पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/160

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभारताने जिंकलेला प्रदेश पाकिस्तानला परत मिळाल्यामुळे सर्व मुस्लिम नेत्यांनी व वृत्तपत्रांनी या कराराचे हार्दिक स्वागत केले.
 सर्वसामान्य मुसलमान मात्र या युद्धात पाकिस्तानचाच विजय झाला असे मानत राहिले. असे त्याने रचलेले तर्कट पाकिस्तान रेडिओ आणि पाकिस्तानची इतर प्रचारयंत्रणा यांच्यावर सरळसरळ विश्वास ठेवणारे आहे. या काळात प्रचलित असलेल्या काही भाकडकथा नमुन्यादाखल येथे सांगायला हरकत नाही. एक माहिती मुसलमान अशी सांगत की, भारतीय सैन्यातील एक मुसलमान सैनिक पाकिस्तानचे रणगाडे आले असता अल्ला हो अकबर' असे ओरडला. त्याबरोबर पाकिस्तानच्या सैन्याने रणगाडा थांबविला व खाली उतरून त्याला मिठी मारीत म्हटले, “तुम कायको उस तरफ लडते हैं?" आणि त्याला न पकडता (किंवा ठार न करता) भारताच्या सैनिकी फळीत परत जाऊ दिले. (परत आल्यानंतर हा सैनिक कोणत्या बाजूने लढला?) थोडक्यात, पाकिस्तानी मुस्लिम सैनिक आणि भारतीय मुस्लिम सैनिक एकाच पक्षाचे आहेत असे या मंडळींना सांगावयाचे आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानी सैन्य समोर आल्यानंतर कसे पळत सुटले याचे काल्पनिक वर्णन काही मुसलमानांनी माझ्यासमोर केले. थोडक्यात, भारतीय सैन्य भेकडांचे आहे, मुसलमान तेवढे शूर असतात, असे ही कथा सांगणाऱ्यांना सांगावयाचे आहे. युद्धात पाकिस्तानने अधिक प्रदेश मिळविला, भारताची प्राणहानी अधिक झाली, अशी मते बहुतेक सर्वसामान्य मुसलमान बाळगून होते. युद्धाच्या या काळात अनेक मुस्लिम नेत्यांना भारत संरक्षण कायद्याखाली अटक केली होती. याविरुद्ध बरीच हाकाटी करण्यात आली. युद्ध काळात भारताच्या हिताविरुद्ध मुसलमानांनी कोणतेच वर्तन केलेले नाही असे मुस्लिम प्रवक्ते सांगू लागले. थोडक्यात, मुस्लिम नेत्यांना अन्यायाने अटक करण्यात आली असे त्यांचे प्रतिपादन होते. समस्त मुस्लिम समाज जाणीवपूर्वक राष्ट्रीय हितं लक्षात घेऊन वागला असे या प्रवक्त्यांना भासवावयाचे होते. वस्तुत: मुस्लिम समाज जाणीवपूर्वक देशहिताच्या विचाराने वागला नसून आता देशहिताच्या विरुद्ध वर्तन केल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील व हिंदूंच्या तीव्र प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागेल या जाणिवेने तो तसे वागला असे खरे म्हणजे म्हटले पाहिजे. समजा, पाकिस्तानने भारतीय प्रदेश जिंकले असते आणि भारताचा दारुण पराभव झाला असता तर येथील मुस्लिम कसे वागले असते, असा प्रश्न उपस्थित करणे अधिक योग्य ठरेल. तशी वेळच कधी आलेली नाही. राष्ट्रहिताची जाणीव असल्याची ती खरी कसोटी ठरेल. या कसोटीला मुस्लिम समाज उतरला आहे हे म्हणणे धाष्टाचे ठरेल. एरवी बांगला देशच्या पेचप्रसंगात नव्वद टक्के मुस्लिम पत्रे, संघटना व नेते पाकिस्तानच्या मध्यवर्ती राजवटीचे समर्थन आणि भारत सरकारच्या बांगला देशाला सहाय्य करण्याच्या धोरणावर टीका का करीत होते? हीच मंडळी पुन्हा ३ डिसेंबर १९७१ ला भारत-पाक युद्ध सुरू झाल्यावर भारत सरकारच्या धोरणाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे' असे पत्रक काढतात तेव्हा त्यामागच्या जाणिवा कोणत्या असतात हे न कळण्याइतके मुस्लिम राजकारणाचे अभ्यासू तरी मूर्ख नाहीत.

 'नशेमन' या बंगलोरहून प्रसिद्ध होणाऱ्या उर्दू साप्ताहिकाने तर या सर्वांवर ताण केली. बांगला देशचा लढा चालू असता शेख मुजिबूर रेहमान यांची या पत्राने अत्यंत गलिच्छ भाषेत

भारतीय मुसलमान /१५९