पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/204

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


झाली, परंतु चीनची क्रांती टळली नाही.
 रशियाच्या परराष्ट्र धोरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष किती जखडला गेला आहे याचे हे विदारक उदाहरण आहे. चिनी कम्युनिस्टांना स्वत:चे असे वेगळे अस्तित्व होते. माओने ते दाखवून दिले आहे. हो चि मिन्ह आणि उ. व्हिएटनामचा कम्युनिस्ट पक्ष यांचे स्वत:चे असे वेगळे अस्तित्व जाणवेल. त्यांनी रशियाच्या किंवा चीनच्या धोरणाची सहीसही नक्कल केली. नाही. परंतु भारतीय कम्युनिस्टाइतके लाचार आणि रशियाच्या धोरणाची पोपटपंची करण्यात वाकबगार दुसरे कोणीही आढळणार नाही.
 याच काळात कम्युनिस्ट पक्षातील मुस्लिमांनी मुस्लिम लीगमध्ये प्रवेश केला. डॅनियल लतीफी पंजाब मुस्लिम लीगचे सेक्रेटरी होते. कम्युनिस्ट पक्षातील मुसलमानांत हाडाचे कम्युनिस्ट कोण आणि लीगवाले कोण हे सांगणे कठीण आहे. सज्जाद जहीर, डॉ. अशरफ् मियाँ इफ्तिकारुद्दिन यांच्या मार्क्सवादी निष्ठांबद्दल शंका बाळगणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. त्यांच्या दृष्टीने पाकिस्तानला पाठिंबा हा कम्युनिस्ट पक्षाच्या डावपेचाचा एक भाग होता आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा पक्षाच्या शिस्तीच्या बंधनाचा भाग होता. परंतु कम्युनिस्ट पक्षातील इतर मुसलमानांविषयी असे खात्रीने सांगता येणे शक्य नव्हते. मार्क्स आणि प्रेषित महंमद यांच्यापैकी निवड करण्याची पाळी आली असती तर ते प्रेषित महंमदाकडेच झुकले असते आणि पी. सी. जोशी किंवा रणदिवे यांच्यापेक्षा जीनांकडेच ते जास्त आकृष्ट झालेले होते. गंमत अशी की या सर्व प्रकारात कम्युनिस्ट पक्ष मुसलमानांना मार्क्सवादाची दीक्षा देण्यात यशस्वी होण्याऐवजी त्यांनीच जीनावादाची दीक्षा घेतली. परिणामत: कम्युनिस्ट पक्षातील बरेचसे मुसलमान जीनावादीच आहेत.

 फाळणीनंतर सज्जाद जहीर पाकिस्तानात जाऊन राहिले आणि पाकिस्तानात कम्युनिस्ट चळवळ संघटित करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. दरम्यान सोव्हिएत युनियनमध्ये झाडलोव्ह रशियन कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस बनले आणि नवस्वतंत्र राष्ट्रात राज्यक्रांतीचा पुरस्कार करणारा त्यांचा थेसिस पुढे आला. भारतात कॉ. रणदिवे तेव्हा कम्युनिस्ट पार्टीचे चिटणीस बनले होते. झाडलोव्ह यांच्या आदेशानुसार कॉ. रणदिवे यांनी तेलंगणाच्या लढ्याचे रणशिंग फुकले. पुढचा इतिहास सर्वांना माहीत आहे. खरे म्हणजे त्याच्याशी आपले काही कर्तव्य नाही. पाकिस्तानात हा उठाव करण्याची संधीच मुळी कम्युनिस्टांना देण्यात आली नाही. जीनांना आणि मुस्लिम लीगवाल्यांना कम्युनिस्टांनी ओळखले नाही. कम्युनिस्टांचे पाणी मात्र जीनांनी चांगलेच ओळखले होते. त्यांनी पाकिस्ताननिर्मितीकरिता कम्युनिस्टांचा उपयोग करून घेतला आणि नंतर कम्युनिस्टांची ससेहोलपट केली. हजारो कार्यकर्त्यांना बेकायदा, विनाचौकशी तुरुंगात टाकले. कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली. सज्जाद जहीर यांना खोट्या खटल्याच्या संबंधात गुंतविले. डॉ. अशरफ् विमानाने परदेशी जात असताना कराचीला थांबले असताना तेथे त्यांना अटक केली. पुढे तुरुंगातून सुटल्यानंतर ज्या नेहरूंना कम्युनिस्टांनी 'साम्राज्यशाहीचे कुत्रे' म्हणून संबोधले त्या नेहरूंनी या दोघांना भारतात परत येण्याची परवानगी दिली. इतकेच नव्हे तर त्यांना भारतीय नागरिकत्वही बहाल केले.

समारोप /२०३