पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/150

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेबदलला. कारण पाकिस्तानचे विघटन झाले. भारतातील लीगवादी सुशिक्षित मुसलमान आता या दोन्ही देशांना एकत्र आणण्याची घोषणा देतील असे भविष्य मी १९७१ च्या एप्रिल महिन्यातच वर्तविले होते. (पहा - 'Quest' - April-May 1971 मधील माझा लेख - 'Meaning of Bangla Desh') वेगळे राष्ट्र निर्माण करून उपखंडात प्रभुत्व गाजविण्याच्या आकांक्षा नामोहरम झाल्यानंतर आता महासंघराज्यासारख्या योजनेत एकत्र राहून विस्कटलेला मुस्लिम समाज पुन्हा एकत्र कसा येईल याचा विचार सुशिक्षित मुसलमान करू लागला याचे हे निदर्शक आहे. सनातनी मौलाना वर्ग व सुशिक्षित मुसलमान यांच्यात उद्दिष्टे साध्य करण्याच्या कार्यपद्धतीविषयीचा हा झगडा मिटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत आणि अलग राष्ट्राच्या मार्गाने उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न फसल्यानंतर हिंदूंबरोबर एकत्र रहावे पण उपखंडातील सर्व मुसलमानांची ताकद त्यांच्या विरुद्ध लावावी ह्या मुल्लामौलवींच्या धोरणाला आता सुशिक्षितांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे ह्याचे हे निदर्शक आहे.

 मी येथे मुद्दामच सुशिक्षित मुसलमानांच्या ध्येयधोरणांची चिकित्सा करीत आहे. त्यातील इतर काही जणांच्या वागण्या-बोलण्याचा संदर्भ समजावून घेण्याची आवश्यकता आहे. कारण त्यातील बरीच मंडळी नेहमी धर्मनिरपेक्ष शब्दप्रयोगात भारतीय मुसलमानांच्या जातीयवादाचे आणि पाकिस्तानच्या विस्तारवादाचे समर्थन करीत असल्यामुळे या प्रश्नांची नीट जाणीव नसलेल्यांच्या मनात ही मंडळी गोंधळ निर्माण करू शकतात. सर्व सुशिक्षित मुसलमानांचे आदर्श असलेल्या जीनांना दोष देणे कुठल्याही जातीयवादी सुशिक्षित मुसलमानाला सोयीचे नाही. तो कितीही सुशिक्षित असला तरी तो धर्मसमुदायवादी असतो. कळत-नकळत मुस्लिम समाजाचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे तो आपले कर्तव्य समजतो. मग मुस्लिम समाजाचा आततायीपणा, दंडेली आणि दोष यांच्यावर पांघरूण तरी घालणे किंवा त्यांचे समर्थन करणे हे पर्याय तो स्वीकारत असतो. आपण धर्म मानीत नाही आणि अधूनमधून व्हिस्कीचे घोट घेतो असे हे मुसलमान अनेकदा सांगत असतात. हे वाचल्यानंतर वाचकांची खात्री होऊन चुकते की या मंडळींना धार्मिक राजकारण अभिप्रेत नाही. परंतु धर्म न मानणे आणि धार्मिक राजकारण न करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कारण धर्म न मानणाऱ्या मुस्लिम नेत्यांनीच धार्मिक राजकारण केलेले आहे, हे सामान्य जनतेला कळणे कठीणच असते. खरा प्रश्न मुसलमानांच्या इतरांबरोबरच्या संबंधाचा आहे. याच्यावर या सुशिक्षितांनी सतत हिंदूविरोधी मुस्लिम गटांची भलावण केलेली आहे. सर्वप्रकारे धार्मिक आततायी मुस्लिम चळवळीचे समर्थन करणे आणि मी धर्म मानीत नाही असे सांगणे हा त्यांचा खाक्या आहे. धर्म न मानणाऱ्याने आततायी धार्मिक चळवळींचे समर्थन का करावे असा प्रश्न उपस्थित होईल. त्यांच्याजवळ या सर्व प्रश्नांची उत्तरे तयार आहेत. या चळवळी आततायी नाहीतच असे ते उत्तर देतील. 'जीनांनी पाकिस्तान का मागितले?' या प्रश्नाला 'गांधींनी असमंजसपणा दाखविल्यामुळे' असे हे उत्तर देतील. 'भारतात सध्या हिंदू जातीयवाद का बोकाळला आहे?' यावर 'गांधी धार्मिक होते म्हणून' हे त्यांचे उत्तर आहे. गांधी धार्मिक असल्यामुळे भारतात हिंदू जातीयवाद बळकट झाला असे मानले, तर जीना धार्मिक नसल्यामुळे पाकिस्तानात धर्मनिरपेक्षवाद बळकट झाला असे त्यांनी अर्थात पुढे सांगायला हवे होते. परंतु पाकिस्तानचे

भारतीय मुसलमान /१४९