पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इच्छा त्यांनी श्री. आयुबखान यांच्यापाशी व्यक्त केली. परंतु आयुबखानांना सदिच्छा-मंडळ नको होते, त्यांना काश्मीर हवा होता. श्री. ए. के. ब्रोही यांनी असे मंडळ काढण्यात पुढाकार घ्यावा, असे श्री. जयप्रकाश नारायण यांनी सुचविले. श्री. ब्रोहींनी त्यांना नकार दिला. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या स्थापनेला विरोध करणाऱ्यांपैकी मी एक आहे. माझा प्रभाव पडणार नाही आणि मंडळाच्या स्थापनेमागील हेतू सफल होणार नाही. माझ्याऐवजी श्री. चौधरी खलिकुत्झमान यांना पुढाकार घ्यायला लावा." जयप्रकाशजींनी खलिकुत्झमान यांना विचारले असता ताबडतोब त्यांनी संमती दर्शविली. परंतु दुसऱ्या दिवशी नकार कळविला. ते म्हणाले की 'आयुबखानांनी असे सांगितले की असे मंडळ काढू नका. तसे असल्यास मंडळाचा काही उपयोग होणार नाही.' आणि भारत-पाक सदिच्छा मंडळाचे सदस्य हात हालवीत भारतात परत आले. अर्थात एवढ्या अनुभवानंतरही ते शहाणे झाले नाहीत ही गोष्ट वेगळी!

 भारतातील मुस्लिम जातीयवादी आणि पाकिस्तानवादी यांनी या मंडळींच्या सद्हेतूंच्या आड दडून आपले जातीयवादी राजकारण दामटण्याचा प्रयत्न सुरू केला. साकिस्तानच्या वतीने येथे एक प्रबळ लॉबी निर्माण करण्याचा प्रयत्न या मंडळींच्या आड दडूनच करता येण्यासारखा आहे हे या मंडळींनी ओळखले. पाकिस्तानबरोबर सलोखा झाला पाहिजे हा धोशा सर्व मुस्लिम जातीयवादी संघटनांनी चालविला होताच. अर्थात सलोखा करायचा म्हणजे काश्मीर पाकिस्तानला द्यायचा हे ओघाने आलेच. भारतातील सुशिक्षित मुसलमानदेखील या मोहिमेत आघाडीवर होते. पाकिस्तानला अनुकूल अशी लॉबी येथे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांत श्री. अब्दुल गफूर नूराणी हे एक प्रमुख होते. नूराणी यांनी आपल्या प्रचारी लिखाणाला सुरुवात केली होती तेंव्हा पाकिस्तानात आयुबखान यांची स्थिर राजवट सुरू होती. त्यांनी भारतीय मुसलमानांवर तसेच भारत-पाक संबंधांवर लिहिलेले सर्व लिखाण म्हणजे असल्याचा आधार घेऊन वस्तुस्थितीचा विपर्यास कसा करावा याचा नमुना आहे. त्यांचे काश्मीरवरील पुस्तक पाहिले की हे प्रकर्षाने जाणवते. भारतीय मुसलमानांवर लिहिलेल्या लेखातदेखील त्यांनी याच युक्त्या योज़िल्या आहेत. नूराणींची हातचलाखी एखाद्या वाक्यात पाकिस्तानवर टीका करावयाची आणि बाकी सगळा. रोख भारतीय धोरणावर हल्ले करण्यात खर्ची घालायचा अशी ते युक्ती वापरतात. काश्मीरमध्ये भारताने सार्वमत घेतले पाहिजे, कारण भारत सार्वमताला वचनबद्ध आहे असे त्यांनी सतत प्रतिपादन केले. याच संदर्भात पाकिस्तान भारताशी कसा वागला, पाकिस्तानने किती वचने पाळली व मोडली, पाकिस्तानने आपल्या अल्पसंख्यांकांना कसे वागविले, समज़ा उद्या काश्मीर पाकिस्तानात गेले तर काश्मीरमधील अल्पसंख्यांक सुरक्षित राहतील काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी अर्थातच नूराणींवर नाही. नूराणींचे लिखाण नीट समजून घ्यायचे तर पाकिस्तानी नागरिक भारतात राहत असताना ज्या पद्धतीने आपली बाजू मांडीत त्याच पद्धतीने नूराणी पाकिस्तानची बाजू मांडीत असतात हे ध्यानी-घ्यावे लागेल. नूराणी ही चलाखी करीत असले तरी त्यांचे पाकिस्तानवरील प्रेम एवढे उदंड आहे की त्यांना आपण भारतात राहुन पाकिस्तानची वकिली करीत आहोत याचाही कधीकधी विसर पडला आहे. येथे याची काही उदाहरणे

भारतीय मुसलमान /१४५