पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  वस्तुत: या देशात समानता असेल आणि हिंदुराष्ट्रही असेल या परस्परविरोधी विधानांचा विचार केला की सावरकरांचा वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट होतो आणि तो म्हणजे मध्ययुगीन प्रेरणांवर आधुनिक विज्ञानाचे केलेले कलम अशी त्याची घडण आहे असे वाटू लागते.

 सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेचाही नीट विचार होणे आवश्यक आहे. ते आधुनिक होते, अस्पृश्यतेला विरोध करीत होते, हिंदू जातिव्यवस्थेच्या विरुद्ध होते, त्यांना अभिप्रेत असलेला आधुनिकतावाद हिंदुसमाज सामर्थ्यशाली व्हावा आणि त्याने इतरांवर मात करावी याकरिता आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, बलवानच जगात शिल्लक उरतो, अशाच प्रकारची वाक्ये सतत त्यांच्या लिखाणात किंवा भाषणात विखुरलेली आहेत. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो. ही एक कटू वस्तुस्थिती झाली. परंतु मोठ्या माशाने छोट्या माशाला गिळू नये, छोट्या माशालाही जगता आले पाहिजे ही भूमिका मांडणे आणि तिचा आग्रह धरणे हा आजच्या जगात समानतेचे युग आणण्याच्या प्रयत्नाचा भाग होतो. या बाबतीत सावरकर कोणत्या पक्षाचे होते? हिंदूंनी बलिष्ठ व्हावे असे म्हणायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. हिंदूंनी विज्ञाननिष्ठ बनावे म्हणजे त्यांना आधुनिक हत्यारे वापरता येतील व इतरांचा पाडाव करता येईल असे त्यांचे प्रतिपादन आहे. अस्पृश्यता हटवायची ती हरिजनांना मूलभूत हक्क लाभावे म्हणून नव्हे, तर हिंदूंनी बलिष्ठ व्हावे म्हणून. या दृष्टीने ते जीनांच्या जवळ येतात. जीनांची आधुनिकता आणि सावरकरांची आधुनिकता यांत पुष्कळ साम्य आहे. सावरकरांच्या आधुनिकतेला मुस्लिमविरोधाची बैठक लाभलेली आहे. या त्यांच्या आधुनिक विचारांच्या बैठकीचा संदर्भ ध्यानी घेतला म्हणजे सावरकरांना मुस्लिम समाजाची भीती वाटत होती हे लक्षात येते. भारतीय मुस्लिम समाजाच्या तीनपट मोठा असलेला हिंदू समाज कालांतराने नष्ट होणार आहे, मुसलमान समाज त्याला गिळंकृत करणार आहे, या भीतीने ते पछाडलेले होते आणि मग अफगाणिस्तान भारतीय मुसलमानांच्या संगनमताने भारतावर हल्ला करणार आहे असे त्यांना वाटू लागले आणि ते भारतीय वृत्तपत्रांतून अफगाणिस्तानच्या अमीराला हल्ला न करण्याची ताकीद देत. त्याला असाही इशारा देत की आम्ही एकटे नाही. नेपाळ हे हिंदू राष्ट्र आपल्या मदतीला धावून येईल. राष्ट्रवादाच्या प्रेरणांविषयी कमालीचे अज्ञानी असलेल्या सावरकरांची ही विधाने हास्यास्पद होती. पुढे फाळणी झाल्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान संबंध दुरावले आणि अफगाणिस्तान भारताच्या जवळ आले आणि नेपाळ-भारत संबंध हळूहळू तुटक तुटक होत गेले आणि भारत-पाक वादात अधूनमधून ते पाकच्या बाजूने उभे राहू लागले. नेपाळ काय किंवा अफगाणिस्तान काय, ही दोन्ही राष्ट्रे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांनुसार आपली धोरणे आखीत असतात, परंतु या प्रेरणा सावरकरांना कधी उमगलेल्या नाहीत. म्हणून ते आपल्या कोशातच राहिले आणि त्यांचे आकर्षण महाराष्ट्रातील ब्राह्मणांभोवती मर्यादित राहिले. महाराष्ट्रातील ब्राह्मणांना त्यांचे आकर्षण वाटणे साहजिक होते. उत्तर भारतातील मुसलमानांप्रमाणेच सत्ता व ऐश्वर्य भोगलेला हा वर्ग आहे. पेशवाईची स्वप्ने अधूनमधून त्यांना पडतातच. सावरकरांनी या स्वप्नांना वाट करून दिली आणि म्हणून ते त्यांचे नेते बनले. सावरकरांनी पेशव्यांच्या इतिहासावर कधीही

हिंदुत्ववाद/१७३