पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टीका केलेली नाही हे इथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी शिवाजीवर टीका केलेली आहे. त्याने मुसलमानांना बाटवून पुन्हा हिंदू करून का घेतले नाही असा त्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे, खरे म्हणजे पेशव्यांनीही तसे काही केलेले नाही. उलट पानिपतच्या लढाईत फार हादरा बसला. अब्दालीच्या या स्वारीच्या वेळी पेशव्यांनी केलेल्या राजनैतिक आणि लष्करी डावपेचांच्या चुकांविषयी इतिहासकारांनी खूप लिहिले आहे. सावरकरांनी मात्र या सर्व ब्राह्मणी इतिहासाची टिमकी वाजविण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी सदाशिवभाऊ दिल्ली जिंकल्यानंतर दिल्लीच्या तख्तावर विश्वासरावांना बसविणार होते, अशी मसलत झाली होती.अशा भाकडकथा सावरकरांनी लिहिल्या नसत्या. ही विधाने करताना त्यांना काही ऐतिहासिक पुरावा देण्याची आवश्यकता भासली नाही. आपल्या अंध ब्राह्मणभक्तीचे असे हास्यास्पद प्रदर्शन सावरकरांनी केलेले आहे. तरीही सावरकर हे सावरकरभक्तांकडून 'सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते' समजले जातात.

 सावरकरांच्या या अंध मुस्लिमविरोधाचे स्वरूप नीट समजावून घेतले पाहिजे. आरंभीच्या “सशस्त्र क्रांतीच्या प्रेरणेने भारावलेल्या काळात ते मुस्लिमविरोधक नव्हते. १८५७ च्या युद्धावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात मुस्लिमविरोधाचा अंशही आढळत नाही. 'अभिनव भारत' या तरुणपणी स्थापन केलेल्या क्रांतिकारकांच्या संघटनेत सर शिकंदर हयातखान हेदेखील होते. पुढे अंदमानला कैद्यांवर मुस्लिम पहारेकरी अत्याचार करताना त्यांनी पाहिले आणि त्यामुळे ते हळूहळू मुस्लिमविरोधी झाले. मुस्लिम समाजासंबंधी त्यांनी आक्षेप घेणे चुकीचे नव्हते. मुस्लिम समाजाचा धर्मवाद, जातिवाद याबाबत सावरकरांशी मतभेद होण्याचे कारण नाही. या पुस्तकात त्याचे विवेचन झालेले आहे. मात्र हिंदूंत तशीच समान आंदोलने प्रबळ असतील तरच मुस्लिम जातीयवादाला आळा बसेल असे त्यांचे चुकीचे मत होते. म्हणूनच पाकिस्तानची घोषणा केल्यानंतर सावरकरांनी हिंदुराष्ट्राची घोषणा केली. देशात पंचवीस टक्के मुसलमान राहतात, त्यांच्या पाकिस्तानच्या मागणीला विरोध करताना त्यांना राष्ट्रवादात सामावून कसे घ्यायचे या संबंधात त्यांनी काहीच म्हटलेले नाही. पाच प्रांतांत बहुसंख्याक असलेले मुसलमान धाकदडपशाहीने नमले असते अशी सावरकरांची रम्य कल्पना होती. या मुसलमानांना बदलायचे कसे, यासंबंधीदेखील सावरकर काही सांगत नाहीत. मात्र ते बदलले पाहिजेत असा ते आग्रह धरतात आणि कौतुकाने केमाल पाशाचे उदाहरण सांगतात. मुसलमान हा एक समाजघटक आहे आणि त्याला सामाजिक स्थित्यंतराचे नियम लागू आहेत हे त्यांनी कधी लक्षात घेतले नाही. बदलत्या इतिहासाची दखलही ते घेत असताना दिसत नव्हते. हिंदू आणि मुसलमान समाजाच्या स्थित्यंतराची ते लावीत असलेले मापे दुटप्पी होती. अस्पृश्यतेबद्दल ते 'ही रूढी बदलण्याचे प्रयत्न केले पाहिजेत' असे म्हणत असत. समाजबदलाच्या नियमाप्रमाणे हिंदू समाजाला अवधी देण्याची त्यांची मागणी होती. मुसलमानांना मात्र हा निकष लागू नव्हता. त्यांची चीड जगात होणाऱ्या कुठल्याही अन्यायाविरुद्ध नव्हती.मुसलमानांनी हिंदूंवर अन्याय करू नये एवढी ती मर्यादित होती. हिंदूंनी हिंदूंवर सतत अन्यायच केलेले आहेत, परंतु याची पोडतिडीक त्यांच्या लिखाणात वा भाषणात कधी

१७४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान