पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धार्मिक समारंभातून आपोआपच या संस्थांचा प्रचार चालतो. अनेक धार्मिक उत्सव करण्याची प्रवृत्ती मुसलमानांत वाढली आहे. (याला हिंदूही अपवाद नाहीत. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणपती उत्सवाचे स्तोम हे याचे निदर्शक आहे.) उत्तर प्रदेशात शाळा सोडून मौलवी बनणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. एक सुशिक्षित मुसलमान बाई मला म्हणाल्या, "मौलवी झाला की मुसलमान मुलगा ताईत देऊ लागतो. गावोगावी जातो. ताईत विकून तीन-चारशे रूपये कमावतो. त्याचे आई-वडील म्हणतात, क्लार्क होण्यापेक्षा मौलवी होणे बरे. क्लार्क होऊन काय मिळाले असते?" केरळमध्ये अरबीचा आणि उर्दचा अधिक प्रसार करण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. उत्तर प्रदेशातून शेकडो उर्दू शिक्षक केरळात नेण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात मुस्लिम विद्यार्थ्यांना सरकारने उर्दूतून शिक्षण नाकारल्यामुळे : मदरसा शिक्षणाला अप्रत्यक्षरीत्या पाठबळ मिळाले. मदरशातून उर्दू शिक्षणाची सोय मुसलमान खासगीरीत्या करू लागले. जम्मू आणि काश्मीर राज्यात मुसलमानांना आमिष दाखविण्याच्या हेतूने उर्दू भाषा सक्तीची करण्यात आली. आता मात्र काश्मीरी, डोग्री आणि लडाखी या . प्रादेशिक भाषांनी उर्दूची जागा घेतली आहे.
 याला एक दुसरी बाजूही आहे. अधिकाधिक मुसलमान विद्यार्थी उर्दऐवजी इतर भाषिक माध्यमांतून शिक्षण घेऊ लागले आहेत. मुस्लिम स्त्रिया शिक्षण येत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मुस्लिम समाजाच्याही वेगवेगळ्या वर्गात प्रचंड उलथापालथ झाली आहे. उत्तर प्रदेशात जमीनदारी नष्ट झाली. याचा फटका साहजिकच असंख्य मुसलमानांना बसला आहे व त्यांची परिस्थिती खालावली आहे. परंतु इतर काही धंदे ऊर्जितावस्थेला आले आणि त्या धंद्यांमुळे मुसलमानांची परिस्थिती सुधारली. साधारणत: मुस्लिम समाजातील दुसरा प्रवाह असा आहे की तंत्रविज्ञानाच्या शिक्षणाकडे मुस्लिम समाजातील विद्यार्थी आकर्षित होत नाहीत. परंतु शिक्षण न घेता करता येण्यासारखे जे तंत्रविषयक व्यवसाय असतात अशा व्यवसायांमध्ये मुसलमानांचे प्रमाण फार मोठे आहे.
 अनेक शहरांतील मुसलमानांचे अलग मोहल्ले कमी होत चालले आहेत व मुस्लिम वस्ती शहराच्या वेगवेगळ्या विभागांतून विखुरली जाऊ लागली आहे. अर्थात विखुरले जाण्याला मर्यादा आहे. शिवाय नवे मुस्लिम मोहल्ले काही शहरांतून उभे राहत आहेतच. या उलट तेलंगणात आता खेडी ओस पडली आहेत आणि मुसलमानांनी शहरांकडे धाव घेतली आहे. मुस्लिम मोहल्ले तेथे अधिक भरभराटले आहेत.
 हे जे बदल होत आहेत त्यातील काहींचे दूरगामी परिणाम जाणवतात. हळूहळू मुस्लिम समाजात नवे नेतृत्व उदयाला येण्याची शक्यता आहे. येथे नवे नेतृत्व याचा अर्थ केवळ जुने जाऊन नवे नेतृत्व येणे असा नव्हे. हे नेतृत्व वेगळ्या वर्गातील, अधिक स्पष्ट म्हणायचे तर, खालच्या वर्गातील असेल आणि या नेतृत्वाची दृष्टी, आकांक्षा वेगळ्या आहेत असेही दिसून येईल. हे अर्थातच नजिकच्या भविष्यकाळात घडून येणार आहे असे नव्हे.

 आंतरधर्मीय लग्नांचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. येथे हिंदू आणि मुसलमान समाज संमिश्रपणे वागत असल्यामुळे ते शक्य झाले आहे. मुस्लिम स्त्रिया आंतरधर्मीय लग्ने करू लागल्या आहेत. याचा जातीयवादावर आणि धर्मवादावर कितपत परिणाम होतो हे सांगणे

१६६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान