पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९६४ मध्ये नेहरूंचे निधन झाले. तथापि १९६२ लाच चीनच्या आक्रमणानंतर त्यांच्या आणि देशाच्या प्रतिष्ठेला हादरा बसला होता. यामुळे मुस्लिम जातीयवादी संघटन आधिक जोरदारपणे होऊ लागले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारत पाकिस्तानचा संपूर्ण पाडाव करू शकला नाही. झाले ते एवढेच की पाकिस्तानला काश्मीर हिसकावून घेता आले नाही. परंतु भारतातील मुस्लिम जातीयवादी यामुळे निराश झाले नाहीत. त्याच्याही आधी नेहरूंनी मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर शेख अब्दुल्लांची पुन्हा सुटका केली होती. त्यांच्यावरील कटाचा आरोप मागे घेतला गेला होता. काश्मीर प्रश्नावर प्रचंड वावटळ निर्माण करण्याचा प्रयत्न जेव्हा शेख अब्दुल्लांनी केला तेव्हा भारतीय मुसलमानांची त्यांना साद दिली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अब्दुल्ला वाटाघाटीसाठी पाकिस्तानला गेले आणि दरम्यान नेहरूंचे निधन झाले. या साऱ्या वाटाघाटीतील संदिग्धतेला व नेहरूंच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला गूढतेचे आवरण देण्याचा प्रयत्न भारतातील पाकिस्तानवादी लॉबीने सुरू केला. जणू काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला सवलती देण्याचे नेहरूंनी मान्य केले होते, त्यांचा मृत्यू झाला नसता तर सर्व प्रश्न सुटले असते व आनंदीआनंद झाला असता असे भासविण्याचा प्रयत्न भारतात प्रामुख्याने श्री. खुशवंत सिंग, 'हिंदुस्थान टाइम्स'चे माजी संपादक श्री. एस. मुळगावकर, श्री. जे. जे. सिंग, श्री. जयप्रकाश नारायण, श्रीमती मृदुलाबेन साराभाई इत्यादी भोळसट धर्मनिरपेक्षतावादी आणि अब्दुल गफूर नूराणी यांच्यासारख्या अट्टल पाकिस्तानवाद्यांनी सुरू केला. काश्मीर प्रश्न ही भारत-पाक संबंध सुधारण्याची गुरुकिल्ली आहे. काश्मीर एकदा पाकिस्तानला दिले की सर्व सुरळीत होईल असे मानणाऱ्या भोळसट धर्मनिरपेक्षतावाद्यांचा एक मोठा गट आपल्या देशात अस्तित्वात होता, अजूनही आहे. वस्तुतः या मंडळींना मुस्लिम राजकारणाची गुंतागुंत माहीत नाही. मुस्लिम समाजाचा या मंडळींशी काहीही संबंध नाही आणि सुशिक्षित मुसलमान आणि पाकिस्तानचे नेतृत्व राजकीय मुत्सद्देगिरीतील डावपेच म्हणून आपल्या प्रचारयंत्रणेला आवश्यक असलेले शांतता, तडजोड आदी शब्द जेंव्हा वापरतात तेव्हा त्या शब्दामागील दडलेली उद्दिष्टे ओळखण्याइतके मुस्लिम राजकारणाचे सखोल ज्ञान या मंडळींजवळ नाही. स्वतः खुशवंतसिंग यांनी लिहिल्याप्रमाणे, त्यांच्या लहानपणी लाहोरच्या चित्रपटगृहात त्यांच्या शेजारी बुरखाधारी एक तरुण मुसलमान स्त्री बसली होती आणि तिच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हापासून श्री. खुशवंतसिंग यच्चयावत मुस्लिम जमातीवर प्रेम करू लागले. अर्थात श्री. खुशवंतसिंग यांनी यच्चयावत मुस्लिम जमातीला आपली मानायला, तिच्यावर प्रेम करायला कुणाचीच हरकत नाही. प्रश्न मुस्लिम जमातीचा नसून मुस्लिम राजकारणाचा आहे. खुशवंतसिंग अथवा इतर सारी मंडळी अतिशय प्रामाणिक आहेत, तथापि काश्मीर प्रश्नावर अथवा भारत-पाक संबंधावर त्यांची भूमिका मुस्लिम राजकारणाच्या अज्ञानावर आधारलेली आहे. सुशिक्षित मुसलमानांनी आपल्या खऱ्या उद्दिष्टांबाबत भारतीय जनमनात गोंधळ उडवून देण्यात कसे यश मिळविले आहे याचे हे निदर्शक आहे. वस्तुत: त्यांचा भ्रमनिरास व्हायला हवा होता. काहींचा झाला. या मंडळींनी एक भारत-पाक-सदिच्छा मंडळ भारतात स्थापन केले होते. पाकिस्तानचा एक दौराही या मंडळींनी केला. पाकिस्तानात अशा प्रकारचे सदिच्छा मंडळ निघावे अशी

१४४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान