पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 कारण नाही. परंतु अनेकदा असे दिसून येते की, हिंदुहिताचे जनसंघाचे धोरण मुसलमान वा ख्रिश्चन समाजाच्या विरुद्ध जाऊनही पोहोचलेले आहे. ख्रिश्चन मिशनरी चालवीत असलेल्या शाळांबद्दल सतत प्रचार, ख्रिश्चन करत असलेल्या धर्मांतराबद्दल आरडाओरडा ही याची उदाहरणे आहेत. यासंबंधी जनसंघीयांचे आक्षेप मजेशीर असतात. ख्रिश्चन चालवीत असलेल्या शाळांतून ख्रिश्चन धर्माचे संस्कार हेतुपुरस्सर घडविले जातात. अशी हिंदुत्ववाद्यांची नेहमीची तक्रार असते. परंतु हिंदू चालवीत असलेल्या शाळांतून नेमके काय घडत असते. याचा त्यांनी विचार केला तर बरे होईल. तेथेही देवाचे स्तोत्र सक्तीने गायिले जातेच. या शाळांतून अल्पसंख्यांक जमातीची मुले असतातच. त्यांनाही ते सक्तीने म्हणायला लावले. अशावेळी बहुसंख्यांकांचे धर्मसंस्कार आपण अल्पसंख्यांकांवर लादीत आहोत असे त्यांच्या मनात का येत नाही? ख्रिश्चन धर्मांतराबद्दल आरडाओरडा करणारे शुद्धीकरणाचा मात्र पाठपुरावा करणारे आहेत. आता शुद्धीकरणाच्या निमित्ताने इतरांना हिंदू धर्मात घेण्याचा दरवाजा मोकळा झाला . आहे. परंतु एकतर कुणीच धर्मांतर करू नये अशी भूमिका घेता येईल किंवा साक्षर आणि प्रौढ माणसाचे न्यायाधीशासमोर प्रतिज्ञापत्र देऊनच धर्मांतर केले जावे असे म्हणता येईल.' यामुळे अज्ञानाने व बनवाबनवीने धर्मांतर केले जाण्यांचा संभव टाळता येईल. किंवा सर्वांना धर्मांतराचे स्वातंत्र्य आहे ही भूमिका घेता येईल. परंतु शुद्धीकरणाची टिमकी वाजवायची, शुद्धीकरण झालेल्यांची वृत्तपत्रांतून छायाचित्रे प्रसिद्ध करायची आणि ख्रिश्चनांनी धर्मांतर घडवून आणले तर आरडाओरडा करायचा हा सरळसरळ दुटप्पीपणा झाला.
 मुस्लिम प्रश्नाने तर जनसंघाला पहिल्यापासून पछाडलेले आहे. औरंगजेबाच्या सैन्याला जसे रात्रंदिवस संताजी व धनाजी हे मराठे सरदार आपल्यावर तुटून पडत आहेत असा भास होत असे, त्यांप्रमाणे मुसलमानही आपल्यावर तुटून पडत असल्याच्या भयाने जनसंघवाले ... पछाडलेले आहेत. एकतर फाळणीच्या कटू इतिहासाचा हा परिणाम आहे. कारण अखंड भारताच्या हिंदू सांस्कृतिक कल्पनेचे भूत जनसंघाच्या मानगुटीवर बसले आहे. अखंड भारत व्हायचा असेल तर तो केवळ हिंदंना एका राष्ट्रीय व्यासपीठावर आणून होणार नाही. हिंद आणि मुसलमान या दोघांची मने, एकराष्ट्रीय जीवनात नांदू शकतील अशी तयारी केल्याखेरीज - अखंड हिंदुस्तान होऊ शकला नसता आणि यापुढेही होऊ शकणार नाही. हे करायचे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे प्रवाह मजबूत करावे लागतील आणि जनसंघाला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची कास धरावी लागेल. परंतु हिंदू आणि मुसलमान सलोख्याने नांदायला तयार होतील तेव्हा भारत अखंड असला काय आणि त्रिखंड असला काय, काही फरक पडणार नाही. कारण तेव्हा तिन्ही देशांच्या संबंधांचे स्वरूपही पार बदललेले असेल. मुक्त प्रवास, संयुक्त बाजारपेठ, विकासाच्या संयुक्त योजना अशा प्रकारची पावले आपोआपच टाकली जातील आणि एका वेगळ्या बंधनाने ही तिन्ही राष्ट्रे जोडली जातील. हे साधायचे तर धर्मनिरपेक्षतावादाचीच कास धरावी लागेल.

 आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद मानतो असेच या प्रतिपादनाबाबत जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे उत्तर असते. परंतु त्यांचे वर्तन काय सांगते? पुण्याला १९७३ साली 'धर्मनिरपेक्षता' या १७८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

१७८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान