पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/203

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


जॉर्जिया हे. एक राष्ट्र आहे, उझबेक लोकांचेही एक राष्ट्र आहे आणि ही सगळी राष्ट्र सोव्हिएत संघात समानतेच्या पातळीवर एकत्र आली आहेत. लेनिनने राष्ट्रीय गटांचा पाया प्रदेश व भाषा हा घेतला आहे-धर्म नव्हे-हे येथे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हा सिद्धांत भारतातील तमाम मुसलमानांचे एक वेगळे राष्ट्र आहे या जीनांच्या धार्मिक राष्ट्रवादाच्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी वापरला. अर्थात आपल्या धोरणातील गफलत न कळण्याइतके भारतीय कम्युनिस्ट भाबडे किंवा मूर्ख होते असे समजण्याचे कारण नाही. कम्युनिस्टांच्या पाकिस्तानच्या चळवळीला पाठिंबा देण्यामागील हेतू अनेक होते.
 एक कारण असे की गांधींना भांडवलदारांचे हस्तक आणि नेहरूंना त्यांच्या ताटाखालचे मांजर इत्यादी शिव्या दिल्यामुळे भारतीय जनता कम्युनिस्टांच्यामागे जाणे काही शक्य नव्हते. उलट असे दिसून आले की गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देणे कम्युनिस्टांना शक्य नव्हते. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाला भारतीय जनमनात काही स्थान राहिले नव्हते. अशा परिस्थितीत गांधींना जीना आव्हान देत आहेत असे कम्युनिस्टांना दिसू लागले. जीनांचे आव्हान मुसलमानांच्या धर्मभावनांना चेतवल्यामुळे झाले होते आणि गांधी-नेहरूंचा द्वेष करणाऱ्या कम्युनिस्टांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले. त्यांचा जीनांना पाठिंबा हा गांधी-नेहरूंचा द्वेष करण्याच्या त्यांच्या चमत्कारिक मनोवृत्तीतूनदेखील निर्माण झाला होता. मग आपण प्रादेशिक आणि भाषिक राष्ट्रगटांचे निकष धार्मिक गटाला लावतो आहोत आणि एक प्रकारे धर्मवादाविरुद्ध लढा घ्यावयास सांगणाऱ्या मार्क्सशी प्रतारणा करीत आहोत याचा सारासार विवेक बाळगण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. भारतीय जनमनातून आपले नष्ट झालेले स्थान आपल्याला लवकर मिळविता येणार नाही, मात्र पाकिस्तानच्या चळवळीला पाठिंबा दिल्याने मुस्लिम जनमत आपल्याकडे आकर्षित करून घेता येईल असाही कम्युनिस्टांचा होरा होता. पाकिस्तानात कम्युनिस्ट पक्षाला स्थान प्राप्त होईल आणि तेथे कम्युनिस्ट क्रांती घडवून आणता येईल अशी वेडी स्वप्नेही त्यांनी बाळगली होती.

 त्याहूनही महत्त्वाचे कारण असे दिसते की ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून बाहेर पडल्यानंतर उपखंडात एक राष्ट्र उदयाला येणे रशियाला नको होते. हा काळ भारत-रशिया मैत्री कराराचा नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे. नेहरूंना साम्राज्यशाहीचे कुत्रे अशी शिव्यांची लाखोली मॉस्को नभोवाणी वाहत असल्याचा हा काळ आहे. तेव्हा चीनमध्ये यादवी युद्ध सुरू होते आणि माओ यशस्वी होणार असल्याची लक्षणे दिसू लागली होती. आशियातील चीन व भारत हे दोन्ही देश सबळपणे जागतिक राजकारणात येणे सोव्हिएत रशियाला मनापासून नको होते. याच काळात माओला कोमिन्टांगविरूद्ध अंतिम चढाई करू नका' असे सांगण्यात येत होते. गंमत अशी की नान्कीन हे चीनचे तेव्हाचे राजधानीचे शहर कम्युनिस्टांनी जिंकले तेव्हा रशियाच्या चीनमधील राजदूताने चैंक के शेकबरोबर फोर्मोसाला प्रयाण केले आणि येथे सोव्हिएत वकिलात स्थापन केली. हे उदाहरण स्टॅलिन बँक कै शेकच्या किती निकट होता हे दाखविण्यासाठी पुरेसे आहे. स्टॅलिनच्या दृष्टीने चीनमध्ये यादवी युद्ध चालू राहणे अधिक महत्त्वाचे होते. तसेच भारताची फाळणी होणे महत्त्वाचे होते. भारताची फाळणी

२०२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान