पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/194

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेपक्षातील सर्वच माणसे सामाजिक अर्थाने पुरोगामी आहेत असे मानण्याचे कारण नाही. काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात सनातनवाद्यांचा भरणा आहे आणि सर्वधर्मीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश असल्यामुळे सर्वधर्मीय सनातन्यांचा तिच्यात भरणा झालेला आहे. या सनातन्यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केलाच होता आणि तेव्हाचे राष्ट्रपती (कै.) राजेंद्रप्रसाद हे या विरोध करणाऱ्या पक्षाचे नेते होते. नेहरूंनी आपले सर्व सामर्थ्य पणाला लावले म्हणूनच हिंदू कायदा होऊ शकला आहे. अशा पक्षातील माणसे खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचा विचार करू शकत नाहीत. जोपर्यंत मुसलमानांची मते मिळतात तोपर्यंत मुस्लिम कायदा कशाकरिता बदला, ही यांची भूमिका आहे. काँग्रेसमधील आर्थिक समाजवादाच्या घोषणा करणारे डावे, सामाजिक समतावाद मानतातच असे मानण्याचे कारण नाही. पगारवाढ मिळणे आणि राष्ट्रीयीकरण होणे हेच त्यांनी आपल्या समाजवादी कार्यक्रमाचे सूत्र बनविले आहे. त्यांच्या समाजवादाला सर्वव्यापी स्वरूप प्राप्त झालेले नाही. स्त्री-पुरुष संबंधाच्या कल्पना आर्थिक समतेच्या कल्पनेएवढ्या पुढारलेल्या नाहीत. एरवी उत्तर भारतातील अनेक डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या तसेच काँग्रेसमधील जहाल पुढाऱ्यांच्या पत्नी आपल्या पतीबरोबर कधीतरी बाजारात फेरफटका मारताना दिसल्या असत्या. तशा त्या दिसत नाहीत. घराच्या चौकटीतच त्या बंदिस्त असतात. ही माणसे समतेचे एक युग आपल्या देशात आणणार आहेत याच्यावर कशाकरिता विश्वास ठेवायचा? अनेक काँग्रेसची मंडळी साधूंच्या भजनी लागलेली असतात, कुंडली बघत असतात, सरकारी समारंभात पूजा करण्याचा मोह त्यांना आवरत नाही. दलित समाजावर ग्रामीण भागात राजरोस अन्याय होतात, विहिरीवर त्यांना पाणीही भरू दिले जात नाही आणि तरीही अस्पृश्यताविरोधी कायदा कठोरपणे अंमलात आणण्याची जिद्द हे सरकार दाखवीत नाही. असे असताना मुस्लिम स्त्रियांच्या दास्यमुक्तीला त्यांच्याकडून हातभार लाभेल अशी अपेक्षाच करणे चुकीचे आहे.

 परंतु या काही बाबी सोडल्या तर सरकार अनेक वेळेला मुस्लिम जनमताचा विचार न करता धोरणे आखते असेही दिसून येते. जिथे मुस्लिम जनमत राष्ट्रीय हितसंबंधाच्या विरोधी असते तेव्हा सरकार त्याची पर्वा करीत नाही असेही आढळून येते. बांगलादेशमधील बिहारी मुसलमानांना भारतात परत येऊ द्यावे अशी मुस्लिम समाजातील नेत्यांची आणि सर्व मुस्लिम पक्षांची इच्छा होती. राज्य विधानसभांच्या १९७२ च्या निवडणुकीच्या वेळी बिहारमध्ये तर जनसंघासकट अनेक विरोधी पक्षांनी मुस्लिमांच्या या मागणीला उचलून धरले. मुस्लिम मतासाठी काँग्रेस मुसलमानांचा अनुनय करते हा आरोप करण्यात जनसंघ नेहमी आघाडीवर असतो. परंतु वेळप्रसंगी स्वत: जनसंघाचे नेते मतांसाठी मुसलमानांचा अनुनय करीत असतात हे यावरून दिसून आले आहे. परंतु पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी बिहारी मुसलमानांना परत घेतले जाणार नाही, आम्हाला काही लोकांनी मते दिली नाहीत तरी चालेल असे जाहीर केले, हे येथे ध्यानी घेणे आवश्यक आहे. काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे, नव्हे काश्मीर सरळ पाकिस्तानला द्यावे असे काही मुस्लिमांचे मत आहे. मुस्लिमांना खूष करण्यासाठी भारत सरकारने तेथे सार्वमत घेतलेले नाही किंवा ते पाकिस्तानला देऊन टाकलेले नाही. जेथे राष्ट्रीय हितसंबंध आणि मुसलमानांची अतार्किक भावनात्मक भूमिका परस्परविरोधी नसतात,

समारोप /१९३