पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरवू शकत नाहीत, पंतप्रधानांचा व मंत्रिमंडळाचा त्यांच्या धोरणाला पाठिंबा असला पाहिजे हे कळण्याची पात्रता छगलांच्या टीकाकारांत खचित होती. परंतु सरकारवर प्रत्यक्ष टीका करण्याचे टाळण्यासाठी छगलांना टीकेचे लक्ष्य ठरविण्यात आले. या विधेयकाविरुद्ध अलीगढ ओल्ड बॉयज् असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला व हे विद्यापीठ मुस्लिम समाजाचे आहे असे जाहीर करण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला व अलीगढ विद्यापीठ मुस्लिम समाजाच्या मालकीचे नाही असा निकाल दिला.

 उर्दूचा प्रश्न हा असाच मुस्लिम समाजाच्या आंदोलनाचा एक विषय बनवून ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांत जिथे मुस्लिमांची मातृभाषा उर्दू आहे तेथे उर्दू भाषेचे आपल्याला शिक्षण मिळाले पाहिजे ही मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेली मागणी चुकीची नव्हती. वस्तुत: उर्दू भाषिकांच्या शिक्षणाची तरतूद उत्तर प्रदेशच्या सरकारने केली होती. परंतु ही तरतूद कागदावरच राहिली. तिची नीट अंमलबजावणी कधीच झाली नाही. मुस्लिम समाजाच्या दृष्टीने या धोरणाच्या अंमलबजावणीचा आग्रह रास्त ठरला असता. परंतु ही मागणी एवढ्यावरच थांबली नाही. उर्दूला उत्तर प्रदेशमध्ये दुय्यम राज्यभाषेचा दर्जा मिळावा या मागणीकरिता हजारो सह्यांचा एक अर्ज डॉ. झाकिर हसेन यांच्या नेतृत्वाखाली १९५४ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आला. उर्दू ही उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि म्हैसूर या राज्यांतून दुय्यम राज्यभाषा झाली पाहिजे अशी मागणी मजलिस-ए-मशावरतने पुढे १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी केली. तिच्या नऊकलमी कार्यक्रमानुसार अर्थात उर्दू हीच राष्ट्रभाषा व्हायला लायक आहे. उर्दूचा आग्रह धरताना मुसलमान करीत असलेला युक्तिवाद फार मजेदार आणि परस्परविसंगत असतो. उर्दू भाषेला योग्य स्थान न मिळाल्यामुळे मुसलमानांवर अन्याय होत आहे, कारण मुस्लिम संस्कृतीचा उर्दू भाषा हा एक अविभाज्य घटक आहे असे ते एकीकडे प्रतिपादन करीत असतानाच उर्दू ही केवळ मुसलमानांचीच भाषा नाही, ती भारतीय भाषा आहे व तिचे जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे असे ते सांगत असतात. उर्दू ही सगळ्यांची भाषा आहे असे मानले तर मग सर्व आपोआपच उर्दू शिकतील. त्याकरिता मुसलमानांनीच आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. उर्दू सर्वांची भाषा आहे हे सांगण्यामागील मुसलमानांची भूमिका एक प्रकारे आडदांडपणाची व आपली भाषा दुसऱ्यावर लादण्याच्या मनोवृत्तीची निदर्शक आहे. याचा अर्थ असा ही हिंदूंची भाषा कोणती हेदेखील मुसलमानांनी ठरवायचे आहे. मात्र मुसलमानांची भाषा कोणती हे ठरविण्याचा अधिकार मुसलमानांनाच आहे! थोडक्यात भारतातील सर्व भाषा हिंदूंच्या आहेत, त्यातील उर्दू भाषाही हिंदूंची आहे आणि सर्व भाषा शिकण्याचे उत्तरदायित्व हिंदूंवर आहे. मात्र मुसलमानांची भाषा तेवढी उर्दू आहे अशी उत्तर भारतातील मुसलमानांनी भूमिका आहे. आपली भाषा उर्दू आहे असे हिंदू मानीत नाहीत असा युक्तिवाद आपण केला तर हिंदूंनी देशाच्या ऐक्यासाठी ही तडजोड केली पाहिजे असे ते सुचवितात. अर्थात देशाच्या ऐक्यासाठी मुसलमानांनी किंमत देण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यांनी तडजोडी करण्याचा प्रश्न येत नाही. तडजोडी हिंदूंनी करावयाच्या व सवलती मुसलमानांनी घ्यायच्या असा हा युक्तिवाद आहे.

भारतीय मुसलमान /१४३