पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/170

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
जमीनदोस्त केल्याखेरीज मुस्लिमांशी सरळ दोन हात करता येणार नाहीत असेच ते मानीत आले आहेत.
 मुस्लिम समाज इथे अस्तित्वात नसता तर हिंदुत्ववाद्याने धर्मनिरपेक्षतेविषयी कोणती भूमिका घेतली असती? पाकिस्तानात हिंदू फारसे अस्तित्वात नाहीत. इतर प्रबळ अल्पसंख्यांकही अस्तित्वात नाहीत आणि तरीही तेथे इस्लामी राज्य स्थापन करण्याची आकांक्षा बाळगणारे सामर्थ्यवान मुस्लिम पक्ष अस्तित्वात आहेत. भारतात मुस्लिम समाज अस्तित्वात नसता तरी धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेचे ध्येय राहिले असते आणि या ध्येयाला विरोध करणारे हिंदुत्ववादी अस्तित्वात असतेच.
 हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करणे आवश्यक आहे. धर्मनिरपेक्षताविरोधी मुस्लिम प्रवृत्तींशी आमचा झगडा आहे, इतकेच म्हणून हिंदुत्ववादी मंडळी थांबत नाहीत. मुस्लिम परके आहेत, ही या विरोधामागची भूमिका आहे. बाहेरून ते येथे आले, येथील भूमी त्यांनी जिंकली, येथील हिंदूंना बाटवून मुसलमान केले, येथे अन्यायाने राज्य केले, इतिहासाचा हा क्रम पुन्हा उलटा फिरवायचा आहे ही ईर्ष्या जेव्हा हिंदुत्ववाद्यांच्या बोलण्यातून व लेखनातून व्यक्त होते तेव्हा काही प्रश्न सहजच उपस्थित होतात. एक तर मुस्लिम समाजाच्या सध्याच्या वागण्यापुरता त्यांचा आक्षेप मर्यादित नाही. मुस्लिम समाजाच्या अस्तित्वालाच त्यांचा विरोध आहे, ही वृत्ती ते कळत नकळत व्यक्त करीत असतात. त्यांना धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था मान्य नाही. हिंदूराज्य किंवा हिंदूंचे वर्चस्व असलेले राज्य अस्तित्वात यावे असे त्यांना वाटते. व्यक्तींची समानता त्यांना अमान्य आहे. बहुधा चातुर्वर्ण्याधिष्ठित समाजव्यवस्था भारतात असावी या श्रद्धेने ते पछाडलेले आहेत. हिंदूंची राज्यव्यवस्था याचाच अर्थ चातुर्वर्ण्याधिष्ठित राज्यव्यवस्था असा घ्यावयाचा आहे. एरवी हिंदुत्ववाद्यात उच्चवर्णीयांचा आणि चातुर्वर्ण्यवाद्यांचा भरणा का असावा?
 हिंदत्ववादी म्हणविणारी ही मंडळी पुन्हा वेगवेगळ्या विचारसरणींत विभागली गेली आहे. वैदिक काळाला आदर्श मानणारे आर्यसमाजी, चातुर्वर्ण्याच्या चौकटीवर श्रद्धा ठेवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुराष्ट्रवादाच्या प्रेरणा लाभलेले हिंदुमहासभावादी अशा तीन वर्गांत स्थूलमानाने हिंदुत्ववादी विभागले गेलेले आहेत. हिंदू राज्याची घोषणा करणारा रामराज्य पक्ष आता संपुष्टात आल्यामुळे त्याचा वेगळा विचार करण्याचे कारण नाही.
 हिंदुत्ववाद्यांतील हे तीन प्रवाह तीन व्यक्तींनी घातलेल्या भिन्न वैचारिक पायांवर आधारलेले आहेत. स्वामी दयानंद हे आर्य समाजाचे प्रणेते होते आणि हेडगेवार व गोळवलकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पाया दृढ केला आहे. हिंदू राष्ट्रवादाच्या, हिंदुमहासभेच्या घोषणेचे जनक श्री. वि. दा. सावरकर होते. हिंदुत्ववाद्यांच्या ज्या चळवळी होत्या किंवा अस्तित्वात आहेत त्या प्रामुख्याने या तीन व्यक्तींच्या सिद्धांतांवर आधारलेल्या आहेत.

 त्यातील आर्य समाजाचा प्रभाव पंजाब आणि उत्तर प्रदेशचा पूर्व विभाग यात एकेकाळी खूप होता आणि आजही आहे. गुजरातेत जन्मलेल्या स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाने पंजाबमध्ये मूळ धरावे याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंजाबमधील त्यावेळच्या सामाजिक

हिंदुत्ववाद/१६९