पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होण्यासाठी मुसलमानांनी केलेल्या चळवळीत सक्रिय भाग घेतल्यानंतर लतीफी यांनी हिंदूंचा जाच सहन करण्यासाठी इथे राहण्याची काही जरुरी नव्हती. बहुधा आता उरलेल्या भारतातील मुसलमानांना हिंदूंच्या जाचातून मुक्त करायला ते येथे राहिले असावेत. त्यांचे लिखाण याची साक्ष देते. मुस्लिम कायदा बदलला पाहिजे एवढी एकच प्रगतीपर भूमिका ते घेतात. राजकीय बाबतीत मुस्लिम जातीयवादाची तळी उचलणे आणि हिंदूंना दोषी ठरवणे हा जुना उद्योग त्यांनी पुढे चालविला आहे. अल्पसंख्यांकांचे पुरेसे प्रतिनिधी विधिमंडळात व लोकसभेत निवडून यावेत म्हणून लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व असण्याची तरतूद करावी म्हणून त्यांनी जवळजवळ वेगळ्या मतदारसंघाची मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातील हिंदूंबाबत हिंदू महासभेने केलेल्या सहानुभूतिपूर्वक ठरावाला लतीफी यांनी याच लेखात आक्षेप घेतला आहे. अर्थात आक्षेप घेताना बिचाऱ्या पाकिस्तानी हिंदूंना अडचणीत टाकण्याचे काम आपण करू नये अशी साळसूद भूमिका घेतली आहे. लतीफी यांची ही भूमिका प्रामाणिक असती तर त्यांनी पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि अनेक पक्ष व वृत्तपत्रे रात्रंदिवस भारतीय मुसलमानांबद्दल जे लिहीत व बोलत असतात त्याबद्दल आक्षेप घेतला असता. लतीफी यांनी याविषयी ब्रही काढलेला नाही. लतीफी यांच्या या लबाड भूमिकेचा खरा अर्थ 'पाकिस्तानच्या अंतर्गत बाबतीत तुम्ही नाक खुपसू नका' असे सांगण्याचा आहे आणि हे ते भारतात राहून करीत असतात ही गंमतीदार गोष्ट आहे.

 बद्रूद्दिन तय्यबजी हे याच मालिकेतील एक, भारतीय हिंदूंना धर्मनिरपेक्ष बनावयास सांगणारे सुशिक्षित धर्मवादी मुसलमान आहेत. काँग्रेसचे एके काळचे अध्यक्ष (कै.) बद्रुद्दिन तय्यबजी यांचे हे नातू होत. गांधी आणि नेहरू यांच्या काही काळ जवळपास वावरलेल्या अनेक मुस्लिम मंडळींच्या कुटुंबियांना, मुलांना आणि नातवंडांना, ही मंडळी जातीयवादी आणि भारतविरोधी बनली तरी, पोसण्याची जबाबदारी आपली आहे अशी समजूत भारत सरकारने करून घेतली आहे. अलीबंधूंची मुले आणि नातेवाईक यांनी लीगच्या चळवळीत भाग घेतला, मुंबईचे खिलाफत पत्र हिंदूविरोधीजकारणासाठी राबविले आणि पुढे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकिस्तानधार्जिणे धोरण चालू ठेवले तरी अलीबंधूंविषयींच्या आठवणींनी सद्गदित होऊन या मंडळींना सर्व सवलती देण्याचे धोरण सरकारने चालूच ठेवले होते. वस्तुत: अलीबंधूंविषयी फारशी कृतज्ञता बाळगण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांनी केव्हाच काँग्रेसचा त्याग केला होता आणि "कुणाही हलकट मुसलमानाला मी गांधीजींपेक्षा श्रेष्ठ मानतो" असे उद्गार मौ. महमदअली यांनी काढून झाल्यालाही अनेक वर्षे लोटली होती. तरीही खिलाफत पत्राच्या प्रपंचाला हातभार लावणे आपले पवित्र कर्तव्य आहे या भावनेने सरकार वागले. मग बद्रुद्दिन तय्यबजी या एकमेव राष्ट्रीय मुसलमानाच्या कुटुंबियांना लाडाने वागविण्याची जबाबदारी आपली आहे असे या सरकारने मानले तर आश्चर्य नाही. बद्रुद्दिन तय्यबजी आय.सी.एस. बनून इतकी वर्षे ब्रिटिश सरकारची इमाने इतबारे सेवा करीत होते. त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. (पहा - Self & Secularism, Badruddin Tyabji, Orient Longman, 1971, New Delhi.) या पुस्तकात त्यांनी केलेली अनेक विधाने त्यांच्या जातीयवादी भूमिकेवर प्रकाश टाकतात. मिस्टरऐवजी श्रीयुत लावायला

भारतीय मुसलमान /१५३