पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेझाले. उत्तर प्रदेशात जमीनदारी नष्ट झाल्यामुळे मुसलमान जमीनदार वर्गाला आणि त्याच्या आश्रित वर्गाला हादरा बसला. सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात गेल्यामुळेही नोकऱ्यांच्या आणि उद्योगधंद्याच्या क्षेत्रात मुसलमानांचे प्रमाण कमी झाले. या साऱ्यांचा संबंध पक्षपाताशी नव्हता. दंगे होतात हीही एक तक्रार या काळात केलेली आहे. वस्तुतः गांधीजींच्या खुनानंतर १९६० पर्यंत भारतात दंगे असे झालेलेच नाहीत, तरीही दंगे होतात असे सांगितले जाई. वस्तुत: ही गा-हाणी मांडण्यामागे या मुस्लिम नेत्यांना असे सुचवायचे होते की मुसलमानांचे नोकरीधंद्यातील पूर्वीचे प्रमाण कायम राहिले पाहिजे आणि भारताची सरंजामशाही अर्थव्यवस्था त्यांना पसंत आहे म्हणून बदलता कामा नये. मुसलमानांवर अन्याय होतो आहे, या संदिग्ध वाक्यात खरे म्हणजे उत्तर प्रदेशातील जमीनदारी नष्ट झाली हा मुसलमानांवर अन्याय आहे, हैदराबाद संस्थान भारताने सैन्य घालून ताब्यात घेतले हा मुसलमानांवर अन्याय झालेला आहे आणि पाकिस्तान हिंस्र दंगलींचा मार्ग अनुसरून मिळविल्यानंतरदेखील मुसलमानांचे वेगळे मतदारसंघ आणि सर्व क्षेत्रातील त्यांचे अतिरिक्त प्रमाण नष्ट करण्यात आले हा तर त्यांच्यावर मोठाच अन्याय आहे, असे सूचित करायचे असते.

 या काळात जे प्रश्न मुसलमान समाजापुढे निर्माण झाले ते अशा विशिष्ट परिस्थितीत दुसऱ्या कोणत्याही जमातीपुढे उभे राहणे स्वाभाविक होते. प्रौढ मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर आणि शिक्षणाचे लोण सर्व जाती-जमातींत पसरल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांपुढे नेमके हेच प्रश्न निर्माण झाले; अजूनही शिल्लक आहेत. सर्वच भारतात या नव्या सामाजिक शक्ती उदयाला येत असल्याने जुने हितसंबंध ढासळून पडणे अपरिहार्य आहे. मुसलमानांच्या बाबतीत म्हणायचे तर त्यांना इतरांहून अधिक अडचणी सोसाव्या लागण्याची शक्यता नजरेआड करता येणार नाही. आपल्याला संशयामुळे सरकारी नोकरीधंद्यातून आणि सुरक्षा दलातून वगळण्यात येते असे मुस्लिम समाजाचे प्रवक्ते या काळात म्हणू लागले होते. येथे मुस्लिम समाजावर आणि त्या समाजाच्या धुरीणांवर दुसरीही एक जबाबदारी येऊन पडत होती. आणि ती म्हणजे राजकारणाची नवी वाट निर्माण करणे आणि पर्यायाने विश्वास आणि सदिच्छा कमावणे. परंतु स्वत:ला प्रवक्ते मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी असे कोणते प्रयत्न केल्याचे दिसत नाही. या पहिल्या दशकात नेहरूंची स्तुती करणे आणि काँग्रेसला भरघोस मते देणे हे एक मुस्लिम नेत्यांचे नैमित्तिक कार्य होऊन बसले होते. अर्थात नेहरूंची स्तुती केल्याखेरीज गत्यंतरच नव्हते आणि काँग्रेसला मते देण्याखेरीज पर्याय नव्हता. नेहरूंच्या छत्राखाली राहण्यामागे अथवा काँग्रेसला मते देण्यामागे नेहरूंचा आणि काँग्रेसचा राष्ट्रीय दृष्टिकोन मान्य केला गेला असे मानणे हास्यास्पद ठरेल. नेहरू हीच मुस्लिम नेत्यांना रक्षणाची हमी वाटत होती. मुस्लिमांच्या मतदानाच्या आणि राजकीय नेतृत्वाच्या निष्ठेच्यादेखील साधारणत: तीन अवस्था दिसून येतात. काँग्रेसला मत देण्याचा सुमारे पहिल्या तीन निवडणुकांचा काळ, नेहरूंच्या स्तुतीचा १९५८ पर्यंतचा काळ, आडपडदा बाळगून नेहरूंवर टीका करण्याचा काळ अशा ह्या अवस्था होत. तरीही देशाला लाभलेली राजकीय स्थिरता लक्षात घेता मुस्लिम समाजाचे धार्मिक पातळीवरील राजकीय संघटन करण्यात मुस्लिम नेते गुंतलेले दिसत

भारतीय मुसलमान /१२९