पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. परंतु त्यांना अस्पृश्यता हटवायची होती असे तुमचे म्हणणे आहे. पक्ष विसर्जित करून तुम्ही या कार्याला का वाहून घेत नाही?" हे सर्व मित्र माझे हे खासगी संभाषण ऐकून, "तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आता काहीतरी केले पाहिजे बुवा" असे म्हणत असत. परंतु घरी गेले की पुन्हा मुस्लिमद्वेषाचे दळण दळू लागत.
 हिंदुमहासभा हा पक्ष जसजसा निष्प्रभ बनत गेला तसतसा जनसंघ हा पक्ष क्रमाक्रमाने वाढत गेलेला आहे. हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने अत्यंत आणीबाणीच्या काळात त्यांना जनसंघाने व्यासपीठ पुरविले. गांधीजींच्या खुनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे तेंव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होते. पुढे १९५० साली तेंव्हाच्या पूर्व बंगालमध्ये जातीय दंगली झाल्या. या दंगलींसंबंधी नेहरूंच्या धोरणांशी मतभेद. होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि जनसंघ हा पक्ष काढला. मुखर्जीची पार्श्वभूमी हिंदत्ववादीच होती. ते यापूर्वी हिंदमहासभेचे प्रतिनिधी या नात्याने अखंड बंगालच्या फजलूल हक्क मंत्रिमंडळात होते. हिंदुमहासभा पुनरुज्जीवित करण्याचा मार्ग न पत्करता नवा पक्ष बांधण्याचे काम त्यांनी अंगीकारले. याचे कारण गांधीजींच्या खुनाची दाट छाया हिंदू महासभेवर पडली होती. यामुळे सरळ कोऱ्या पाटीवर सुरूवात करणे त्यांना अधिक सोयीस्कर वाटले असावे. मात्र या पक्षासाठीचे रंगरूट राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी आणले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरम्यान ससेहोलपट झाली होती आणि सांस्कृतिकतेच्या बुरख्याखाली सत्ता हातात घेण्याच्या त्यांच्या आकांक्षेच्या गांधीजींच्या खुनानंतर ठिकऱ्या उडाल्या होत्या. अशा परिस्थितीत राजकारणात प्रभावीपणे वावरण्याची एक संधी म्हणून जनसंघ अस्तित्वात आला असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. गांधीजींच्या खुनानंतर दबल्या गेलेल्या हिंदू आणि मुसलमान जातीयवादी प्रवृत्ती पुन्हा हळूहळू डोके वर काढू लागल्या. वर आलेल्या हिंद जातीयवादी शक्ती सरळ जनसंघाच्या मागे उभ्या राहू लागल्या. पक्षाचे सामर्थ्य उभे करायला जनसंघाला आयताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचा संच मिळाला आणि त्यांनी झपाट्याने पक्षसंघटना उभारली. प्रत्येक आंदोलनात आणि प्रत्येक निवडणकीत या पक्षाची शक्ती वाढत गेली आहे आणि त्यातूनच या पक्षापुढे काही पेचप्रसंग उभे राहिले आहेत.

 श्री. वाजपेयी, श्री. नानाजी देशमुख, कुशाबा ठाकरे, वसंत गजेंद्रगडकर इत्यादी सर्व जनसंघ नेते पूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. यामुळेच एक प्रकारचे दुटप्पी वर्तन जनसंघाच्या धोरणात दिसते. जनसंघाच्या घटनेप्रमाणे सर्व जातिधर्माच्या लोकांना पक्षात प्रवेश आहे. परंतु घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष असलेले ध्येयधोरण नेहमी हिंदंच्या हिताची तेवढीच काळजी घेणारे असते. प्रत्यक्षात हिंदू हिताची काळजी घेणारा पक्ष घटनात्मकदृष्ट्या मात्र धर्मनिरपेक्ष आहे! एखाद्या पक्षाची घटना कशी आहे यावरूनच केवळ त्या पक्षाचे स्वरूप कसे आहे हे ठरविणे कठीण आहे. त्या पक्षाचे ध्येयधोरण पाहनच ते ठरविले पाहिजे. जनसंघ हिंदूंच्या हिताचे रक्षण करतो याबद्दल आक्षेप बाळगण्याचे कारण नाही. इतरांचे अहित न करता हिंदूंचे भले करण्याचा विचार अयोग्य आहे असे मानण्याचे

हिंदुत्ववाद/१७७