पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खुश्चेव्ह रशियात सत्तेवर आल्यानंतर भारत व रशिया यांच्या संबंधांना कलाटणी मिळाली. दरम्यान पाकिस्तानबरोबर अमेरिकेने लष्करी करार केला होता आणि रशियाने भारताच्या काश्मीरविषयक भूमिकेला पाठिंबा दिला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मग पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना साम्राज्यवाद्यांचे हस्तक ठरविले. नेहरू त्यानंतर त्यांच्या दृष्टीने पुरोगामी ठरले, हे येथे सांगण्याची जरुरी नाही.
 भारतीय मुसलमानांबाबत कम्युनिस्ट पक्षाने या बोटचेप्या धोरणाचा पुरस्कार चालविला. त्यांची न्याय्य गा-हाणी आणि चुकीच्या जातीयवादी मागण्या यांच्यात फरक करण्याचे टाळले. अनेकदा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दुहेरी भूमिका घेतल्या. उत्तर प्रदेशात हिंदी-उर्दू वादाबाबत श्री. राहुल सांकृत्यायन आणि झेड. ए. अहमद यांच्यात तीव्र मतभेद आढळले. कम्युनिस्टांनी यातून मार्ग काढण्यासाठी नामी युक्ती काढली. मुस्लिम मोहल्ल्यात प्रचारासाठी गेले असताना उर्दूवर कसा अन्याय होतो आहे याच्यावर कम्युनिस्ट प्रचारक भाषणे करू लागले आणि हिंदू वस्तीत हिंदीचा प्रसार कसा झाला पाहिजे यांच्यावर ते जोर देऊ लागले.
 कम्युनिस्टांनी दंगलीबाबत सातत्याने अल्पसंख्यांकांच्या रक्षणाची भूमिका घेतली. अनेक ठिकाणी त्यांनी दंगलीत केलेले काम कौतुकास्पद आहे. कारण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता ही त्यांची जीवनश्रद्धा बनलेली आहे, याबद्दल कुणीही.शंका बाळगण्याचे कारण नाही. तथापि, या प्रश्नावर विचार करण्याची त्यांची एकूण पद्धत नेहमीच फसवी राहिलेली आहे. आपण मुस्लिम जातीयवादाविषयी त्यांच्याशी चर्चा केली की ते मुस्लिम जातीयवाद असा काही शिल्लकच नाही, वर्गलढे तीव्र करणे हा जातीयवादावर तोडगा आहे, असे प्रतिपादन करतील. परंतु जातीयवाद अस्तित्वात नाही हे त्यांचे विधान हिंदू समाजाला लागू नाही. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी संस्था जातीयवादी आहेत असे ते प्रतिपादन करीत असतात आणि एक प्रकारे अप्रत्यक्षरीत्या हिंदूंमध्ये जातीयवाद आहे याची कबुली देतात. मग मुस्लिम जातीयवादाची चर्चा करताना त्यांना वर्गलढे कसे काय आठवत असतात?

 कम्युनिस्ट पक्ष आर्थिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे भर देत असतात याबद्दल शंका बाळगण्याचे काही कारण नाही. परंतु आता इतकी वर्षे भारतीय राजकारणात वावरल्यानंतर आपल्या वाटचालीचा मागोवा घ्यायला त्यांना हरकत वाटू नये. कम्युनिस्ट चळवळ किंवा अधिक व्यापक अर्थाने म्हणायचे तर डाव्या चळवळी विलक्षण दुबळ्या व विस्कळीत झालेल्या आज दिसून येतात, याची कारणे तरी काय? पाकिस्तानला पाठिंबा देण्यापासून तो आजतागायतपर्यंत सातत्याने मुस्लिमधार्जिणी भूमिका घेतल्यानंतर मुस्लिम समाजात वर्गविग्रहाची जाणीव निर्माण करण्यात कम्युनिस्ट पक्ष कितपत यशस्वी झाला आहे? मुसलमान समाजाचा किती प्रमाणात पाठिंबा कम्युनिस्ट पक्ष मिळवू शकला आहे? कुठेतरी मुस्लिम परंपरा, इतिहासाचा मुस्लिम गंड, वेगळ्या स्वतंत्र अस्तित्वाच्या त्या समाजाच्या श्रद्धा मुसलमानांना वर्गलढ्यात आणण्यापासून वंचित तर करीत नाहीत का, असा विचार कम्युनिस्टांनी केलेला दिसत नाही.

२०४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान