पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.नाहीत. हिंदू प्रतिप्रहाराची अजूनही त्यांना भीती वाटत होती. साधारणत: १९६० नंतर मुस्लिम समाज संघटित करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले आणि खऱ्या-खोट्या गा-हाण्यांचा आवाज जोरात ऐकू येऊ लागला. हा काळ तसा फार महत्त्वाचा आहे. १९५७ पर्यंत पाकिस्तानच्या राजकारणात विलक्षण अस्थिरता राहिली. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नेहरूंचा प्रभाव आणि दबदबा विलक्षण वाढला होता आणि पाकिस्तानची अवस्था शोचनीय बनली होती. भारतीय मुसलमानांच्या स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय चळवळींचा चढउतार आणि पाकिस्तानच्या राजकीय भवितव्याचा चढउतार यांच्यात एक विलक्षण दुवा दिसून येतो. १९६० साली आयूबखान सत्तेवर आले आणि पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेचा शेवट झाला. अमेरिकेबरोबर लष्करी करार जरी १९५४ मध्ये झाला असला तरी राजकीय अस्थिरतेमुळे करारातून निर्माण होणाऱ्या सामर्थ्याचा प्रभाव जाणवत नव्हता. आयूबखानांनी राजकीय स्थिरता आणली. आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे थबकलेले गतिचक्र पुन्हा सुरू केले आणि अमेरिकन लष्करी मदतीचा नीट विनियोग करून लष्करी दलाचे सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली. पाकिस्तान हळूहळू भारताविरुद्ध संघर्षाच्या पवित्र्यात उभे राहत आहे, संघर्ष करण्याचे पवित्रे घेत आहे, त्याची ताकद वाढत आहे हे दिसून येताच भारतीय मुस्लिम जातीयवादी राजकारणाच्या हालचाली वाढू लागल्या. ज्या तथाकथित राष्ट्रीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या मागणीला विरोध केला होता, त्यांच्यावर मुस्लिम समाजाला वळण देण्याची एक मोठी जबाबदारी होती. मौ. आझादांचा प्रयत्न अपयशी ठरला हे आपण पाहिले. तो अपयशी ठरणारच होता. त्यांना मुस्लिम समाजाला वळण लावावयाचे होते की मुसलमानांना काँग्रेसमागे उभे करून आपण मुसलमानांचे नेते आहोत हे सिद्ध करावयाचे होते हे सांगणे कठीण आहे. त्यांना स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात हे स्थान मिळालेच नाही. आता मुसलमानांपुढे दुसरा पर्याय न उरल्यानंतर कातडीबचावासाठी त्यांनी मौ. आझादांना नेता मानले. परंतु या कृत्यामागे उत्स्फूर्त भावना नव्हती. ज्या उत्कटतेने मुस्लिम समाज जीनांना आपला नेता मानत होता त्या उत्कटतेने त्यांनी आझादांना कधीच मानले नाही. आझादांचा जयजयकार राजकीय कारणासाठी करत असता मनातल्या मनात ते निराश, चिडलेले आणि अस्वस्थच राहिले होते. आणि आता १९६० साली अचानक पाकिस्तानच्या क्षितिजावर नवा तारा चमकू लागला. त्यांनी स्वत:ला फील्ड मार्शल ही उपाधीदेखील लावून घेतली! आझादांचा आणि नेहरूंचा राजकीयदृष्ट्या बाहेरून जयजयकार करीत असताना सामान्य मुस्लिमजनांच्या इच्छाआकांक्षा पाकिस्तानच्या क्षितिजावर उगवलेल्या या नव्या चांदताऱ्याकडे आकर्षित झाल्या यात आश्चर्य नव्हते.

 या इच्छाआकांक्षांना संघटित स्वरूप देण्याचे पहिले प्रयत्न १९६१ साली करण्यात आले. आणि तेही तथाकथित राष्ट्रीय मुसलमानांनी केले. पुढाकार जमायते उलेमाचे मौ. हफिज-उल-रहिमान यांनी घेतला. दिल्लीला ११व १२ जूनला त्यांनी एक राष्ट्रीय मुस्लिम अधिवेशन आयोजित केले. मुस्लिम जातीयवादी चळवळीचे राष्ट्रीय मुसलमान नेत्यांनी नेतृत्व करावे यात आश्चर्य काहीच नव्हते. धर्मनिष्ठांचा जो गट काँग्रेसकडे वळला त्याची पूर्वपीठिका

१३०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान