पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेहोता. आपण राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष मुसलमानांच्या विरूद्ध नाही असे एकीकडे म्हणावयाचे आणि दुसरीकडे मात्र जे काही थोडेबहुत मुसलमान राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष असतील त्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी खुनशी प्रयत्न करावयाचे असे या बाबतीतील त्यांचे धोरण दिसते. युद्धकाळात आणि दंगलीच्या काळात प्रत्येक मुसलमानाच्या घरात ट्रान्समीटर असतो असाच ते प्रचार करीत असतात. महाराष्ट्रात बार्शीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मुसलमानांजवळ असंख्य ट्रान्समीटर असल्याचा एक-जनसंघीय कार्यकर्त्याने शोध लावला होता. बार्शीत जेमतेम दहा ते बारा मुसलमान मॅट्रिकपर्यंत शिकलेले आहेत. एक-दोन पदवीधर आहेत. शास्त्रविषयाचा पदवीधर कोणीच नाही. तंत्रविज्ञान जाणणारा कोणी नाही. बहुतेक मुसलमान गरीब आणि अशिक्षित, मोलमजुरी करणारे आणि व्यवसायाने नालबंद, तांबोळी, टांगेवाले किंवा रिक्षावाले असे आहेत. अशी ही माणसे, ट्रान्समीटर कशाशी खातात हे त्यांना माहीत नसेल. ते ट्रान्समीटरवरून त्यावेळी आयूबखानांना प्रत्यक्ष संपर्काने संदेश पाठवीत असत, असे आपण मानावयाचे आहे. अनेकदा दंगे होतात तेव्हा पाकिस्तान नभोवाणी दंग्यांची बातमी प्रथम देते. यावरून ही ट्रान्समीटर-कथा रंगविण्यात आली आहे. ज्याअर्थी पाकिस्तान प्रथम बातमी देते त्याअर्थी ती पाकिस्तानला कोणी तरी पुरवीत असले पाहिजे आणि ज्याअर्थी ही बातमी लगेच प्रसृत होते त्याअर्थी ती ट्रान्समीटरवर पाठवली गेली असली पाहिजे आणि ज्याअर्थी ती ट्रान्समीटरवर जाते त्या अर्थी ती मुसलमान पुरवीत असले पाहिजेत असे हे दुष्ट तर्कट आहे. पाकिस्तान नभोवाणी बातमी अगोदर कशी देते हे थोडे डोके चालविले तर सामान्य माणसाच्याही लक्षात येईल. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांमार्फत ही बातमी पाकिस्तानला पुरविली जाते. वृत्तसंस्थाप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी असतात. ते स्थानिक दंगलीच्या बातम्या आपल्या वृत्तसंस्थांकडे पाठवितात. या वृत्तसंस्था टेलिप्रिंटरवरून त्या देशभर प्रसृत करतात. या वृत्तसंस्थांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य असते. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था या बातम्या पाकिस्तानी वृत्तसंस्थांना देतात. शिवाय पाकिस्तानच्या हायकमिशनची कचेरी असतेच. या कचेरीत आपल्या वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर्स बसविलेले असतात. या टेलिप्रिंटरवर आलेली दंगलीची बातमी वकिलातीतील अधिकारी बिनतारी यंत्राने पाकिस्तानला पाठवीत असणार. अशा रीतीने ती पाकिस्तानात त्वरित जाऊ शकते. अशा बातम्या पाकिस्तानी नभोवाणीवर प्रसृत झाल्यानंतर भारतीय नभोवाणीवर येतात याचे कारण उघड आहे. आपल्या देशातील दंगलींच्या बातम्या देणे किंवा त्याला महत्त्व देणे आपल्याला प्रशस्त वाटत नाही, म्हणून आपले सरकार दंगलींच्या बातम्या त्वरित देत नाही. त्यामुळे दंगली वाढण्याचा संभव असतो. पाकिस्तानचे याउलट असते. पाकिस्तानला भारताला बदनाम करावयाचे असते. याउलट पाकिस्तानसंबंधीच्या काही बातम्या आपली नभोवाणी आधी प्रसृत करते. म्हणजे पाकिस्तानातील हजारो नागरिक ट्रान्समीटरवरून भारताला संदेश पाठवीत असतात असे समजावे लागेल.

 पाकिस्तानचे काही हेर भारतात असतीलच. ते बेकायदेशीररीत्या काही ट्रान्समीटर चालवीत असतीलही. आपल्या देशाचेही काही हेर पाकिस्तानात असण्याची शक्यता आहे.

हिंदुत्ववाद/१८१