पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/143

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेआपण ‘एकनिष्ठ भारतीय नागरिक' असल्याचे घोषित करते झाले. नवीन जातीयवाद्यांची भरती होत राहिली. जमाते इस्लामी, तबलीग जमात इत्यादी धर्मवादी संघटनांनी तेथे आपला जम बसविला. उलट मजलिस-ए-मशावरतची स्थापना झाल्यानंतर तिनेही तेथे ठाण मांडले. श्री. बद्रुद्दिन तय्यबजी कुलगुरू झाल्यावर त्यांनी मुस्लिम जातीयवाद्यांना पद्धतशीरपणे उत्तेजन दिले. अलीगढ विद्यापीठाशी इतर कॉलेजे संलग्न करून घ्यावीत की नाहीत याचा निर्णय घेण्याचे श्री. तय्यबजींनी टाळले आणि पुढे श्री. अलियावर जंग हे कुलपती झाल्यानंतर त्यांना निर्णय घ्यावा लागला. वस्तुत: इतर कॉलेजे संलग्न करून घेण्यात आलेली नाहीत. अलीगढ विद्यापीठात नुकत्याच स्थापन झालेल्या इंजिनियरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण कसे असावे हा वाद झाला. या कॉलेजात बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तेव्हा त्यांत बाहेरच्या आणि अलीगढच्या विद्यार्थ्यांच्या संख्यांचे प्रमाण काय असावे याच्यावर वाद झाला. या दोन कॉलेजांमध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असू नये अशी भूमिका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कार्यकारी समितीच्या अनेक सभासदांनी घेतली. कार्यकारी समितीची सभा चालू असताना काही प्राध्यापक आणि कार्यकारी समितीचे सदस्य यांच्या प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांनी श्री. अलियावर जंग यांच्यावर हिंसक हल्ला केला. ते खाली पडले आणि डॉक्टरांना बोलवा असे पुटपुटले, तेव्हा “डॉक्टरची जरुरी नाही, तुमच्याकरिता आम्ही जनाजा (तिरडी) तयार ठेवला आहे" असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 अलीगढमधील या हिंसक प्रकारानंतर केंद्र सरकारच्या शिक्षणखात्याने वटहुकूम काढून आपल्या हाती अधिक अधिकार घेतले. दंगलींना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना, तसेच कार्यकारी समितीच्या काही सदस्यांनाही अटक केली. यांत डॉ. झाकिर हुसेन यांचे बंधु श्री. युसुफ हुसेन, प्रो. चॅन्सेलर हेही होते. त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.
 गंमत अशी की हे सर्व हिंसक प्रकार होईपर्यंत मुस्लिम संघटना, मुस्लिम नेते, वृत्तपत्रे, राजकीय भाष्यकार आणि तथाकथित विचारवंत यांपैकी कोणीही ब्र उच्चारला नाही. कुलगुरूंवरील हल्ल्याचा साधा निषेधही कुणी केला नाही. परंतु सरकारने हल्लेखोरांना अटक करताच सरकारचा आणि तेव्हा शिक्षणमंत्री असलेले श्री. छगला यांचा निषेध करावयास सर्व पुढे सरसावले. जमाते इस्लामीपासून तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी श्री. एम्.आर.ए. बेगपर्यंत साऱ्यांनी निरपराध मुस्लिम विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पकडून नेत आहेत अशी हाकाटी सुरू केली. अलीगढ वटहुकूमांना कायदेशीर स्वरूप देण्यात आले तेव्हा सर्व पक्षाच्या मुस्लिम सभासदांनी या विधेयकाला विरोध केला ही गोष्ट नमूद करणे इष्ट ठरेल.

 अलीगढ विद्यापीठाबाबत आंदोलन करण्यात पुढाकार घेणाऱ्यांत डॉ. सय्यद महमूद हे एक प्रमुख होते. डॉ. फरिदी, श्री. युनूस नूरी यांच्यासारखे तथाकथित राष्ट्रीय मुसलमान, सुशिक्षित आणि अशिक्षित मौलाना, अब्दुल गफूर नूराणीसारखे उदारमतवादाचा खोटा लेप लावलेले गाढे जातीयवादी या सर्वांची युती झाल्याचे विलक्षण दृश्य दिसू लागले. यांपैकी कुणीही विद्यार्थ्यांच्या हुल्लडीचा निषेध केलेला नाही. सर्वांचा रोख छगला यांच्यावर होता. वस्तुत: छगला हे केवळ शिक्षणमंत्री होते. अलीगढ विद्यापीठविषयक धोरण एकटे शिक्षणमंत्री

१४२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान