पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/196

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आकाशवाणीवर सतत हिंदू देवादिकांच्या कथा, भजने आणि कीर्तने यांचा भडिमार चालू असतो. हिंदूंच्या खालच्या जातींचीही अनेकदा दखल घेतली जात नाही. आकाशवाणीवरील बरेच धार्मिक कार्यक्रम उच्चवर्णीय हिंदूंचे असतात. १९७९ साली पुणे नभोवाणीवरून बौद्धांची भजने, बौद्ध धार्मिकांचे कार्यक्रम प्रक्षेपित व्हावेत असे सांगण्यास गेलेल्या बौद्धांच्या मोर्चाच्या नेत्यांना पुणे नभोवाणीच्या अधिकाऱ्याने भेटावयाचेदेखील नाकारले. नभोवाणीच्या पक्षपातामुळे आपण स्वतंत्र नभोवाणी स्टेशन काढणार आहोत असे एकदा जनसंघाचे नेते श्री. वाजपेयी यांनी म्हटले होते. परंतु महाराष्ट्रातील पुणे, सांगली व नागपूर या तीन नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांचे स्वरूप पाहता, ही तीन केंद्रे तूर्त तरी जनसंघाच्या हातात आहेत हे वाजपेयींना माहीत नसावे! श्री. गोळवलकर यांच्या निधनानंतर नागपूर नभोवाणी केंद्र रात्रभर त्यांना श्रद्धांजली वाहत होते. गोळवलकर यांची मते कोणतीही असली तरी त्यांना नभोवाणी केंद्राने श्रद्धांजली वाहणे योग्यच होते असेच मी मानतो. परंतु नागपूर नभोवाणीने नेहमीची त्यांची वेळमर्यादा गोळवलकरांच्या बाबतीत मोडली. जणू हीच एक घटना जगात घडून आलेली आहे आणि पृथ्वीचे चक्र फिरायचे थांबले आहे असे वाटावे अशा थराला हे श्रद्धांजली प्रकरण गेले होते
 हे चित्र जसजसे हिंदूंचे दलित वर्ग जागृत होतील, आणि उच्चवर्णीयांची सरकारी नोकरशाहीतील मिरासदारी नष्ट करतील तसतसे बदलू लागेल यात मात्र शंका नाही. परंतु हे लवकर घडून येणारे नाही. उच्चवर्णीयांची जबरदस्त पकड नोकरशाहीवर आहे आणि चातुर्वर्ण्याच्या चौकटीचे या वर्गाला जबरदस्त आकर्षण आहे. पोलिस अधिकाऱ्यांतही हा वर्ग आहेच. आणि दंगलींच्या काळात मुसलमान अथवा हरिजन यांच्याबाबत पोलिसांचे वर्तन पक्षपाती होते तेव्हा या उच्चवर्णीय अधिकाऱ्यांची मनोभूमिकाच त्याला बरीचशी कारणीभूत असते.
 आजचा काँग्रेस पक्ष हे तणाव झपाट्याने नष्ट करील अशी काही शक्यता नाही. एक तर त्या पक्षाला खऱ्याखुऱ्या अर्थाने समाजपरिवर्तन व्हावे असे वाटत नाही. दुसरे असे की परस्परविरोधी जातींच्या आणि धर्मांच्या दृष्टिकोनांचा आग्रह धरणारी मंडळी काँग्रेसमध्ये एकवटली आहेत. इतके असूनही काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा झेंडा फडकवत ठेवला आहे. निदान सैद्धांतिकदृष्ट्या अजूनही काँग्रेस धर्मनिरपेक्षतेला बांधली गेलेली आहे. अडखळत का होईना, काही पावले त्या दिशेने टाकण्याचा ही प्रचंड संघटना प्रयत्न करीत आहे ही एक आशादायक बाब मानावी लागेल.

समाजवादी आणि कम्युनिस्ट

 काँग्रेस वगळता स्वतंत्र पक्ष, समाजवादी आणि कम्युनिस्ट हे इतर धर्मनिरपेक्षवादी पक्ष भारतात अस्तित्वात आहेत. भारतीय घटनेतील धर्मनिरपेक्ष प्रेरणांना संपूर्ण इमानी असलेले हे पक्ष आहेत. त्यातील स्वतंत्र पक्ष हा उजवा आहे तर इतर दोन पक्ष डावे आहेत. भारतातील अल्पसंख्यांक भाषिक गट, वेगळे वांशिक गट यांच्या बाबतीत उदार, समंजस धोरण असावे असे स्वतंत्र पक्ष मानीत आला आहे. स्वतंत्र पक्षाच्या उदारतेच्या काही कल्पना अनेकदा .

समारोप /१९५