पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे काय, अशी त्यांना शंका वाटते. मला मात्र असे वाटते की संघपरिवाराप्रमाणे गांधी नेहरूद्वेष मुस्लिम समाजाने कधी दाखवला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात तर त्यांनी गांधी-नेहरू परंपरेचा आधारच मानला.
 हमीद दलवाई यांचा सर्वांत मोठा विशेष हा आहे की मुस्लिम समाजावर टीका करूनही, मुस्लिम मन बदलू शकते याबद्दल मात्र त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांचा हा आशावाद अत्यंत प्रेरणादायी आहे. श्री. शेषराव मोरे या लेखकाने 'मुस्लिम मनाचा शोध' ह्या नावाने जंगी पुस्तक लिहिलेले आहे. त्यांनी प्रेषितांचा जीवनादर्श, ईश्वरी ग्रंथाचा संदेश व हदीसची साक्ष यांबाबत लिहिलेले आहे. कुराण व हदीसच्या त्यांच्या अध्ययनाबद्दल जमातेइस्लामीच्या मुस्लिम पंडितांनी शिफारस पत्र दिलेले आहे. परंतु शेषराव मोरे यांचा निष्कर्ष पूर्णपणे नकारार्थी आहे. उलट हमीद दलवाई यांनी जामिया-मिलिया, अबीद हुसेन, प्रो. यासीन दलाल, प्रो. जहानआरा बेगम, केरळची 'इस्लाम अँन्ड मॉर्डन एज सोसायटी' यांचा उल्लेख करून मुस्लिम मन कसे बदलत आहे ते मांडले आहे. राजकारण, मतदान कायदे, दैनंदिन जीवन, जातिप्रथा, शिक्षण व आर्थिक धोरणे इत्यादी अनेक शक्ती धर्माबाहेरही कार्यरत असून त्यांचा परिणाम मुस्लिम मनावर झाल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांना शिक्षणाची ओढ किती आहे हे आपण तालिबानमुक्त अफगाणिस्तानमध्ये पाहिले आहे. भारतात तर लाखो मुस्लिम स्त्रिया शिक्षण, नोकरी, प्रवास व संस्थात्मक कार्यक्रमांत मग्न आहेत. फातिमाबीबी राज्यपाल असून नजमा हेप्तुल्ला राज्यसभेच्या उपाध्यक्षा व शबाना आझमी खासदार आहेत. मुस्लिम मन सनातन्यांच्या पकडीत कायम बंदिस्त राहील असे मानण्याचे काहीही कारण नाही. हमीद दलवाई हे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या आशेने प्रयत्न करीत राहिले.

::::

 आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या वर्तणुकीमुळे मुस्लिम प्रश्नाबाबत अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमधून रशियनांना हुसकून लावण्यासाठी अमेरिकेने ज्या तालिबानला व लादेनला अल कायदाला शस्त्रे, पैसा व प्रशिक्षण देऊन सुसज्ज केले, त्यांच्यावरच अमेरिकेने हल्ला करून त्यांचा पाडावही केला. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 'क्रुसेड' हा शब्द वापरून धर्मयुद्धाचे आवाहनही केले व मध्य आशियात दोनशे वर्षांचे जे धर्मयुद्ध झाले त्याचे स्मरण करून दिले. जो आमच्या बाजूला नाही तो दहशतवाद्यांच्या बाजूस आहे, अशी भूमिकाही अमेरिकेने बेमुर्वतखोरपणाने घेतली. जगातील दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आणि त्यात बहुसंख्य मुस्लिम संस्था गोवल्या. अलीकडे दुष्टशक्ती म्हणून इराक, इराण, सुदान व लिबिया यांचा नामोल्लेख केला. नावाला त्यात उत्तर कोरियाचाही समावेश करण्यात आला. यामागे अमेरिकेची भूमिका काय आहे हे समजावून घेण्याची जरुरी आहे. अमेरिकेच्या धोरणाच्या मागे संस्कृतिसंघर्षाची भूमिका आहे. प्रो. सॅम्युएल हटिंग्टन यांनी 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स' हे पुस्तक लिहून शीतयुद्ध संपल्यानंतर जगातील भावी संघर्ष सांस्कृतिक असतील व अखेरचा संघर्ष पाश्चिमात्य जग व इस्लाम यांत असेल अशी

१४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान