पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वस्तुस्थिती अशी आहे की समाजात उच्चकनिष्ठ असा जो भेदभाव असतो, त्याच्याविषयीची जाणीव मुसलमानांत तेवढी तीव्र नाही. धार्मिकदृष्ट्या सर्व मुसलमानांना एकत्र आणणाऱ्या आणि बंधुत्वाची घोषणा देणाऱ्या इस्लामच्या सैद्धांतिक विचारसरणीने सामान्य मुसलमान असा भारावून गेला आहे की ईश्वरासमोर सर्व समान असणे आणि ऐहिक जीवनात समान असणे या दोन्हीतील फरकच तो समजू शकत नाही. इस्लामने त्याला मशिदीत बादशहांच्यादेखील खांद्याला खांदा लावून नमाज पढण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या बंधुत्वाच्या भावनेने तो असा भारावला जातो की भाजीच्या किंवा मासळीच्या बाजारात तो अमिराशी समान नसतो हे काही त्याला आकलन होत नाही. त्याच्या दृष्टीने मशीद आणि मासळीबाजार यात काही फरक नसतो. नाही तरी उमर खलिफाने म्हटलेच आहे, “मुसलमानाला मशिदीत तो काय करतो यावरून ओळखू नका. तो बाजारात काय करतो यावरून ओळखा." म्हणून तर उत्तरप्रदेशची जमीनदारी नष्ट केल्यामुळे गरीब मुसलमानांना दुःख झाले. वस्तुतः श्रीमंत मुसलमान जमीनदार आणि सामान्य मुसलमान यांचे हितसंबंध परस्परविरोधी होते. परंतु मुसलमान तसे मानीत नाहीत. जमीनदाराच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे त्याच्या दृष्टीने इस्लामच्या हितसंबंधाचे रक्षण करणे ठरते.
 भारतात गेल्या काही वर्षांत झालेल्या दंगलींचे नीट निरीक्षण केले तर असे दिसून येते की या दंगली प्रामुख्याने नव्याने निर्माण झालेल्या औद्योगिक केंद्रांत झालेल्या आहेत. रांची. जमशेदपूर, अहमदाबादचा औद्योगिक विभाग ही दंगलींची केंद्रे आहेत आणि येथे कामगारांनी कामगारांचे गळे कापले आहेत. काय चुकते आहे? कामगार तर आर्थिक हितसंबंधांनी एकत्र आलेले असतात! मग धर्मभावनेने प्रज्वलित होऊन ते एकमेकांचे मुडदे पाडीत आहेत, ह्या घटनेचा अर्थ कसा लावायचा? परंतु कामगारांच्या ऐक्याची घोषणा कम्युनिस्ट करीतच असतात. कामगार हा फक्त बोनस व पगारवाढीसाठी एकत्र येतो. एरवी जात आणि धर्मगट यात तो विखुरला गेला आहे आणि जे सामाजिक तणाव इतरत्र अस्तित्वात आहेत त्यांचे प्रतिबिंब कामगारांत उमटले जाते. परंतु या वस्तुस्थितीकडे कम्युनिस्ट पक्षाने सोयीस्करपणे डोळेझाक केली आणि ठोकळेबाज आर्थिक सिद्धांतांच्या चष्म्यातून सतत या प्रश्नाकडे पाहिले.

 या ठोकळेबाज आर्थिक सिद्धांतांचा अंगीकार केल्यामुळे कम्युनिस्टांना सोयीस्करपणे अनेक प्रश्नांना बगल मात्र देता आली. म्हणूनच हरिजन प्रश्नावर कम्युनिस्ट फारसे काम करताना दिसत नाहीत, आणि मुस्लिम जातीयवादाच्या प्रश्नावर बोलणाऱ्याला ते सी. आय. ए. किंवा जनसंघाचा हस्तक ठरवितात. सारे काही कम्युनिस्ट क्रांती झाल्यानंतर ठीक होईल असे त्यांचे याला उत्तर आहे. कम्युनिस्ट क्रांती झाली की जातिसंस्था आपोआप कोसळून पडेल आणि समान नागरिक कायदा व्हावा म्हणून कम्युनिस्टांकडे मुसलमान हट्ट धरतील अशी ही रम्य कल्पना आहे. फक्त कम्युनिस्ट क्रांती व्हावी कशी? हिंदू जातींचा बुजबुजाट मोडून काढल्याखेरीज आणि मुस्लिम मनावरील धर्मभावनेचा जबरदस्त प्रभाव नष्ट केल्याखेरीज भारतात आर्थिक समानतेचे युगदेखील येणे कठीण आहे. केवळ आर्थिक लढे लढवून येथे नवी समाजव्यवस्था अंमलात येणार नाही. याचा अर्थ आर्थिक लढे महत्त्वाचे नाहीत असे नव्हे. ते

समारोप /२०५