पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दृश्य तर उलटे दिसते आहे. तेथे हिंदूंचे शिरकाण झाले, अहमदियांच्या कत्तली झाल्या आणि उग्र धार्मिक चळवळी अस्तित्वात आल्या, उलट धार्मिक गांधींच्या नेतृत्वाखाली उदयाला आलेल्या भारतामध्ये भारतीय मुसलमानांची संख्या चार कोटीची सहा कोटी झाली, लोकशाही शिल्लक राहिली, ऐक्य टिकून राहिले, शांततेच्या मार्गाने समाजपरिवर्तनाचा मार्ग धरला गेला . आणि प्रचंड प्रमाणात व्यक्तिस्वातंत्र्य आणि टीकास्वातंत्र्य शिल्लक उरले, ज्यामुळे या मुसलमानांनादेखील जीनांचे समर्थन करण्याचे आणि गांधीना दोष देण्याचे स्वातंत्र्य लाभले. याबद्दल अर्थातच ते, त्यांच्या प्रचारी भूमिकेला सोयीस्कर नसल्यामुळे, काही. बोलणार नाहीत.
 एक-दोनदा मला अलीगढला जाण्याचा प्रसंग आला. तेथील काही मुस्लिम विद्यार्थी माझे मित्र होते. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रश्नावर एक चर्चा आयोजित केली होती. या चर्चेला मी, प्रा. मे. पुं. रेगे आणि दिल्लीचे श्री. एम. पी. सिन्हा होतो. श्री. डॅनियल लतीफी' आणि श्री. बेग हेदेखील होते. विद्यार्थ्यांनी मला बोलूच दिले नाही. पहिल्या दिवशी श्री. डॅनियल लतीफी बोलत असताना मी हॉलमध्ये बसलो आहे असे पाहून काही विद्यार्थी माझ्या भोवताली बसले. अर्वाच्य बोलू लागले. काही तोंडावर थुकले आणि सिगारेटचा धूर माझ्या तोंडावर सोडू लागले. लतीफी यांच्या भाषणानंतर त्यांनी मला घेराव घातला. आपल्याशी काही बोलावयाचे आहे असे ते म्हणाल्यावरून मी, प्रा. रेगे व श्री. सिन्हा असे तिघे त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये गेलो. तेथे झालेली चर्चा येथे मी उद्धृत करू इच्छितो.
एक मुलगा :- आपण 'ऑर्गनायझर'मध्ये मुस्लिमांवर टीका का करता?
मी :- 'ऑर्गनायझर'मध्ये लिहीत नाही.
दुसरा मुलगा :- आपले 'ऑर्गनायझर'मध्ये आठ ते दहा लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
मी :- 'ऑर्गनायझर'मध्ये माझा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. मी 'ऑर्गनायझर'करिता स्वतंत्र लिखाण केलेले नाही. तो लेखदेखील 'महाराष्ट्र टाइम्स' वरून पुनर्मुद्रित केलेला आहे. माझ्या लिखाणाचे हक्क 'महाराष्ट्र टाइम्स' ला दिलेले असल्यामुळे 'ऑर्गनायझर'ने तो लेख प्रसिद्ध करायला 'महाराष्ट्र टाइम्स' ची परवानगी घेतली.
तिसरा विद्यार्थी :- आपले दहा लेख 'ऑर्गनायझर'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. आम्ही ते वाचले आहेत.
मी :- तसे असेल तर ते अंक आपण का घेऊन येत नाही? एका लेखाव्यतिरिक्त 'ऑर्गनायझर'ने इतर कोणतेही लेख प्रसिद्ध केल्याचे मला तरी आठवत नाही.
श्री.एम.पी.सिन्हा:- हा वाद व्यर्थ आहे. दलवाईंचे लेख कुठे प्रसिद्ध झाले हा मुद्दा नाही. त्या लेखातील प्रतिपादनाबद्दल आपले काय म्हणणे आहे?

एक विद्यार्थी :- दलवाईंचे दहा लेख 'ऑर्गनायझर'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत हे आम्ही सिद्ध करू.

१५०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान