीत. ह्यानंतरच्या काळात आलेल्या मुसलमानांमध्ये तुर्क, अफगाण आणि मोगल लोक होते. गजनीच्या महंंमूद या अफगाण सरदाराने १००१ पासून १०३० पर्यंत हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या केल्या. शेवटच्या काठेवाडवरील स्वारीमध्ये त्याने सोरटी सोमनाथ येथील सोमनाथाचे मंदिर लुटले आणि तेथील सोमनाथाची मूर्तीही फोडली.
 यानंतर महंमद घोरी याने हिंदुस्थानवर ११९१ मध्ये स्वारी केली आणि मुलतान, पेशावर, लाहोर हा भोवतालचा प्रदेश जिंकून त्याने रजपूत राजाचा पराभव केला. इ.स. १२०५ पासून दिल्लीच्या तख्तावर मुसलमानांचा अंमल सुरू झाला तो १८५७ अखेरीपर्यंत चालू होता. महंमद घोरीनंतर अल्लाउद्दीन खिलजी याने प्रथम विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेस स्वाऱ्या करून मुसलमानी साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या मृत्यूनंतर तुघलक, सय्यद व लोदी घराण्यांच्या काळात मुसलमानी साम्राज्यास उतरती कळा लागली.

 यानंतर भारतावर बाबराने १५१९ मध्ये स्वारी करून पंजाब प्रांत जिंकला. बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक. तो बापाच्या बाजूने तुर्क आणि आईच्या बाजूने मोगल होता. बाबराने पानिपतच्या लढाईत इब्राहिमखान लोदीचा पराभव करून आग्रा शहर जिंकले आणि नंतर दिल्लीच्या तख्तावर मोगल राजवट प्रस्थापित केली. बाबरानंतर हुमायून आणि नंतर

भारतीय इस्लाम / २३