पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अद्भुततेच्या थराला गेलेल्या आहेत. काश्मीर प्रश्नावर स्वतंत्र पक्षाने सतत घेतलेली पाकिस्तानबरोबरच्या तडजोडीची भूमिका आणि भारत-पाकिस्तानवादात अनेकदा पाकिस्तानच्या भूमिकेचे त्यांनी केलेले समर्थन याची साक्ष देईल. स्वतंत्रांची अडचण अशी आहे की जग जसे असायला पाहिजे असे ज्यांना वाटते तसे ते आहे असा त्यांनी सोयीस्कर गैरसमज करून घेतलेला आहे. या दृष्टिकोनातून एकदा पाहिल्यानंतर, एकदा काश्मीरवर तडजोड झाली की भारत-पाक संबंध मैत्रीचे होतील असे त्यांनी गृहीत धरले. स्वतंत्र . पक्षाच्या मिनू मसानी आणि पिलू मोदी या नेत्यांना पाकिस्तानच्या स्थापनेमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी कधी समजून घेण्याची आवश्यकताच भासली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानविषयक त्यांची अनुकूल भूमिकाही नेहरूंविषयीच्या पूर्वग्रहामुळे बनली गेलेली आहे. स्वतंत्र पक्ष हा कट्टर कम्युनिस्टविरोधी आहे. नेहरूंचे तटस्थतेचे धोरण, सोव्हिएट रशियाशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे त्यांचे प्रयत्न यांचा हा पक्ष विरोधक होता. अमेरिकेशी मैत्री न करण्यात नेहरूंची चूक होत आहे अशी त्यांची पक्की समजूत होती. वस्तुत: अमेरिकाच भारताशी मैत्री करण्यास उत्सुक नव्हती हे स्वतंत्रांनी कधी समजून घेतले नाही. नेहरू हे शिष्ट आहेत असा यांचा समज होता. यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत नेहरूंचेच चुकले असावे असे स्वतंत्रांनी गृहीत धरले.
 येथे हे लक्षात घेतले पाहिजे की पाकिस्तान हे अमेरिकेबरोबर लष्करी कराराने बांधले गेलेले आहे आणि म्हणून एकदा 'अमेरिकेचे धोरण नेहमीच बरोबर असते' असे मानल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन करणे स्वतंत्रांच्या दृष्टीने अपरिहार्य ठरते. पाकिस्तानच्या बाबतीतील या धोरणाचा स्वतंत्र पक्षाच्या उदारमतवादाशी किती संबंध आहे आणि अमेरिकेच्या बरोबर अमेरिकेच्या दोस्तांचेही समर्थन करण्याचा भाग त्यात किती हे ठरविणे कठीण आहे. कारण आपल्याला असे दिसते की पाकिस्तानबरोबर भारताने जुळते घ्यावे, शक्यतो तडजोड करावी, असे म्हणणाऱ्या स्वतंत्र पक्षाने अरबांविरुद्ध इस्रायलचे सतत समर्थन केले आहे.
 इस्रालय आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अमेरिकेचे मित्र आहेत हे येथे लक्षात घेतले पाहिजे. स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांना असे वाटते की कम्युनिझमचा प्रसार रोखणे (कुणाचेही) "प्रथम कर्तव्य आहे. स्वतंत्रांची भूमिका थोडक्यात अशी दिसते- भारताने अमेरिकेबरोबर वस्तुतः लष्करी करार करायला हवा होता. भारताने तो केला नाही. ही भारत सरकारची चूक आहे. काश्मीरप्रश्न उपखंडात सलत राहिला आहे. तो नसता तर भारताला रशियाच्या बाजूला झुकावे लागले नसते.

 वस्तुतः अमेरिकेच्या स्वतंत्र समाजव्यवस्थेचा आदर्श मानणाऱ्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे जसेच्या तसे समर्थन करण्याची काहीच जरूरी नाही. अनेक ठिकाणी अमेरिकेने हडेलहप्पीदेखील केली आहे. सनदशीर पद्धतीने निवडून आलेले ग्वाटेमालाचे सरकार श्री. जॉन फॉस्टर डल्लेस परराष्ट्रमंत्री असताना अमेरिकेने उलथून पाडले आणि आपली तळी उचलून धरणाऱ्यांचे सरकार स्थापिले. इंडोनेशियात सुकार्नोना पदच्युत करून तो देश घशाखाली घालण्याचा डाव श्री. डल्लेस यांनी जवळजवळ पूर्णावस्थेला आणला होता. परंतु ते जमले

१९६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान