पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विषयावर एक परिसंवाद झाला. या परिसंवादाला मी एक वक्ता म्हणून उपस्थित होतो. जनसंघाचे मुंबईचे कार्यकर्ते श्री. गं. बा. कानिटकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याचे बौद्धिक संघटक प्रा. शास्त्री या दोघांनी धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेवर कडाडून हल्ला चढविला. धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात नेहरूंची टिंगल त्यांनी करणे अपरिहार्यच होते. नेहरूद्वेषाने पछाडलेल्या पुण्यातील बहुसंख्यांक ब्राह्मण वर्गातलेच श्रोते असल्यामुळे नेहरूंची टिंगल करणारी वाक्ये ऐकल्याबरोबर गुदगुल्या केल्याप्रमाणे ते हसले यात आश्चर्य नाही. पुरीच्या शंकराचार्यांनी अनेकदा चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला. हरिजनांना मी बसू देणार नाही असे म्हटले. या गृहस्थांचे विकृत तर्कट कोणत्या थराला जाते हे 'भारतज्योती' या मुंबईच्या इंग्रजी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, "हरिजनांवर आम्ही अन्याय केला ही गोष्टच मुळी चुकीची आहे, उलट त्यांना आम्ही सन्मानाने वागविले. खरा अन्याय ब्राह्मणांवर झालेला आहे, ज्ञान घेण्याची ब्राह्मणांवर सक्ती होती. पूजा करण्याचे बंधन ब्राह्मणांवरच होते. हरिजनांना ज्ञान घेण्याच्या बंधनातून आम्ही मोकळे केले. पूजा करण्याची सक्ती त्यांच्यावर राहिली नाही."
 अशा ह्या गृहस्थांच्या गळ्यात गळा घालून जनसंघ गोहत्याबंदीची आंदोलने करीत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारी वक्तव्ये केली, तेव्हा देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली. परंतु जनसंघाच्या कोणत्याही नेत्याने याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. एक तर त्यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला पाहिजे किंवा गोळवलकरांच्या विधानांचा निषेध केला पाहिजे. जनसंघाचे नेते स्वस्थ बसले याची कारणे उलट आहेत. ते मनाने चातुर्वर्ण्यवादीच आहेत. परंतु देशातील जागृतीचा प्रवाह मात्र जातिभेद व चातुर्वर्ण्य मोडण्याकडे आहे. हिंदू समाजातील बहुसंख्यांक मागासलेल्या खालच्या जाती उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीचे ओझे किती दिवस वाहतील असे जनसंघाला वाटते? खरे म्हणजे जागृतीच्या या प्रवाहाविरुद्ध जाण्याची हिंमत नाही आणि चातुर्वर्ण्याच्या जुन्या श्रद्धा सोडवत नाहीत असा हा चमत्कारिक मानसिक पेचप्रसंग जनसंघापुढे उभा आहे.

 मुस्लिम प्रश्नांबाबतही हाच अनुभव येतो. मुस्लिम समाजाच्या कडव्या धर्मश्रद्धा, पाकिस्तानला जवळ मानण्याची प्रवृत्ती, विस्तारवादाची त्या समाजाची आकांक्षा याविषयी कोणी आक्षेप घेतला तर त्याबद्दल मतभेद होण्याचे कारण नाही. परंतु हिंदू समाजाच्या हाडीमांसी खिळलेल्या अस्पृश्यतेबद्दलदेखील असेच आक्षेप घेता येतील. हिंदूंच्या जातिनिष्ठा या टोळीवाल्यांच्या निष्ठांप्रमाणेच बनलेल्या आहेत. जातींच्या अनेक कुंपणांनी विभागल्या गेलेल्या हिंदू समाजाचा स्वभाव इतरांना दूर ठेवणारा असा बनला आहे. धर्म, त्याच्या श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारे धार्मिक राजकारण यातून कुठलेच समाज सुटलेले नाहीत. हिंदू धर्मही ह्याला अपवाद नाही, ही भूमिका जनसंघ कधीच घेऊ शकला नाही. त्याची एकूण भूमिका अशी आहे ही हिंदू धर्म हा जगातील श्रेष्ठ धर्म आहे, त्याने जगाला धार्मिक तत्त्वज्ञानाचा महान ठेवा दिलेला आहे. हिंदू धर्माइतका सहिष्णू धर्म जगात कोठेही आढळणार नाही. कारण आम्ही धर्मांतर करून घेत नाही. आता अस्पृश्यता वगैरे क्षुल्लक गोष्ट आमच्यात

हिंदुत्ववाद/१७९