पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे म्हणण्याचा कदाचित कुणाला मोह होईल. तसे असण्याचे काहीच कारण नाही. एसेम जोशी, नानासाहेब गोरे आणि अच्युतराव पटवर्धन यांच्या पायाशी बसून मी सार्वजनिक जीवनाचे धडे घेतले आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे काम सुरू करण्यास मला प्रसिद्ध सर्वोदयी नेते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांनी प्रवृत्त केले. तेव्हा माझे सर्व गुरू ब्राह्मणच आहेत. वरील विवेचन हे ब्राह्मणवर्गाच्या जातीयवादाचे आहे.)
 स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुमहासभा हा एक जोरकस पक्ष मानला जात होता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुमहासभा यांची तेव्हा स्पर्धा चालत असे. ही स्पर्धा प्रामुख्याने गोळवलकर आणि सावरकर यांच्या नेतृत्वाची स्पर्धा असे. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदुमहासभावादी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचा खून केला. खून करण्याच्या सल्लामसलतीत सावरकरदेखील असावेत असे वाटते. (श्री. गोखले यांचे पुस्तक पहा. 'मी असे अनेक खून पचविले आहेत' असे विधान करून सावरकरांनी आपण खुनाच्या कटात असल्याचे सूचित केले आहे.) गांधीजींचा खून झाल्यावर हिंदुत्ववाद्यांविरुद्ध एक तीव्र प्रतिक्रिया उमटली. हिंदुत्ववादी पक्ष जवळजवळ बरखास्त झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली. हिंदुमहासभा हा पक्ष पुढे हळूहळू निकालात निघाला. आता अधूनमधून त्यांची राष्ट्रीय अधिवेशने भरतात आणि काही विनोदी ठराव करून ही मंडळी घरी परततात. ग्वाल्हेर येथे १९६६ साली झालेल्या हिंदमहासभेच्या अधिवेशनात दोन नमुनेदार ठराव झाले. पहिल्या ठरावान्वये भारतपाकिस्तानमध्ये लोकसंख्येची अदलाबदल करावी असे ठरविण्यात आले. लागोपाठ जो दुसरा ठराव करण्यात आला त्याअन्वये अखंड भारत स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्याची घोषणा झाली. या अधिवेशनाहून परत आलेल्या हिंदुमहासभेच्या माझ्या एका मित्राला या ठरावातील विसंगती मी दाखविल्या, तेव्हा तो म्हणाला, “ही ग्रेट स्ट्रॅटेजी आहे. पहिल्यांदा टॅक्टीक्ससाठी लोकसंख्येची अदलाबदल करून मुसलमानांचे वेगळे राष्ट्र आहे असे मान्य करावयाचे. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करून ते जिंकावयाचे आणि मुसलमानांना खैबरच्या सीमेवर हाकलावयाचे. हिंदूंचे सामर्थ्यशाली सैन्य लाहोरकडे कूच करताच हे लक्षावधी मुसलमान खैबरकडे पळून जातील यात शंका नाही."

 माझा मित्र अशिक्षित नाही, चांगले वाचन असलेला आणि पदवीधर आहे. (परंतु त्यालाही या जगातील एकूण शक्तींचा, प्रवाहांचा गंध नाही. एखाद्या उद्दिष्टामागील शक्याशक्यतेचा विचार त्याच्या डोक्यात येऊ शकत नाही. सारे कसे अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टीप्रमाणे घडत असते अशी त्याची श्रद्धा आहे.) मुस्लिमद्वेषाने यांची दृष्टी किती झाकळून गेली याचे हे उदाहरण आहे. हिंदुमहासभेच्या अनेक कार्यकर्त्यांशी माझा चांगला परिचय आहे. अनेकदा खासगी चर्चेत या विषयावर बोलणे निघते. मी त्यांना अनेकदा म्हणालो की, “एवीतेवी हिदुमहासभेचे काही सामर्थ्य उरले नाही पक्ष विस्कळीत झाला आहे. कार्यकर्ते उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही जी मंडळी पक्षात आहात ते पक्षविसर्जनाचा निर्णय का घेत नाही? हिंदमहासभेचे राष्ट्रीय पुनरुज्जीवन होण्याचा संभव अतिशय कमी आहे. सावरकर कितपत सुधारणावादी होते याबाबत मला प्रामाणिक शंका

१७६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान