पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

के. सोज यांच्यासारखे जमाते इस्लामीचे विचारवंत घुसले असले तरी या संस्थेने काही. व्यापक परंपरा कायम ठेवल्या आहेत, अबीद हुसेन यांच्या 'इस्लॅमिक सोसायटी इन मॉडर्न एज' या संस्थेतर्फे काढण्यात येणारे नियतकालिक या धर्तीचे आहे. याव्यतिरिक्त काही संघटना आता भारताच्या वेगवेगळ्या भागात अस्तित्वात आल्या आहेत. गुजरातमध्ये प्रा. . यासिन दलाल यांच्या नेतृत्वाखाली मेमन प्रोग्रेसिव्ह मंडळ स्थापन झाले आहे, कलकत्ता येथे प्रा. जहाँन आरा बेगम आणि हसन उल रेहमान यांनी आपला एक छोटा पुरोगामी गट बनविला आहे. उत्तर प्रदेशात बुलंद शहर येथील मेहरुद्दिन खान यांनी 'मुस्लिम सुधार समिती' च्या ध्वजाखाली आपले कार्य सुरू केले आहे. केरळमध्ये 'इस्लाम अॅन्ड मॉडर्न एज सोसायटः' या नावाची संघटना काही पुरोगामी मंडळींनी एकत्र येऊन काढली आहे. 'केरला मुस्लिम एज्युकेशन सोसायटी' आणि केरळ मुस्लिम लीग यांच्यातील बेबनावही मुस्लिम समाजातील नव्या प्रवृत्तीचे द्योतक आहे.
 हे गट अतिशय दुबळे आहेत. त्यांचा म्हणावा तसा मुस्लिम समाजावर परिणाम नाही. त्यांच्याबाबत इतकेच म्हणता येईल की मुस्लिम समाजाच्या जुळते घेण्याच्या प्रवृत्तीचे हे गट म्हणजे प्रतीक आहेत. परंतु जो जातीयवादी संघटनेतही नाही किंवा वर उल्लेखिलेल्या गटातही नाही असा एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग बदल व्हावा असे मानणारा आहे, परंतु तो कृतिशून्य आहे. एक कारण असेही असू शकेल की प्रचलित व्यवस्थेविरुद्ध नुसता आवाज उठविला तरी मुसलमान त्याच्या समाजापासून अलिप्त पडतो. त्याला गलिच्छ शिव्यांना तोंड द्यावे लागते. त्याचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यावर खुनी हल्ले होतात. तो मुस्लिम मोहल्ल्यात राहत असेल तर त्याला जिणे कठीण होऊन बसते. अनेक मुस्लिम बांधव कधी मला येऊन म्हणतात. "आम्ही तुमच्याशी सहमत आहोत. पण काय करणार? मुस्लिम मोहल्ल्यात राहतो. त्यामुळे आम्ही आमची जबान बंद करून ठेवली आहे."
 मुस्लिम समाजाची प्रचलित चौकट लवकर भंगली जाणे शक्य नाही असा निष्कर्ष काढण्यासाठी मी हे लिहिलेले नाही. मुस्लिम सुधारणावाद्यांपुढे काय वाढून ठेवलेले असते याची कल्पना येण्यासाठी हे लिहिले आहे. हिंदू समाजात कुठल्याही सुधारणावाद्याला एवढा एकाकीपणा जाणवत असेल असे मला वाटत नाही. एक तर मुस्लिम समाजातील पुरोगामी व्यक्तीचा एकाकीपणा केवळ सामाजिक नसतो; हिंसेची तलवार त्याच्या डोक्यावर सारखी टांगती ठेवलेली असते. दुसऱ्या कुठल्याही समाजात विरोधकाबाबत अशा प्रकारची हिंसेची वागणूक मिळते की काय याबाबत मला शंका आहे. या हिंसेला बरेचजण भितात व काही कंटाळून गप्प बसतात. हिंसेची भीती नसेल तर मुस्लिम समाजात बदलाच्या प्रवाहाला बरीच गती येईल असे मला वाटते.

 काही बदल काळ सोबत घेऊनच येत असतो, तसा तो मुस्लिम समाजातही झाला आहे. दोन परस्परविरोधी प्रवाह एकत्र गुंफल्यासारखे मुस्लिम समाजात दिसत आहेत. तबलिक जमात आणि जमाते इस्लामी यांची झालेली अमर्याद वाढ हा एक असाच अनिष्ट प्रवाह आहे. तबलिक या संस्थेचे नाव अगदीच जिथे माहिती नव्हते अशा ठिकाणी तिची पाळेमळे आता रुजली आहेत. जमाते इस्लामीची अनेक भारतीय भाषांतून नियतकालिके निघतात. मशिदीतून,

भारतीय मुसलमान /१६५