पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/169

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
.७.
हिंदुत्ववाद


 मुस्लिम जातीयवादाच्या या उग्र स्वरूपाला दंड थोपटून आव्हान देण्याचा प्रयत्न करणारा एक हिंदू वर्ग अस्तित्वात आला आहे. हा वर्ग स्वत:ला 'हिंदुत्ववादी' या नावाने ओळखतो. मुस्लिम समाजाचे सर्वंकष आक्रमण हिंदू समाजावर होत आहे. याला परतवून लावणे, शक्य तो मुस्लिम समाजाचा पाडाव करणे, मुस्लिम आक्रमणाने मलिन झालेली सिंधूपर्यंतची ही भूमी पुन्हा भारतमातेला जोडणे हे आपले परम कर्तव्य आहे अशी श्रद्धा ही हिंदुत्ववादी मंडळी बाळगून असतात.
 मुस्लिम समाजाच्या संकुचित धर्मवादाला आणि जातीयवादाला विरोध करणे काही पाप होत नाही. प्रश्न या विरोधाचे स्वरूप कोणते असावे हा आहे. धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेच्या चौकटीत मुस्लिम समाजाच्या धर्मनिरपेक्षताविरोधी वर्तनाला विरोध करीत राहणे हा एक मार्ग . ठरतो. यामुळे आपण आपोआपच धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्थेची चौकट बळकट करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावतो. पण मग आपण धर्मनिरपेक्ष असतो, समाजव्यवस्थेचे आपले निकषच धर्मनिरपेक्षतेचे निकष असतात. हिंदुत्ववाद्यांचा मुस्लिम धर्मवादाला आणि जातीयवादाला होणारा विरोध या मार्गात बसत नाही. एक तर धर्मनिरपेक्षतेची चौकट त्यांनाही मान्य नाही. धर्मनिरपेक्षता याचा मुस्लिम अनुनय असा सोयीस्कर अर्थ त्यांनी लावून घेतला आहे. आपली एक वेगळी विचारसरणी आहे आणि धर्मनिरपेक्षतेची विचारसरणी ही आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मुळाशी येत आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. थोडक्यात, मुस्लिम जातीयवादाच्या संरक्षणाचा पहिला तट धर्मनिरपेक्षतेची राजवट हा आहे आणि तो