पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


प्रेषित महंमद मृत्यू पावले तेव्हा अरबस्तानचा बराच भाग मुसलमानांच्या सत्तेखाली आला होता. त्याच वर्षी झैदच्या नेतृत्वाखाली सिरियावर स्वारी करण्यात आली. या मोहिमेत अपयश आले. परंतु हा इस्लामी साम्राज्यविस्ताराचा आरंभ आहे.
 या साम्राज्यविस्ताराची गती आश्चर्यजनक राहिली. इ. स. ६४० मध्ये इजिप्तवर हल्ला करण्यात आला. पुढील सात वर्षांत इजिप्त ते खोरासन एवढा प्रदेश जिंकला. इ.स. ६४० पासून इ.स. ६७१ पर्यंतच्या एकतीस वर्षांच्या अवधीत अरबांनी पूर्वेला काबूल तर पश्चिमेला कॉन्स्टॅन्टिनोपलपर्यंतचा प्रदेश जिंकला!
 या विजयाची समाप्ती येथे झालेली नाही. महंमदाच्या मृत्यूनंतर सुमारे ५० वर्षांच्या अवधीत अरबस्तानातील लोक मुसलमान बनले. मुसलमान न बनलेल्या ज्यू आणि ख्रिश्चनांना उमर खलिफाच्या काळात (इ.स. ६३४ - ६४४) अरबस्तानातून हाकलून देण्यात आले. मक्केतून बिगरमुसलमानांना प्रेषित महंमद यांनी आधीच हाकलून दिले होते. तथापि एवढे मोठे साम्राज्य कमावल्यानंतर प्रचंड बिगरमुस्लिम लोकसंख्येचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. मदिनेत प्रेषितांनी जेव्हा पहिले राज्य प्रस्थापित केले होते तेव्हा ज्यूंना आणि ख्रिश्चनांना धर्मस्वातंत्र्याची हमी दिली होती. परंतु एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. मदिनेत प्रेषित महंमद परके होते. मुसलमान जेथे अल्पसंख्यांक होते तेथे महंमद यांना आरंभी तडजोड करावी लागली आहे. (ज्यू येसरबकडे (जेरूसलेम) तोंड करून प्रार्थना करीत. मुसलमानांनी आपण मक्केकडे तोंड करून नमाज पढू असे सांगितले. ज्यूंनी याला विरोध केला. मुसलमानांनीदेखील येसरबकडे तोंड करून नमाज पढली पाहिजे असा आग्रह धरला आणि ज्यू येसरबकडे तोंड करून प्रार्थना म्हणत असतील तर आम्हीदेखील तिकडेच तोंड करून नमाज पढू असे महंमद यांनी सांगितले.) पुढे साम्राज्यविस्तार झाल्यानंतर तडजोड करण्याची आवश्यकता संपली होती. उमर खलीफाच्या काळात साम्राज्यविस्तार सुरू झाला आणि बिगरमुसलमानांबरोबर वागण्याचे नीतिनियम तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. ह्या संबंधातील राज्याच्या धोरणाला विशिष्ट दिशा द्यावी लागली. या धोरणाचा पाया कुराण आणि प्रेषित यांनी आरंभी घालून दिलेले नियम हा होता. या नियमांत गरजेनुसार वेळोवेळी भर घालण्यात आली किंवा बदल करण्यात आले.

 बिगर-मुसलमानांकडून जिझिया घेण्याचा आदेश कुराणानेच मुसलमानांना दिला आहे. इस्लामी धर्मशास्त्राचे पुढे चार विभाग झाले आणि त्यांना मानणारे हन्नफी, शाफी, मालिकी आणि हंबली असे चार पंथ झाले. (तुर्क (मोगल आणि अफगाण) हन्नफी होते. भारतात त्यामुळेच बहुसंख्य मुसलमान हन्नफी आहेत.) बिगर-मुसलमानांनी मुसलमानांशी व बिगरमुसलमानांशी वागण्याबाबतच्या प्रत्येक पंथाच्या नियमांत फरक पडत गेला. मात्र मुसलमान व बिगरमुसलमान यांच्यात फरक केला पाहिजे व बिगरमुसलमानांना मुसलमानांप्रमाणे समान वागणूक देता कामा नये यावर सर्व पंथांचे एकमत आहे. बिगरमुसलमान (काफिर) कुणाला म्हणावे याबद्दल या चारही धर्मपंथांचे एकमत आहे. इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे (१) ज्यांना ईश्वरी संदेशाचा धर्मग्रंथ प्राप्त झाला आहे असे (अहले किताब), (२) ज्यांचे धर्मग्रंथ ईश्वरी संदेशाशी जुळत आहेत असे व (३) इतर काफिर. हे सर्व बिगरमुसलमान अथवा काफिर

२०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान