पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/168

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
कठीण आहे. केवळ आंतरधर्मीय लग्नांच्या मार्गाने एकात्मता साध्य होऊ शकणार नाही. आणि एकात्मता साध्य व्हावी म्हणून 'आंतरधर्मीय लग्ने करा' असे म्हणून लोक लग्ने करीत नाहीत. पण ज्याअर्थी मिश्रविवाहाची प्रवृत्ती दिसू लागली आहे त्याअर्थी समाजात व्यापक एकात्मतेच्या प्रवृत्ती वाढीला लागल्या आहेत असे मानायला हरकत नाही.
 शिक्षणाबाबत मुस्लिम नजिकच्या काळात फारशी प्रगती करू शकेल असे वाटत नाही. शिक्षणाचा प्रसार होणे हा जातीयवादावर उतारा आहे असे काहीजण मानतात. तूर्त तरी महाराष्ट्रातील सुशिक्षित ब्राह्मण जनसंघात आणि उत्तर प्रदेशातील सुशिक्षित मुसलमान जमाते इस्लामी किंवा मजलिस या पंथात जाताना दिसतो आहे. ज्या देशात प्रचंड प्रमाणात दारिद्र्य आणि उपासमार आहे, खूप बेकारी आहे, एकूण जीवनमान निकृष्ट प्रतीचे आहे, औद्योगिकीकरण मंदावलेले आहे, त्या देशात शिक्षणाचा तेवढा कसा काय लवकर प्रसार होणार आहे हे कळणे कठीण आहे. आणि खरोखर मोठ्या प्रमाणात शिक्षण मिळू लागले तर एवढ्या प्रचंड सुशिक्षितांवर ओढवणाऱ्या बेकारीचे परिणाम अधिक भयानक होण्याची शक्यता आहे. यातून उलट जातीयवादालाच खतपाणी मिळेल.
 मुस्लिम समाजात शिक्षणाच्या प्रसाराने बदल होईल हा मूलत: एक भ्रम आहे. कोणत्याही समाजाच्या सामूहिक ऐतिहासिक प्रेरणा शिक्षणामुळे बदलत नाहीत आणि शिकलेला मुस्लिम वर्ग मुस्लिम समाजाला वेगळे वळण लावण्याची शक्यता दिसत नाही. हा बदल मुसलमान समाजातील खालच्या वर्गातील लोकांत झपाट्याने शिक्षण आल्यामुळे होऊ शकेल. परंतु ही बाब लवकर घडून येणारी नाही. एकूण सर्वांगीण विकासाच्या मंदपणाबरोबरच शैक्षणिक विकासदेखील आपल्या देशात खुंटलेला आहे.
 यामुळे राजकीयदृष्ट्या सध्या तरी मुस्लिम जातीयवादी आणि धर्मवादी पक्षास रान मोकळे आहे. मुस्लिम लीग यामुळे भारतात पाय रोवण्याचा आटोकाट प्रयत्न करील. जमाते इस्लामीची ताकद गेल्या काही वर्षांत खचित वाढली आहे. याचा अर्थ असा नव्हे की मुस्लिम लीग पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळाइतकी सर्व मुसलमानांची प्रातिनिधिक संस्था बनेल. जमाते इस्लामीलाही अधिकाधिक अनुयायी लाभतील असे समजणे चुकीचे ठरेल. या वाढीची मर्यादा आता लवकरच गाठली जाईल असे दिसते. मुस्लिम समाजातील या जातीयवादी व धर्मवादी चळवळींचा आलेख काढायचा तर यातील चढ-उताराशिवाय दुसरे काही दाखविता येणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पद्धतीचे राजकारण ते करू पाहत आहेत त्याला आजची परिस्थिती अनुकूल नाही हे त्यांनी ध्यानातच घेतलेले नाही. संयुक्त मतदारसंघ, प्रौढ मतदान, पाठबळ देणाऱ्या तिसऱ्या शक्तीचा अभाव आणि विखुरलेला मुस्लिम समाज या बाबींमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या प्रकारच्या मुस्लिम जातीयवादी संघटना उभ्या होत्या तशा आता उभ्या राहण्यात प्रचंड अडथळे आले आहेत. या अडथळ्यांना न जुमानता पुन्हापुन्हा संघटना उभ्या करण्याचे प्रयत्न होत राहणार आणि पुन्हा पुन्हा त्यांना अपयश येत राहणार. त्यांची ताकद उपद्रव देणाऱ्या शक्तीच्या स्वरूपातच राहणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातीयवादी शक्तींचे संघटन होत नाही हे लक्षात आले की आपोआपच योग्य ते राजकीय प्रवाह मुस्लिम समाजात दिसू लागतील.