पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/195

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेथे मुसलमानांच्या भूमिकेला सरकार पाठिंबा देते असे दृश्य दिसते. अरबांच्या बाबतीत हे घडून आलेले आहे. याला मुस्लिम अनुनय म्हणता येणार नाही किंबहुना येथील मुस्लिम समाज सतत अरबांची तळी उचलून धरतो, यामुळे आणि भारत-पाकिस्तान वादात अनेक अरब राष्ट्रांनी संदिग्ध भूमिका स्वीकारली आणि सौदी अरेबियासारख्या काही अरब राष्ट्रांनी पाकिस्तानला उघडउघड पाठिंबा दिला. ह्यामुळे भारतातील बहुसंख्यांक जनमत अरबविरोधी बनलेले आहे. आपल्याकडे चमत्कारिक सामाजिक प्रक्रिया होत असतात. उदाहरणार्थ, जनसंघ बांगलादेशच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देत असेल आणि इंदिरा गांधींचीही तीच भूमिका असेल तर इंदिरा गांधींनी जनसंघाची भूमिका घेतली आहे असा आरोप मुस्लिम वृत्तपत्रे आणि नेते करतात. इंदिरा गांधींनी आपण धर्मनिरपेक्ष आणि जनसंघविरोधी आहोत हे सिद्ध करण्यासाठी याह्याखानला पाठिंबा द्यायला हवा होता काय? परंतु मुस्लिम नेत्यांनी आणि पत्रांनी हा अजब युक्तिवाद केलेला आहे. अरबांच्या बाबतीत काही हिंदू गट अशीच भूमिका घेताना दिसतात. भारतीय मुसलमान अरबांना पाठिंबा देतात म्हणून भारत सरकारने अरबांना विरोध केला पाहिजे अशी यांचीही भूमिका आहे. अशा प्रतिक्रियात्मक पद्धतीने परराष्ट्रसंबंध ठरविले जात नाहीत, हे या गटांनी लक्षात घेतले तर बरे होईल.
 केवळ अरब राष्ट्राबाबतच नव्हे तर सर्वच मुस्लिम राष्ट्रांबाबत नेहरूंनी विशिष्ट धोरण आखले होते असे दिसून येते. अर्धचंद्रकोरीप्रमाणे ही राष्ट्रे उत्तरेकडून भारताच्या भोवताली परसलेली आहेत. सुएझसारखा जलमार्ग त्यांच्या हाती आहे. या राष्ट्रांचा सामर्थ्यवान भारतविरोधी गट उभा करण्याचा पाकिस्तान सतत प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न यशस्वी होऊ नये याची नेहरूंनी दक्षता घेतली. अरब राष्ट्रातील प्रजासत्ताकांबरोबर भारताचे मैत्रीचे संबंध असतात इतकेच. तटस्थतेच्या समान पायावर अफगाणिस्तानशी भारताचे संबंध दृढ बनविले. भारताच्या पूर्वेला असलेल्या इंडोनेशिया आणि मलेशियाबरोबरदेखील नेहरूंना यश आले. अरब जगत हा यातील महत्वाचा दुवा होता व आहे.
 काँग्रेसचे आणि भारत सरकारचे अपयश भारतातील धर्मनिरपेक्ष चळवळीच्या दुबळेपणात जाणवते. सात वर्षांच्या अवधीत राष्ट्रपतीपदावर दुसऱ्यांदा मुस्लिम व्यक्तीची निवड करणाऱ्या काँग्रेसने अनेक राज्यांत गोहत्येला बंदी करणारे आचरट कायदे केले आहेत. प्रचंड प्रमाणात सरकारीरीत्या पूजा करण्याचे प्रकार होत असतात. धरणे, कालवे, सरकारी कारखाना अशांचे बांधकाम होण्यापूर्वी भूमिपूजा केली जाते. काँग्रेसच्या अधिवेशनाचा तात्पुरता मंडप उभारतानादेखील पूजा केली जाते आणि हे प्रकार बंद करण्यासंबंधी काँग्रेसचे नेते अजिबात उत्सुक दिसत नाहीत.

 शिक्षणक्षेत्रात धर्मनिरपेक्षतेच्या प्रवाहाविरुद्ध अनेक ठिकाणी क्रमिक पुस्तके नेमलेली आढळून येतात. काही पुस्तकांत मुसलमान परकीय आहेत असेच म्हटलेले आहे. राम अथवा श्रीकृष्ण यांचे क्रमिक पुस्तकातील उल्लेख ते 'पुराणकथांचे (मायथॉलॉजी) महापुरुष' म्हणून केला जात नसून 'हिंदूंचे देव' म्हणूनच केलेला असतो आणि हिंदूंचे देव या अर्थानेच सर्वत्र विद्यार्थ्यांना (ज्यात बिगर हिंदूंचाही समावेश होतो) त्यांचे माहात्म्य सांगितले जाते.

१९४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान